पौराणिक, धार्मिक, सांस्कृतिक, आरोग्य, सामाजिक, शैक्षणिक इ. बाबींनी र्सवकष महत्त्वाचा, परंपरेने चालत आलेला हिंदू मासारंभ म्हणजेच ‘गुढीपाडवा’. त्याचे महत्त्व आपल्याला माहीत असायलाच हवे.
आपल्या भारतात नाना धर्माचे, पंथांचे लोक राहतात. प्रत्येक धर्माचा त्यांच्या पद्धतीनुसार वर्षांरंभ वेगळा असतो. त्यांची कालगणना त्यांच्या त्यांच्या रिवाजानुसार होत असते. इंग्रजी पद्धतीनुसार जानेवारी ते डिसेंबर ही वर्षांची कालगणना चालत आलेली आहे. हिंदू धर्मात मात्र चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणून वर्षांची नवीन कालगणना केली जाते. विक्रमादित्याने हिंदू पद्धतीत शालिवाहन शक सुरू केल्याने नवी कालगणना सुरू केली. हा शुभ दिवस म्हणजेच गुढीपाडवा होय. हे विजयाचे द्योतक असल्याने दारोदारी गुढय़ा तोरणे, ध्वज उभारून विजयोत्सव संपन्न केला जातो. हिंदू पद्धतीत गुढीपाडवा (चैत्र), अक्षय तृतीया (वैशाख), विजयादशमी (अश्विन), दिवाळीतील पाडवा (अर्धा) हे साडेतीन मुहूर्त महत्त्वाचे समजले जातात. त्या दिवशी एखादे शुभकार्य करायचे असेल तर कोणताही मुहूर्त पाहत नाहीत. इतके या दिवसांचे महत्त्व आहे.
(२०१८-१९) या वर्षीचे या तिथीचे पंचांग पुढीलप्रमाणे-
१८-०३-२०१८
श्री शालिवाहन शके १९४० विलंबी नाम संवत्सरे चैत्र मासे वसंत ऋ तौ आदित्य वासरे शु. १ तिथौ, उत्तरा भाद्रपदा नक्षत्रे. शुक्र योगे. बव करणे मीन रासे चंद्रे स्थितै. मीन रासे स्थितै तूळ रासे गुरु स्थितै. ‘चित्रा’ नक्षत्रावरून सदर वर्षांच्या पहिल्या मासास हे नाव पडले. चित्रा नक्षत्र असलेली पौर्णिमा ती चैत्री पौर्णिमा आणि ती ज्या महिन्यात येते तो चैत्र महिना. ‘चित्र’ याचा अर्थ संस्कृतनुसार विविधता असा आहे. आंब्याला फुटलेला मोहोर, हिरवेगार सृष्टिसौंदर्य, त्यांतही कोकिळेचे मधुर गुंजारव अशी निसर्गाची विविधता साऱ्यांनाच भुरळ पाडत असते. म्हणून हा चैत्र मासारंभ महत्त्वाचा.
पौराणिक महत्त्व : ब्रह्मांड पुराणानुसार देवाने चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच जग उत्पन्न केले. रामायणातील संदर्भानुसार सीताप्राप्ती आणि रावणवध या दोन घटनांनंतर राम अयोध्येस परतले. त्या विजयाचे सर्वत्र धूमधडाक्यात, उत्साहाने स्वागत झाले. रावणासारख्या महादैत्याचे पतन झाल्याने तमाम जनतेत आनंद, उत्साह भरून राहिला होता. ती ही आनंद उन्मादी तिथी. आजच्या २१ व्या शतकाच्या विज्ञानाच्या काळातही हा विजयोन्माद तितक्याच आनंदाने सर्वत्र संपन्न होत असतो.
आरोग्याचे महत्त्व : आपल्या पूर्वजांनी वर्षभरात बरेच दिन साजरे करण्यास सांगितले आहेत, त्यामागे कृतज्ञतेसोबत आरोग्याचा देखील मोठा विचार केलेला आहे. गुढी पाडव्यास कडुनिंबाची पाने सेवन करण्यास सांगितली आहेत. वैद्यकीय आणि आरोग्यदृष्टय़ा त्यास फार महत्त्व आहे. कडुनिंबात पित्तनाशक आणि जंतुनाशक गुण आहेत. वर्षांच्या प्रारंभीच अल्पसे कडुनिंबाचे केलेले सेवन सबंध वर्षभर प्रकृती निरोगी ठेवू शकते. अर्थात अति प्रमाणातील सेवन शरीरास घातकच ठरते. आपली प्रकृती निकोप, सदृढ राहिली तरच आपली संकल्पित कार्ये संपन्न होऊ शकतात. दुसरा त्याचा अर्थ असाही आहे की, दु:खे पचविल्यानंतरच सुखाची किंमत समजते. थोडक्यात, वर्षांरंभीच कडुनिंबाचे खाल्लेले एखाद्दुसरे पान भावी सुखी जीवनाचे रहस्य बनते. आपल्या पूर्वजांनी जे सणवार, व्रतवैकल्ये सांगितली आहेत, त्यामागे आहार-विहाराप्रमाणे कृतज्ञता भावदेखील आहे. सणावारी नुसते गोडधोड खायचे नसून त्या दिनाचे महत्त्व समजून त्यानुसार कृतज्ञतापूर्वक वर्तन करणे महत्त्वाचे असते.
आदर्श भाव : ज्या राम-रावण युद्धातील विजयाबद्दल आपण गुढीपाडवा साजरा करतो त्या रामाला खऱ्या अर्थाने प्रत्येकाने समजून घ्यायला हवे. ‘राम’ हा विष्णूच्या अवतारांपैकी सातवा अवतार असला तरी ‘राम’ ही व्यक्ती सर्वच दृष्टींनी आदर्शवत आहे. भ्राता, पती, पिता, पुत्र, राजा या सर्वच रूपांत राम हा आदर्श ठरला आहे. तो आदर्शच समाजाने आपल्या आचरणांत उतरविणे महत्त्वाचे आहे. जणू आदर्शरूप दाखविण्यासाठीच रामायण घडले आहे. त्यामुळेच रामाला सामान्यांची दु:खे, यातना भोगाव्या लागल्या आहेत. आजच्या घडीला रामाचा आदर्श किती प्रमाणात प्रत्यक्ष पाळला जातो हा मोठा अनुत्तरित राहिलेला प्रश्नच आहे.
रामराज्याची संकल्पना : सुमारे चार शतकांपूर्वी समर्थ रामदासांच्या आग्रहानेच छत्रपती शिवाजी महाराजांनी रामराज्य उभे केले. स्वराज्यांतून सुराज्य (रामराज्याची) संकल्पना प्रत्यक्षात आल्यावरच रायगडावर शिवाजी महाराजांवर राज्याभिषेक प्रसंगी शिवथर घळीतून, रामदास स्वामींनी ‘आनंदवन भुवनी’ हे प्रसिद्ध काव्य केले. शिष्याच्या कार्यावर गुरू पूर्ण समाधानी बनले.
सांप्रत स्थिती : आजची सामाजिक परिस्थिती पाहिल्यावर मन फारच उदासीन बनते. देव, धर्म, राष्ट्र, कुणावरच निष्ठा, प्रेम, जिव्हाळा नसलेली जनता आणि सत्तेसाठी कोणत्याही खालच्या थराला पोहोचणारे राजकारणी. गुंड, दुष्ट गैर कर्म करणारे, निंद्य कर्म करून जनतेत दहशत पसरविणारे राष्ट्रघातकी, राष्ट्रद्रोही इत्यादींना शासन न करता पाठीशी घालणारे राज्यकर्ते. हे रामराज्य ते कसे सांभाळणार?
कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला मोठय़ा सन्मानाने परत पाठविणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही कौतुक करतो. पण आज सर्वत्र स्त्रीत्वाची चाललेली विटंबना, अत्याचार, खून, हत्या, लैंगिक शोषण, बलात्कार इ. गोष्टी छत्रपतींच्या सुराज्याच्या व्याख्येत बसत नाहीत. देशात सर्वत्र मोठाले आर्थिक गुन्हे करून कोटय़वधींचा भ्रष्टाचार करून भारताबाहेर पळून जाणाऱ्यांना सत्ताधीश कोणती शिक्षा करून सामान्यांना दिलासा देत आहेत? त्याचे उत्तर नकारार्थीच आहे.
किमान अपेक्षा : नव्या वर्षांत (२०१८-२०१९) पदार्पण करताना हादेखील विचारच व्हायलाच हवा. आपल्या नेत्यांनी अस्मिता, राष्ट्रतेज, भक्ती, निष्ठा, कर्तव्य जर मनापासून दाखवून योग्य कृती केली तरच जनता नेत्यांचा आदर्श पुढे चालवील. हे करण्याचे वचन प्रत्येकाने दिले तरच खऱ्या अर्थाने हा विजयोत्सव संपन्न होईल.
रामकृष्ण अभ्यंकर – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा