मंदार अनंत भारदे mandarbharde@gmail.com
करोनाची दोन वर्षे काळरात्रीगत सरलीत.. आज पुनश्च आपण नव्या आशेने, नव्या जोमाने जीवनाला सामोरे जायला सिद्ध होत आहोत. गुढी पाडव्याच्या महन्मंगल सणाने त्याची सुरुवात झालेलीच आहे. करोनाचे निर्बंध बरेचसे हटवले गेले आहेत. जीवनाला नवी पालवी फुटू पाहते आहे. या नव्या पहाटेचे स्वागत पूर्वीच्याच जोशात करायला आपण सिद्ध झालेलो आहोत..
मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हवेतच ‘परीक्षा’ आहे. शेवटची परीक्षा देऊन आता किमान दोन दशके उलटली तरी आजही फेब्रुवारीची थंडी मार्चच्या उन्हाळ्याकडे सरकायला लागली की परीक्षेचा ज्वर चढायला लागतो. अजून पंख्याची गरज नाही म्हणून झोपावे तर मध्यरात्री कधीतरी अस्वस्थ जाग येते आणि पंखा लावावा लागतो. आपल्याला नक्की घाम कशाने फुटलाय? उकाडय़ाने की गणिताचा अभ्यास न झाल्याने, हा प्रश्न स्वत:ला विचारत मी विद्यार्थी असताना अनेकदा अडनिडय़ा वेळी पंखा सुरू केलेला आहे. आजही कधीतरी मध्यरात्री आपली परीक्षा सुरू आहे, गणिताचा पेपर आहे आणि आपल्याला एकही फॉम्र्युला आठवत नाहीये, आजूबाजूचे विद्यार्थी आपल्याला थोडीही मदत करत नाहीयेत आणि घडय़ाळाचा काटा तीन तासांपैकी अडीच तास संपल्याचे आणि अजून आपल्याला एकही गणित सुटले नसल्याची जाणीव करून देतोय अशी स्वप्ने पडतात आणि दरदरून घाम फुटतो. ऐनवेळेला परीक्षेत आपल्याला काहीही आठवत नसल्याचे स्वप्न हे पिढय़ान् पिढय़ा संक्रमित झालेले एकमेव ‘धर्मनिरपेक्ष’ स्वप्न आहे.. ज्याला भाषा, प्रांत, लिंग याचेही बंधन नाही. अजून एक मजा म्हणजे त्याकाळी परीक्षेच्या काळात जशी झोप लागत असे तशी आजतागायत पुन्हा कधी लागलेली नाही. तेव्हा सकाळी लवकर उठून अभ्यास करायचाय म्हणून रात्री लवकर झोपलो.. सकाळी जेव्हा लवकर उठायची वेळ आली तेव्हा आत्ता एवढय़ा लवकर उठलो तर दिवसभर सुस्ती राहील, तेव्हा झोप पूर्ण होणे गरजेचे आहे म्हणून मग पडून राहिलो.. आणि दुपारच्या वेळी आज रात्री जागायचे आहे म्हणून झोपलो.. आणि सकाळी लवकर उठून केलेला अभ्यासच खरा.. उगा रात्रीच्या जागरणाचे काही खरे नाही म्हणून रात्रीही लवकर झोपलो. इतकी हुकमी, मऊसूत झोप त्यानंतर कधीच आलेली नाही.
२०२० साली मार्च महिन्यात उकाडा की थंडी, झोप की अभ्यास, सत्य की भास अशा खास याच काळात वाटय़ाला येणाऱ्या ऋतुविभ्रमांशी खेळत असताना करोना नावाचा एक अगदी अनाकलनीय पेपर सोडवायची वेळ आली. एक अशी परीक्षा- जिथे प्रश्न काय आहे याचीच कोणाला माहिती नव्हती. चैत्राची चाहूल लागली की पानगळ सगळ्यांच्या सवयीची. झाडाला कळू न देता जशी पाने गळून जातात, तशी आपल्याला कोणाला चाहूलही न लागू देता कितीतरी माणसं गळून गेली. सारीच जीवाच्या कराराने सांभाळावी अशी मौल्यवान माणसं! मोबाईलवर कॉन्टॅक्ट्स तपासत असताना गुळगुळीत रस्त्यात अचानक खड्डा लागावा तसे अचानक एखाद्या गळून गेलेल्या पानाचे कॉन्टॅक्ट डिटेल्स समोर येतात आणि छातीत चर्र्र होतं! कोणाला फोन लावणार आणि आता कोणाला ईमेल करणार? लॉकडाऊन जेव्हा अगदी चरमसीमेवर होते तेव्हा मुंबईच्या मध्य भागात असलेल्या माझ्या घरातून अचानक जवळजवळ बारा किलोमीटरवर असलेल्या विमानांचे टेकऑफ, लँडिंग दिसायला लागले. विमानही उडाल्यानंतर अगदी दूरवर जाईपर्यंत दिसत राहायचे. दूरवर समुद्राचे पाणी दिसायचे आणि अगदी दूरवरून येणारी जहाजेही दिसायची. इतक्या लांबचे आजवर कधीच दिसले नव्हते. रस्त्यावर गाडय़ा नाहीत, त्यामुळे अगदी थोडय़ा दिवसांत प्रदूषणाची शहरावर असलेली काजळी दूर झाली आणि शहराचे सगळे आकाश निरभ्र होऊन गेले. अचानकच एप्रिलच्या मध्यावर चाळीस-पन्नास पोपट आले आणि आमच्या घराच्या आसपास बागडायला लागले. पराकोटीची एक्साइटमेंट वाटावी अशी ही घटना! पण या पोपटांचे येणे हे श्राद्धाच्या जमून आलेल्या खिरीसारखे वाटले. कोणत्या तोंडाने त्याचे कौतुक करणार? सगळे शहर घरात डांबून ठेवल्यामुळे जेव्हा प्रदूषण हटले तेव्हा मजा पाला आलेले हे बिन बुलाये मेहमान!
सतत ऐकू येणारे सायरनचे आवाज, तो दोन तासाकरता उठणारा कर्फ्यू, रस्त्यावरून पायी चालत निघालेले लोकांचे तांडे, नेत्यांचे ‘जनता के नाम’ संदेश, शाळा बंद, लोकल बंद, गाडय़ा बंद, थिएटर बंद. सुरू होते ते फक्त प्रत्येकाच्या स्मार्ट फोनचे डेटा पॅक. डेटय़ाचे हात हजारो, दुबळी माझी झोळी अशी अवस्था. त्यामुळे व्हाट्सअॅप विद्यापीठाचा रतीब सुरू झाला. कोणत्या तरी न ऐकलेल्या गावातला एक तथाकथित डॉक्टर.. जो ‘केळीच्या सालात गाय छाप गुंडाळा, त्याला दोरी बांधा आणि त्याला उकळत्या पाण्यात टाकून डाव्या नाकपुडीने त्याची वाफ हुंगा.. करोना काय, एड्सपण बरा होईल’ असा सल्ला देत होता, तो रातोरात स्टार झाला. मानवी प्रज्ञा जर कामाला लागली तर किती विविध प्रकारचे काढे बनवू शकते याचे लॉकडाऊन हे एक उदाहरण आहे. मला तर वहीम आहे, की ज्या मालाला अजिबात उठाव नाही, त्याला उठाव यावा म्हणून त्याचा काढा करून प्या- अशा अफवा उठवल्या जात असाव्यात. मी असेही ऐकून आहे की, त्या काळात सिमेंट आणि टायरला अजिबात मागणी नव्हती. टायर जाळून त्याचा काढा बनवायचा आणि त्यात सिमेंट मिसळून उकळवायचे आणि दिवसातून सहा वेळा दोन-दोन कप घ्यायचे अशी कल्पना कोणालाही न सुचू दिल्याबद्दल मी त्या विधात्याचा आभारी आहे. आपले लोक खरोखरच असा काढाही प्यायले असते.
‘वर्कफ्रॉम होम’ आणि ऑनलाईन शिक्षणाने जितकी धमाल करोनाकाळात आणली, तितकी धमाल कशानेच आणली नाही. कर्मचाऱ्यांना किमान पगार दिलाच पाहिजे असा शासकीय फतवा निघाला. लोक घरी बसले तर त्यांना फुकट पगार कसा द्यायचा? वाहतूक बंद. ऑफिसमध्ये कोणाला यायची परवानगी नाही. मग ‘वर्क फ्रॉम होम’ काय करायचे? अनेक ऑफिसेसमध्ये मग उगाचच मीटिंगा व्हायला लागल्या आणि त्यांना सगळ्याच्या सगळ्या ऑफिसने हजेरी लावणे सक्तीचे झाले. माझ्या परिचयाच्या एका रिसेप्शनिस्टने मला सांगितले की, आजवर ऑफिसमध्ये कोणत्याही मीटिंगला मला कधीही बसावे लागले नाही, पण आता ऑनलाईनमध्ये मात्र फायनान्सपासून सेल्सपर्यंत सगळ्या मीटिंगांना मला बसवतात.
या काळात बाप आणि पोरगा दोघेही पाठीला पाठ लावून ‘ऑनलाईन’ होते. पोराची शाळा ऑनलाईन सुटली आणि शाळेत राष्ट्रगीत सुरू झाले, पोरगा ताडकन् उभा राहिला. बापही राहिला. राष्ट्रगीताची शालेय धून ऐकून वेगळ्या वेगळ्या शहरांतले बापाचे सहकारीही उभे राहिले. नंतर बापाला मेमो मिळाला. ऑफिसचे कामकाज सुरू असताना अचानक राष्ट्रगीत सुरू करायचे नाही! त्यामुळे मुलाला ताबडतोब हेडफोन ऑर्डर करावा लागला.
माणसं एकमेकांना भेटतात. एकमेकांच्या घरी जातात. हसतात. खिदळतात. भांडतात. तंडतात. पुन्हा सलोखा करतात. उधार मागतात. उधळपट्टी करतात. लग्नात नाचतात. घटस्फोटाच्या तडजोडी करायला जातात. हॉटेलमध्ये जातात. लोकलच्या गर्दीत लटकून जातात. हळदीला जातात. माणसं माणसासारखी असतात. करोनाने माणसाचा ‘माणूस’ असण्याचा हा सांधा हलवून टाकला. एका घरात काही तास गुण्यागोविंदाने राहणारी माणसं त्याच घरात दिवसेंदिवस नाही राहू शकत.. अशा काहीतरी भलत्याच वास्तवाला त्यांना सामोरे जावे लागले. घरात कधी तणाव निर्माण झाला तर बाहेर कामाला गेल्यावर एक ब्रीदिंग स्पेस मिळायची आणि आपोआपच तणाव निवळायचे. आता दिवसच्या दिवस माणसं एकमेकांच्या सहवासात राहिली आणि त्यामुळे एकमेकांपासून दूर गेली. प्रत्येकाला एक स्पेस हवी असते. खुराडय़ासारख्या महानगरीय घरातून बाहेर पडले की प्रत्येकालाच किमान काही स्पेस मिळते. घरातच बसाव्या लागलेल्या सगळ्यांनीच आपापली स्पेस मिळवायच्या प्रयत्नांत घरपणाला अस्ताव्यस्त करून टाकले. स्पेस मिळत नाही म्हणून कुढत लोक कोषात गेले, मिटले गेले. आज घराघरातले म्हातारेकोतारे करोनाने हबकलेले आहेत. मुलांची एकमेकांना भेटायची, दंगा करायची सवय निघून गेली आहे. आता त्यांना मैदानावर खेळायचे नाहीये. त्यांना सायकल चालवायला जायचे नाहीये. त्यांना फक्त स्क्रीनसमोर बसायचे आहे आणि आभासी जगातच राहायचे आहे.
‘करोना आता गेला’ असे सगळीकडे बोलले जाऊ लागले आहे. शासनाने बरेच निर्बंध खुले केले आहेत आणि सगळेच निर्बंध काढून टाकण्याच्या दिशेने शासनाची पावले पडताहेत. गेली दोन वर्षे फक्त अभद्र बातम्यांचीच कानाला सवय झालीये. चांगले काही होईल असे कोणीच आणि कुठेच बोलले नाहीये. करोनाच्या लाटांची इतकी चर्चा तमाम जगाने केली आहे की आता मानवी समाज वाचणारच नाही की काय, अशा शक्यतेच्या कडय़ावर आपण उभे आहोत. या महामारीत माणसे गमावली याचे दु:ख आहेच; पण सगळ्या समाजाने मोठय़ा प्रमाणावर उमेद गमावली हे जास्त काळजीचे आहे. काय बहार येईल की पहाटे खडबडून जाग येईल आणि कळेल की जशी विसरलेली उत्तरे, गणिताचा अवघड पेपर हे जसे फक्त एक स्वप्न होते, तसेच मार्च २० ते मार्च २२ हे फक्त स्वप्न होते.. करोना कधी आलाच नाही आणि आपल्या लोकांना घेऊन गेलाच नाही!
चैत्र पाडव्याला हिंदू नववर्षांला सुरुवात झाली आणि त्याच आसपास आता निर्बंधमुक्त होण्याच्या दिशेने आपली वाटचाल सुरू झालीये. पंचांगाच्या तिथीला चैत्र, आषाढ, श्रावण, जानेवारी, फेब्रुवारी, मंगळवार, बुधवार, एकादशी, द्वादशी या सगळ्या ओळखी आपण देतो.. आपल्याला सोयीचे व्हावे म्हणून देतो. उगवणाऱ्या दिवसाला तुम्ही एक तारीख म्हणता की एकादशी, याने काहीच फरक पडत नाही. तो त्याच्या गणिताने उगवतो आणि त्याच्याच हिशेबाने मावळतो. कालच्या दिवसाचे कोणतेही मळभ उगवणारा ब्रँड न्यू नवा दिवस घेऊन उगवत नाही. तो पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी जितका फ्रेश उजाडतो, तितकाच अमावस्येच्या दुसऱ्या दिवशीही उजाडतो. काल कोणत्या तरी अडगळीच्या खोलीत असलेली अनोळखी काठी मरगळ झटकून चांगलीचुंगली वस्त्रे ल्याली आणि सूर्याभिमुख झाली की त्याच काठीची ‘गुढी’ होते आणि शुभंकराची चाहूल लागते. त्यामुळे जेव्हा अडगळीत असते तेव्हा खचायचे नाही, आणि आंब्याची डहाळी, कलश, भरजरी वस्त्रे लेवून डौलात उभे राहायची संधी मिळाली की मातायचे नाही. कधी अडगळ, कधी डौल! सारे जीणे जेव्हा गंगौघाचे पाणी बनते तेव्हा खडतर डोंगरदऱ्यांतही आणि लांबच लांब प्रवाहातही लय बिघडत नाही. अडगळीतून निघून आपण आता गुढी बनतो आहोत यावरचा विश्वास मधल्या काळात जरा डळमळीत झाला असेल तर बाहेर पडा.. पानगळीचा सडा पडलेला तुम्हाला दिसेल. जुनी पाने गळाली आणि नवी पाने झाडाने ल्यायलीसुद्धा! झाड नव्याने नटू शकते, तर मग आपणही नव्याने नटायला काय हरकत आहे?
आमेन, आमेन!