गुढी पाडवा म्हटलं की दिनदर्शिकेमध्ये या दिवसाचे मुहूर्त आणि महत्त्व वाचण्यासाठी अनेकांच्याच नजरा लागून राहिलेल्या असतात. त्यातही काही खास पद्धतींनी हा सण साजरा करण्याकडे अनेकांचाच कल असतो. गुढी पाडव्याच्या उत्साहात भर घालण्यासाठी आणि आपला सांस्कृतिक वारसा पुढे चालवण्याठी विविध ठिकाणी शोभायात्रांचे आयोजन केले जाते. गिरगाव, दादर, ठाणे, लालबाग, डोंबिवली अशा मोक्याच्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या शोभायात्रांमध्ये रंग उधळले जातात ते म्हणजे शुभेच्छांचे, आनंदाचे, नजरा स्थिरावणाऱ्या वेषभूषेचे. अस्सल मराठमोळ्या फेट्यापासून ते अगदी नाकातल्या नथीपर्यंत पद्धतशीर तयार होत प्रत्येकजण आपापल्या परिने या सणाचा आनंद घेत असतो. शोभायात्रांच्या याच उत्साहाचा महत्त्वाचा भाग म्हणजे धावत्या रांगोळ्या.
मिरवणुकींची शोभा वाढवणाऱ्या या धावत्या रांगोळ्यांबद्दल रांगोळी आर्ट परेल या ग्रुपने लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना काही माहिती शेअर केली. रंगसंगती, मिरवणुकीतील धावपळ आणि त्या सर्व उत्साही वातावरणात रांगोळी काढण्यासाठी लगबग करणारी ही सर्व कलाकार मंडळी आकर्षणाचा विषय असतात. भर रस्त्यात गर्दी बाजूला सारत ही मंडळी आपापसात सुरेख ताळमेळ साधत गडद रंगांच्या छटांचा शिडकावा रस्त्यावर करतात. चाळणीतून योग्य त्याच प्रमाणात पडणारा तो रंग आणि त्या रंगामुळे आकारास येणारी एक आकृती पूर्ण कधी होणार याकडेच अनेकांचे लक्ष असते. रंग टाकून झाल्यावर त्यानंतर सफेद रांगोळीची मूठ घेऊन विविध वळणं घेत ज्या कलात्मकतेने रांगोळीची नक्षी आकारास येते ती पाहून तुम्हीही आहाहा क्या बात है…असं बोलल्यावाचून राहणार नाही.
पाडव्याचं हे वातावरण आणि तो सर्व माहोल या विषयी बोलताना रांगोळी आर्टच्या ग्रुपमधील एका सदस्याने या सर्व घाईगडबडीचं वर्णन त्याच्या शब्दांत केलं. ‘धावती रांगोळी काढताना एक वेगळाच उत्साह आमच्यामध्ये संचारतो. आम्ही सर्वचजण सध्या विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहोत. पण, ही कला जोपासण्यासाठी आम्ही वेळात वेळ काढतो. धावती रांगोळी आणि एका जागी काढण्यात येणारी साधारण संस्कार भारती यामध्ये रंगसंगतीला फार महत्त्व आहे. मिरवणुकांच्या वेळी धावत्या रांगोळीविषयी बोलायचं झालं तर तिथे एकमेकांमध्ये असणारा ताळमेळ फारच महत्त्वाचा असतो’, असे अभिषेक साटम म्हणाला.
मंडळ कोणत्याही प्रकारच्या सरावाशिवाय ही कलाकार मंडळी धावत्या रांगोळीच्या रुपात त्यांची कला सादर करत असतात. त्यामुळे त्यांच्या आणि त्यांच्यासारख्या इतरही कलाकारांच्या कलेच्या रंगसंगतीचा सुरेख नजराणा पाहण्यासाठी तुम्हीही वाट धरा गुढी पाडव्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या शोभायात्रांची.