Gudi Padwa 2022 : गेल्या दोन वर्षांपासून करोनाची साथ आणि त्याअनुषंगाने आलेल्या निर्बंधांमुळे सर्वच सणांवर निर्बंध टाकण्यात आले होते. त्यामध्येच गुढी पाडव्याचा देखील समावेश होता. मात्र, यंदा गुढी पाडव्यापासूनच म्हणजेच आजपासूनच राज्यातील करोनासंदर्भातले सर्व निर्बंध उठवण्यात आले आहेत. शिवाय, मास्कची सक्ती देखील हटवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच मुंबई, ठाणे, दादर, गिरगाव, डोंबिवली या भागात गुढी पाडव्याच्या शोभायात्रांचा उत्साह दिसून येत आहे.
https://youtu.be/SlebpgWc3B0
“श्रीराम नवमीच्या महोत्सवाची देखील सुरुवात एकप्रकारे आजपासून आपण केली आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. की या संपूर्ण करोनाच्या काळात आपले आराघ्य दैवत प्रभू श्रीराम यांच्या मंदिरासाठी, यांच्या जन्मस्थानासाठी ५०० वर्षे आपण सर्वांनी संघर्ष केला. त्या प्रभू श्रीरामाचं मंदिर हे अयोध्येला ज्या ठिकाणी रामलल्लाचा जन्म झाला, त्याच ठिकाणी बांधण्यासाठी त्याचं भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आणि आज भव्य मंदिराचं निर्माण हे त्या ठिकाणी होतय. ही आपल्या सारख्या सगळ्या रामभक्तांसाठी देखील अतिशय अभिमानाची गोष्ट आहे”, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
गिरगावमध्ये गुढी पाडव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. नागरिकांनी मोठी गर्दी केली असून या ठिकाणी चित्ररथ तयार करण्यात आले आहेत. यामध्ये चित्ररथातून सामाजिक संदेश देण्यात देखील आले आहेत. तसेच सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू महाराष्ट्र विधिमंडळ हा चित्ररथ ठरत आहे.