चैत्र प्रतिपदेला म्हणजे गुढीपाडव्याला नवे वर्ष सुरू होत आहे. या दिवशी कालचक्राचे आणखी एक पान उलटले जाणार आहे. गुढी उभारून, तोरणं लावून आनंदाने त्याचे स्वागत करणे ही मानवी सहजप्रवृत्ती आहे.चैत्र प्रतिपदेला म्हणजे गुढीपाडव्याला नवे वर्ष सुरू होत आहे. या दिवशी कालचक्राचे आणखी एक पान उलटले जाणार आहे. गुढी उभारून, तोरणं लावून आनंदाने त्याचे स्वागत करणे ही मानवी सहजप्रवृत्ती आहे.

सर्वसाक्षी आणि सर्वव्यापी असलेला काळ हा अनंत आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय किंवा आरंभ, मध्य आणि शेवट या त्रिविध अवस्थांपासून तो मुक्त आहे. त्याचा आरंभ कोणी पाहिला नाही, की शेवट पाहणे शक्य नाही. तरीही आपण त्याला व्यावहारिक सोयीसाठी वर्षांमध्ये, शतकांमध्ये बंदिस्त करण्याचा प्रयत्न करतो. दिवसामागून रात्र येते; ऋ तूमागूनऋ तू येतात. काळाची ओळख प्रत्ययास येण्याच्या या आदिम खुणा आपण जपून ठेवल्या. नंतर त्यांचेच विधी झाले; उत्सव झाले. सांस्कृतिक परंपरेचे त्याला संदर्भ लाभले. त्यातून सृष्टीशी असलेली माणसाची ओळख उत्कट होत गेली. आपल्याकडे कालगणनेसाठी ‘कल्प’, ‘मन्वंतर’ आणि ‘युग’ नंतर ‘संवता’चा क्रम लागतो.असे सांगितले जाते की सत्ययुगात ब्रह्मसंवत; तर त्रेतायुगात वामन संवत, परशुराम संवत (सहस्रार्जुनाच्या वधानंतर आणि राम संवत (रावणाच्या वधानंतर) होऊन गेले.

द्वापारयुगात युधिष्ठिर संवत होता. विद्यमान कलियुगात विक्रम, शालिवाहन, नागार्जुन, विजयाभिनन्दन आणि कल्की असे संवत आहेत. त्यातही विक्रम संवत आणि शालिवाहन संवत कालगणनेसाठी विशेषत्वाने प्रचलित आहेत. आपल्या पूर्वजांची कालमापन पद्धतही निसर्गाशी संवाद साधणारी होती. एक ऋ तू संपून दुसरा सुरू होण्याच्या संधिकालात नवे वर्ष सुरू होते. पावसाळा संपून हिवाळा सुरू होण्यादरम्यानच्या काळात दिवाळीतील पाडव्याच्या दिवसापासून ‘विक्रम संवत’, तर हिवाळा संपून उन्हाळा सुरू होण्यादरम्यानच्या काळात ‘शालिवाहन संवत’ सुरू होतो.

गुढीपाडवा हा प्राचीन भारतीयांनी वर्षांचा प्रारंभ मानला. नवसंवत्सराचा हा जन्मदिवस. सूर्य आपल्या राशिचक्रातील पहिल्या राशीत पुन्हा प्रवेश करतो, तो हा दिवस. शालिवाहन शकाचा आरंभ. असे मानले जाते की या दिवशी ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली आणि मग साऱ्या देवदेवतांनी आपापली कामे सुरू केली. सृष्टिनिर्मितीच्या आधी या विश्वात काय असेल? फक्त अंधार असेल; असेल फक्त एक अनिश्चित पसारा. त्यातून सुघटित सृष्टी निर्माण करणे हे ब्रह्मदेवाचे काम. ब्रह्मदेवाने या रंग – गंधहीन पसाऱ्याला अस्तित्वाचे निश्चित अर्थ दिले आणि मग हे विश्व चैतन्यमय झाले, असे मानले जाते. सृष्टीच्या निर्मितीविषयी अनेक कथा आणि उत्सव प्रचलित आहेत. किंबहुना सृष्टीची निर्मिती हा जगभरातील माणसांच्या सार्वत्रिक आकर्षणाचा आणि सार्वकालिक कुतूहलाचा विषय आहे. असे समजले जाते की ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली आणि अनंत काळाचे चक्र गतिमान झाले. माणसाने आपल्या सोयीसाठी त्याचे विभाग पाडले. कारण समग्र काळाचे आकलन आणि त्याची अनुभूती आणि गणना ही मानवी आवाक्याबाहेरची बाब होती. अथर्ववेदात पाडव्याच्या दिवसाच्या पूजाविधीमध्ये कालपुरुषाच्या भिन्न अवयवांची पूजा सांगितली आहे.

लव, क्षण, निमिष, घटका, प्रहर, दिवस, पक्ष, मास, ऋ तू अशा सर्व कालविभागांचे या दिवशी स्मरण करायचे. आंध्र प्रदेशात या सणाला ‘उगादि’ म्हणजे ‘युगादि’ असे म्हणतात.पाडवा वसंताची चाहूल आणतो. आता सृष्टीत वसंत अवतरलेला असतो. हिवाळ्यात गोठलेले चैतन्य चैत्रस्पर्शाने जागे होते. जीवनाचा प्रवाह गतिमान होतो. झाडांना नवी पालवी येते;  पक्षी झाडांवर घरटी बांधतात. माणसाच्या मनातही निर्मितीची आवर्ती भावना कार्यरत होऊ लागते. सर्जनाची विविध रूपे सृष्टीतून प्रत्ययास येत असतात. नखशिखांत फुललेली अशोकाची झाडे, लालभडक फुलांनी डवरलेली पळस – पांगिऱ्याची मुग्धता, एरव्ही कडू असलेल्या लिंबाला नव्याने आलेला उग्र – मधुर गंधाचा मोहोर आसमंतातील वसंतखुणा प्रक्षेपित करीत असतो. सृष्टीतील सर्वच सजीवांत असलेली नवनिर्मितीची आकांक्षा फलद्रूप होण्याचा हा काळ. या सृष्टिसंकेतातून अगदी सहजपणे जाणवते, की याच काळात विश्वनिर्मिती झाली असावी.गुढीपाडव्याला नैसर्गिक संदर्भ लाभले आहेत, तसेच पौराणिक, आध्यात्मिक, शास्त्रीय आणि ऐतिहासिक संदर्भही लाभले आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार पाडव्याच्या दिवशी सूर्य वसंतसंपातावर येतो आणि वसंत ऋ तूला आरंभ होतो. भास्कराचार्यानी याच दिवसाचा सूर्योदय आणि सूर्यास्त अभ्यासून संपूर्ण वर्षांचे पंचांग तयार केले होते. तिथीने हा दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदेचा. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त. आपल्याकडे गुढीपाडवा, अक्षयतृतीया आणि दसरा हे तीन पूर्ण आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा अर्धा मुहूर्त समजला जातो. या दिवशी केलेले कोणतेही कार्य सरतेशेवटी फलदायी ठरत असते. त्यासाठी वेगळा मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नसते.

रामकथेचा गुढीपाडव्याशी निकटचा संबंध आहे. असे मानले जाते की प्रभू रामचंद्रांनी वालीचा वध केला तो याच दिवशी. रावणाचा वध विजयादशमीच्या दिवशी केल्यावर त्यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी अयोध्येत प्रवेश केला आणि मग लोककल्याणकारी रामराज्याला आरंभ झाला, असे मानले जाते. भगवान विष्णूंनी दशावतारांतील पहिला मत्स्यावतार याच दिवशी घेतला आणि सृष्टीचे प्रलयापासून रक्षण केले, असे पुराणकथा सांगतात.प्रभू रामचंद्रांनी या दिवशी अयोध्यानगरीत प्रवेश केला तेव्हा नगरवासीयांनी त्यांचे स्वागत गुढय़ा उभारून केले, असे मानले जाते. आजही या दिवशी गुढी उभारतात, ती निसर्गातील चैतन्याचे स्वागत करण्यासाठी. एका उंच काठीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र, कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांची माळ, साखरेची गाठी बांधायची आणि त्यावर तांब्या-पितळाचा गडू लावायचा. ही गुढी आसनावर उभी करून उंच जागी ठेवायची. गुढी हे मनातील आनंदाला दृश्यरूप देण्याचे प्रतीक आहे. गुढीच्या काठीला ‘ब्रह्मदंड’ असे म्हणतात. ती सामर्थ्यांचे आणि वैराग्याचे सूचन करते. महाभारत सांगते, की ती राजा वसूची आठवण! त्याने आपल्या तप:सामर्थ्यांने इंद्रालाही लाजवले. इंद्राने राजा वसूचा सत्कार केला आणि वैजयंती माळेबरोबरच त्याला एक वेळूची काठीही दिली. वसूने ती आदराने स्वीकारली आणि तिची पूजा केली.

गुढीवरचा कलश हा यशाचे, तर कडुलिंबाचा पाला हे जीवनातील दु:खाचे आणि साखरेची गाठी हे आनंदाचे प्रतीक आहे. ही गुढी सूर्यास्ताच्या आधी पूजा करून उतरवतात. गुढी उभारताना म्हणावयाचा मंत्र आहे -‘ब्रह्मध्वजा नमोस्तो  सर्वाभीष्ट फलप्रदे।प्राप्तस्मिनसंवत्सरे नित्य मदगृहे मंगलंकुरु॥’याचा अर्थ असा, की ‘ब्रह्माचे प्रतीक असलेल्या या ध्वजाला माझा नमस्कार असो. सर्व प्रकारचे शुभ फल मला मिळू दे. या वर्षांत माझ्या घरात मंगलमय वातावरण राहू दे.’ चक्रधर स्वामींच्या ‘लीळाचरित्रा’त या संदर्भात एक उल्लेख आलेला आहे. चक्रधर स्वामी एका नगरात आले असता, ‘सडासंमार्जने केली. चौक रंगमालिका भरलीया. गुढिया उभिलिया.’ असे त्यात वर्णन आढळते.संत ज्ञानेश्वरांची गुढी वेगळीच होती. भागवत धर्माची – वारकरी संप्रदायाची ती गुढी होती. ते म्हणतात-‘माझ्या जीवीची आवडी।पंढरपुरा नेईन गुढी॥’गुढीपाडव्यापासून ‘शालिवाहन शका’ला आरंभ होतो. शालिवाहन शक हा सातवाहन राजांशी संबंधित आहे. या सातवाहन राजांची राजधानी तत्कालीन प्रतिष्ठान म्हणजे सध्याचे पैठण ही होती. सातवाहन राजांनी दीर्घकाळ महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या प्रदेशांवर राज्य केले.

इसवी सनाच्या पहिल्या शतकात शकांनी पश्चिम भारतावर आक्रमण करून सातवाहनांना पराभूत केले. त्यामुळे त्यांना दक्षिणेत स्थलांतरित व्हावे लागले. याच सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी हा तेविसावा राजा अतिशय पराक्रमी होता. त्याच्या पित्याचे नाव शिवस्वाती आणि आईचे नाव गौतम बलश्री असे होते. सातवाहन राजांमध्ये मातृसत्ताक पद्धत रूढ होती. त्यामुळे ते आपल्या नावापुढे वडिलांच्या नावाऐवजी आईचे नाव लावत असत. म्हणून तो गौतमीपुत्र सातकर्णी. नाशिकजवळील गोवर्धन येथे सातकर्णी आणि शक यांच्यात युद्ध झाले. त्यात शकांचा राजा नहनपान हा मारला गेला. त्यानंतर गौतमीपुत्र सातकर्णी याने अपरांत, अनुप, सौराष्ट्र, कुरक, अकारा, अवंती अशा अनेक प्रदेशांवर आपली सत्ता प्रस्थापित केली; तसेच विदर्भात आणि दक्षिणेतही आपला साम्राज्यविस्तार केला. गौतमीपुत्राच्या पराक्रमाचे असे वर्णन केले जाते, की त्याच्या रथाचे घोडे तीन समुद्रांचे पाणी प्यायलेले होते. त्याने आपल्या राज्यकाळात अनेक नाणी पाडली. शूर, धर्मनिष्ठा, प्रजाहितदक्ष असा हा गौतमीपुत्र सातकर्णी राजा वैदिक धर्माचा पुरस्कर्ता आणि बौद्ध धर्माचा आश्रयदाता होता.

नासिकजवळील बौद्ध लेण्यातील एका शिलालेखात ‘क्षहरातव – शनिरवशेकर शकपल्हवानषूदन समुद्रतोयपीतवाहन’ अशी त्याच्या नावापुढे बिरुदावली आढळते. ‘क्षहरात घराण्याचे निराकरण करणारा, शक आणि पल्लव यांना पराभूत करणारा, समुद्राचे पाणी ज्याचे वाहन (घोडा) पितो..’ असा या बिरुदावलीचा अर्थ आहे. सातवाहन घराण्याची उज्ज्वल परंपरा पुनप्र्रस्थापित करणारा हा गौतमीपुत्र सातकर्णी म्हणजेच शालिवाहन. त्याचा शक या गुढीपाडव्यापासून आरंभ होतो. त्याआधी उज्जनचा अधिपती विक्रमादित्य याचा ‘विक्रम संवत’ प्रचलित होता. शालिवाहनाने त्याचा पराभव करून आपला शक सुरू केला. ही दिनमान पद्धती हिंदू कालगणना म्हणून महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात आणि थेट कंबोडियातील बौद्धांमध्येही रूढ आहे.चैत्र प्रतिपदेला म्हणजे गुढीपाडव्याला नवे वर्ष सुरू होत आहे. या दिवशी काष्ठ नावाच्या ज्या ग्रंथाला किती पाने आहेत हे माहीत नाही, त्याचे आणखी एक पान उलटले जाईल. भूतकाळ रात्रीच्या अंधारात विलीन होईल; नव्या वर्षांचा सूर्य उगवेल. सर्जन आणि विसर्जनाची प्रक्रिया, तसेच जन्म-मृत्यूचे चक्र सृष्टीत अव्याहत गतिमान असते. ‘गतं न शोचं’ या न्यायाने भूतकाळातील दु:खे विसरली जातील आणि मनात आनंदाचे इंद्रधनुष्य उमलण्यास सुरुवात झालेली असेल. सृष्टीत चैत्रारंभी असेच होत असते; मानवी जीवनातही तेच घडते!

भालचंद्र गुजर – response.lokprabha@expressindia.com

सौजन्य – लोकप्रभा

Story img Loader