संधीवाताच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधाचा वापर मेलानोमा या त्वचा कर्करोगाविरोधात उपयुक्त ठरू शकतो, असे एका अभ्यासात आढळून आले आहे.
या दोन्ही उपचार पद्धतींचा प्रयोग उंदरावर करण्यात आल्यानंतर त्यांच्यात मेलानोमा टय़ुमरची वाढ जवळपास पूर्णत: थांबल्याचे ब्रिटनमधील ईस्ट अॅग्लिया विद्यापीठातील संशोधकांना आढळून आले. त्वचा कर्करोगाच्या रुग्णांपैकी केवळ पाच टक्केच मेलानोमा या रोगाने पीडित असतात, परंतु याच रोगाने सर्वात जास्त रुग्णांचा मृत्यू होतो. रोगाचे लवकर निदान झाल्यास मेलानोमावर उपचार शक्य असून या रोगाची वाढ झाल्यानंतर यावर उपचार करणे कठीण होते.
मागील काही वर्षांत या रोगावर उपचारासाठी अनुवांशिक परिवर्तनाचा वापर केला जात आहे. परंतु हा रोग औषधांचा प्रतिकार करत असल्यामुळे विविध उपचार पद्धतीचा वापर एकत्रितपणे करण्यावर संशोधक लक्ष केंद्रित करीत असल्याचे ईस्ट अॅग्लिया विद्यापीठाचे ग्रान्ट व्हीलर यांनी सांगितले.
उपचार पद्धती एकत्रितपणे वापरल्यास रोगाची प्रतिरोध करण्याची शक्ती कमी होत असून उपचार करणे शक्य होत असल्याचे या अभ्यासाचे प्रमुख संशोधक व्हीलर यांनी सांगितले. संशोधकांनी संधीवाताच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या लेफ्लोनोमाइड या औषधावर लक्ष केंद्रित करीत त्याचा अभ्यास केला. लेफ्लोनोमाइड औषधाचा वापर हा सेल्मेनिटिब या मेलानोमा रोगाच्या औषधासोबत करण्यात आला. हे औषध मेलानोमाच्या बचावासाठी कारणीभूत असणाऱ्या एमईके या प्रथिनांवर हल्ला करते. या औषधोपचार पद्धतीत लेफ्लोनोमाइड मिश्रित केल्यावर ते अधिक प्रभावी होत असल्याचे आढळून आले. दोन्ही उपचार पद्धतीचा वापर केल्यास कर्करोगाच्या पेशींना अधिक प्रभावी होण्याआधीच नष्ट करण्यात यश आले. हा अभ्यास ऑनकोटॅब या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे.