मोड आलेल्या मूगामध्ये कॅलरीज कमी आणि दर्जेदार पोषक जास्त प्रमाणात आढळतात. मोड आलेले कडधान्य फायबर आणि प्रथिने युक्त तसंच कमी चरबीयुक्त आणि कोलेस्टेरॉल मुक्त आहेत. प्रति १०० ग्रॅम मूगामध्ये फक्त ३० कॅलरीज आढळून येतात. मूगामध्ये असलेले फायबर अन्न पचनास मदत करते तसंच कोलेस्ट्रॉलची पातळी देखील कमी करते. हिरवे मूग ग्लूटेन-मुक्त असल्यामुळे सीलिएक रोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी हा आहाराचा एक चांगला स्रोत आहे. हिरव्या मूगात मोठ्या प्रमाणात बी-कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे असतात, विशेषत: फोलेट आणि थायामिन.१०० ग्रॅम मोड आलेल्या मुगात तांबे, लोह, मॅंगनीज, फॉस्फरस, कॅल्शियम आणि जस्त भरपूर प्रमाणात असते. तसंच ते पोटॅशियमचे उत्कृष्ट स्त्रोत देखील आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जास्त करून लोकं मोड आलेले मूग खाण्यास प्राधान्य देतात. मूग हे प्रथिनांच्या सर्वोत्तम स्रोतांपैकी एक मानले जाते. ज्या लोकांमध्ये प्रोटीनची कमतरता असते त्यांच्यासाठी मूग हे फायदेशीर ठरतात. मूगामध्ये अमीनो अ‍ॅसिड,अ‍ॅटीऑक्सिडेंट यासारखे पोषक घटक त्यात आढळून येतात. त्यामुळे मूग खाणे फायदेशीर ठरते. मूग अनेक रोगांशी लढण्यास मदत करते. मोड आलेले मूग खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

हेही वाचा : Raksha Bandhan 2023: रक्षाबंधनानिमित्त लाडक्या भाऊरायासाठी घरच्या घरी तयार करा ‘या’ मिठाई

मूग खाण्याचे फायदे

मूग खाल्ल्यामुळे उच्च रक्तदाब, LDL कोलेस्ट्रॉलची पातळी आणि हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी मदत करू शकतात. मूग हे फायबरचा एक चांगला स्रोत समजले जाते. ज्यामुळे पचन तंत्र निरोगी राहण्यास मदत होते.

वजन कमी करण्यासाठी अनेक जण आपल्या आहारात मोड आलेल्या मुगाचे सेवन करतात. मोड आलेल्या मुगात असलेले फायबर विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी मदत करते. जे वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.

हेही वाचा : वाढत्या कोलेस्ट्रॉलमुळे त्रस्त आहात? कमी करण्यासाठी आहारात करून पाहा ‘या’ पदार्थांचा समावेश

मोड आलेल्या मूगामध्ये व्हिटॅमिन सी आणि ए असते. जे माणसाच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. तसेच मोड आलेल्या मूगामध्ये अ जीवनसत्व असते. जे डोळ्यांसाठी खूप महत्वाचे असते. याशिवाय हे ल्युटीन आणि झेक्सॅन्थिनचा एक चांगला स्रोत आहे. जे डोळ्यांना हानी पोहोचवणाऱ्या पदार्थांपासून डोळ्यांचे संरक्षण करते.

जाणून घ्या मूग भिजवण्याची योग्य पद्धत

हिरवे मूग भिजवताना सर्वात आधी ते स्वच्छ पाण्याने नीट धुवून घ्या. त्यानंतर ८ ते १२ तास खोलीच्या तापमानावर बरणीत भिजत ठेवा. बरणीचे तोंड कापडाने झाकून ठेवा जेणेकरून मूग श्वास घेऊ शकतील. दुस-या दिवशी, मूग गाळून घ्या आणि मोड येण्यासाठी रिकाम्या कोरड्या कंटेनरमध्ये ठेवा. यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा, की मूगाचा थेट सूर्यप्रकाशाशी संपर्क येऊ देऊ नका. त्यानंतर दिवसातून एकदा मूग धुवा आणि पुन्हा कंटेनरमध्ये ठेवा. असं प्रत्येक दिवशी करा, जोपर्यंत मुगाचे मोड येताना दिसत नाहीत. जर तुम्ही मूग कंटेनर मध्ये न ठेवता ओल्या कपड्यात ठेवले असतील, तर कापड ओलसर असल्याची खात्री करा. ही प्रक्रिया अशीच सुरू ठेवल्यानंतर चौथ्या दिवशी तुम्हाला मूग मोठ्या लांबीपर्यंत पोहोचलेले दिसतील. आता हे मोड आलेले मूग वेगवेगळ्या प्रकारे खाण्यासाठी तयार आहे.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Green moog sprouts immunity eye fiber digestive system eating benifits health tips check details tmb 01
Show comments