गुढीपाडव्याचा दिवसच नव्या आरंभाचा. मराठी जनतेसाठी हा नव्या वर्षांची मंगलमय सुरूवात करणारा हा दिवस. या दिवसाचं मराठी मनातलं स्थान हे दसऱ्या-दिवाळीसारखंच. या दिवशी सकाळी वातावरणातच प्रसन्नता भरलेली असते. शोभायात्रांचे वेध लागलेले असतात. मित्रमैत्रिणींची तसंच नातेवाईकांची रीघ लागलेली असते. आणि या सगळ्यांच्या स्वागतासाठी आपण आपलं घर स्वच्छ करत मंगलमय वातावरणात गुढ्या उभारतो.
पण हा सण याच दिवशी का बरं? एेकायला विचित्र वाटेल. पण आपल्या सणांमागे काही ना काही कारण असतं. म्हणजे पावसाळ्यानंतर पिकं हाती आल्यावरचा आनंद दिवाळीच्या रूपात साजरा होतो तसं गुढीपाडव्यालाही काही कारण असेलच ना? राम रावणाचा पराभव करून जेव्हा अयोध्येत परततो तेव्हा त्याच्या स्वागतासाठी अयोध्यावासियांनी गुढ्या उभारत त्याचं स्वागत केलं असं म्हणतात. त्याचप्रमाणे शालिवाहन राजाने शकांवर मिळवलेल्या विजयानंतर त्याच्या पैठण नगरीत त्याच्या प्रजेने त्याचं गुढ्या उभारत त्याचं स्वागत केलं अशीही आख्यायिका आहे.
रब्बीचं पीक हाती आल्यानंतरच्या सुमाराला गुढीपाडव्याचा हा सण साजरा केला जातो. पीक हाती आल्याचा आनंद तर असतोच. पण भारतात ऋतू बदलताना त्या संक्रमणामध्ये अनेक सण साजरे केले जातात. उदाहरणार्थ हिवाळ्याचा शेवट होळीच्या सणाने साजरा होतो.
आपल्याकडे प्रत्येक सणाला काही विशेष पदार्थ करण्याचीही पध्दत आहे. गणपतीला उकडीचे मोदक, होळीला पुरणपोळी करतात. तसंच काहीसं गुढीपाडव्यालाही असतं. पण गुढीपा़डव्याचा हा पारंपरिक बेत गोडाचाच नसतो. गुढीपाडव्याला कडुनिंब आणि गूळ याचं खाण्एयासाठी एकत्र मिश्रण केलं जातं. कडुनिंबाचा वापर झाल्याने हे मिश्रण कडू असतोच. पण गुळाच्या वापराने ही कडूजार चव काहीशी कमी होते. आपल्या आयुष्यात येणाऱ्या कडूगोड अनुभवांचं प्रतीक म्हणून हा पदार्थ खाण्याच प्रघात पडला असावा का?
काहीही असो गुढीपाडवा दरवर्षी नव्या युगाची पहाट घेऊन येतो. एक नवी सुरूवात, एक नवी आशा या सणाच्या निमित्ताने पल्लवित होते. साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असणारा गुढीपाडवा याही वर्षी तुमच्या जीवनात आनंद आणि भरभराट आणो.