मराठी नवीन वर्ष आता काही दिवसांवर आलेलं असताना अनेक कलाकार या नवीन वर्षाला काय करायचं याच्या विचारात गढून गेले आहेत. १ जानेवारीला जसे नवीन संकल्प केले जातात तसेच संकल्प काहीजण गुढी पाडव्याच्या दिवशीही करतात. नातेवाईकांना भेटणे, घरी गोडाचे जेवण आणि हास्य मैफिल भरवत हा सण अगदी उत्साहात साजरा केला जातो. नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकरही काहीशा अशाच पद्धतीने तिचे हे नवे वर्ष साजरे करणार आहे.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मी माझी सगळी कामं बंद ठेवणार आहे. आम्ही घरी गुढी जरी उभारत नसलो तरी गोडाचं जेवण तर असतंच. त्यातही श्रीखंडाचा बेत तर हमखास ठरलेला असतो. हा गुढी पाडवा माझ्यासाठी थोडा खास आहे. कारण काही महिन्यांपूर्वीच मी माझा डान्स स्टुडिओ सुरु केला. अनेकदा मुलांना शिकवण्यासाठी मला स्टुडिओ भाड्याने घ्यावा लागायचा पण आता मी स्वतःचा स्टुडिओ घेतल्यामुळे नवीन वर्षी सकाळी जाऊन तिथे माझा रियाज करेन हे मात्र नक्की. दिवाळीमध्येही मी लक्ष्मी पूजनाला स्टुडिओमध्ये जाऊन रियाज केला होता.

आपल्या या डान्स स्टुडिओबद्दल ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना फुलवा म्हणाली की, स्वत:चा एक डान्स स्टुडिओ असावा असं माझं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न होतं. पण सध्या भाड्यानेच एखादा स्टुडिओ घेऊ अशा विचारात मी होते. माहिममध्ये खूप कमर्शियल जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे जेव्हा मी स्टुडिओसाठी जागा शोधत होते तेव्हा मला माहिममधली ही जागा पाहता क्षणीच आवडली आणि ही जागा भाड्याने नाही तर विकतच घ्यायची असा निश्चय आम्ही केला. मला जागांच्या बाबतीत चांगल्या, वाईट अशा भावना पटकन येतात. या जागेचे शटर जेव्हा उघडलं तेव्हाच मला ही जागा घ्यावीशी वाटली.

स्वप्नपूर्तीचा आनंद काही वेगळाच असतो तो शब्दांत मांडता येत नाही तो फक्त अनुभवायचा असतो. माझा हा डान्स स्टुडिओही एक स्वप्नपूर्तीच आहे. गुढी पाडव्याला तिथेच अधिकाधिक वेळ घालवून उरलेला वेळ कुटुंबासोबत घालवण्याचा माझा विचार आहे.

शब्दांकन- मधुरा नेरुरकर
madhura.nerurkar@indianexpress.com