आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई :  गुढीपाडवा हा नवीन वर्षांचा मुहूर्त साधत मुंबईतील मेट्रो रेल्वे २ ए आणि ७ मेट्रोचे उदघाटन मराठी भाषा भवन व जीएसटी भवनाचे भूमिपूजन आणि गृहविभागाच्या तीन सेवांचे लोकार्पण अशी विकासकामांची गुढी उभारण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रथमच मेट्रो रेल्वेचे उद्घाटन होत असून मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यास विशेष महत्त्व आहे.

करोनाकाळात सरकारी कामे, विकासकामे रखडल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. तसेच शिवसेनेला विकास विरोधी पक्ष म्हणून लक्ष्य केले जाते. भाजपने त्यासाठी मेट्रो ३ प्रकल्पाच्या कारशेडवरून शिवसेनेवर सातत्याने टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मेट्रो रेल्वेच्या दोन मार्गिकांचे उद्घाटन आणि मुंबईत मराठी भाषा भवन उभारण्याची पायाभरणी करून विकास प्रकल्प आणि मराठी अस्मिता या दोन मुद्दय़ांवर मुंबईकरांना साद घालण्याची तयारी शिवसेनेने केली आहे. त्यासाठी मराठीजनांसाठी शुभ मूहर्त असलेल्या गुढीपाडवा हा नवीन वर्षांचा दिवस निवडण्यात आला आहे. मेट्रो २ ए हा प्रकल्प दहिसर ते डी. एन. नगर असा आहे. तर मेट्रो ७ ही अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व अशी धावणार आहे. पश्चिम उपनगरातील प्रवाशांची मोठी सोय या मेट्रो रेल्वेमुळे होणार आहे. मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन यानिमित्ताने प्रथमच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. प्रशासकीय पातळीवर महत्त्व असलेल्या नवीन जीएसटी भवनचे भूमिपूजनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्याचबरोबर मराठी भाषा हा शिवसेनेचा जिव्हाळय़ाचा विषय आहे. मुंबईत गिरगाव चौपाटीसमोर दिमाखदार मराठी भाषा भवन उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. आता त्यास मूर्त रूप देण्यात येत असून मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते गुढीपाडव्याच्या दिवशी मराठी भाषा भवनचे भूमिपूजन होणार आहे.

याचबरोबर गृहविभागाच्या तीन सेवांचे लोकार्पणही गुढीपाडव्याच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. त्यातील एक ११२ क्रमांकाची हेल्पलाइन आहे. महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली असे त्याचे नाव आहे. या यंत्रणेमुळे मदत हवी असणाऱ्या नागरिकांना विशेषत: महिला, लहान मुले व वृध्दांना, त्यांनी दूरध्वनी केल्यानंतर तात्काळ प्रतिसाद देणे शक्य होईल. शहरी भागात १०-१५ मिनिटांत व ग्रामीण भागात १५-२० मिनिटांमध्ये नागरिकांना प्रतिसाद देणे शक्य होणार आहे. दुसरी सेवा ही गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठीची अ‍ॅम्बिस प्रणालीची मदत घेणार आहे. सुमारे सहा लाख गुन्हेगारांची छायाचित्रे, बोटांचे ठसे, डोळयांचे बुबुळ इत्यादीचा एकत्रित माहिती अ‍ॅम्बिस प्रणालीमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. देशात अशा प्रकारची जागतिक प्रणाली उपयोगात आणणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य ठरणार आहे. तिसरी सेवा ही महिला व बालकांवर होणारे सायबर गुन्हे प्रतिबंध प्रणाली आहे. या प्रकल्पांतर्गत इंटरनेटवरील फसवणुका, वैवाहिकविषयक संकेतस्थळांवरील फसवणूक, ओळख चोरी, छायाचित्रामधील फेरबदल, बँकासंदर्भातील फसवणूक, बालकांसदर्भातील पोर्नोग्राफी, सायबर बुलिंग, ऑनलाइन गेमिंग, खोटी माहिती देणारी संकेतस्थळे, सायबर मानहानी यांची माहिती व यापासून प्रतिबंधात्मक उपाय आदींसाठी ही प्रणाली काम करेल.

मराठीतील सर्व गुढी पाडवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gudi padwa development works inauguration various works including metro railway chief minister bhumi pujan ysh