ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर स्वागताध्यक्ष; चित्ररथांतून वैज्ञानिक संकल्पनांना प्राधान्य देण्याचे आवाहन
ठाणे : करोना प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे होऊ न शकलेल्या गुढीपाडव्याच्या नववर्ष स्वागतयात्रा यंदा मोठय़ा उत्साहात आयोजित करण्यात आल्या आहेत. ठाण्यातील श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे या स्वागतयात्रेची तयारी सुरू झाली असून यंदाच्या वर्षी ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांची स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या चित्ररथ तसेच घोषवाक्यांमध्ये वैज्ञानिक विषय आणि संकल्पनांना प्राधान्य देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
मराठी नववर्षनिमित्ताने दरवर्षी ठाणे शहरात स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात येत असते. या यात्रेच्या माध्यमातून सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविण्याबरोबरच विविध सामाजिक संदेश दिले जातात. करोना प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षे या परंपरेत खंड पडला. मात्र, आता करोनाचा धोका कमी झाल्यामुळे ठाणे जिल्हा प्रशासनाने नववर्ष स्वागतयात्रांना परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर श्री कौपिनेश्वर न्यास सांस्कृतिक न्यासाने स्वागतयात्रेची जोरदार तयारी सुरू केली आहे. स्वागतयात्रेला ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांची स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याची माहिती श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासतर्फे देण्यात आली.
नववर्ष स्वागतयात्रेचे नियोजन करण्यास फार कमी वेळ मिळाल्यामुळे यंदा कोणतीही संकल्पना ठेवण्यात आलेली नाही; परंतु प्रत्येकाने आपली संस्कृती, परंपरा यातून सकारात्मक संदेश देता येतील असे चित्ररथ किंवा घोषवाक्य घेऊन यात्रेत सहभागी व्हावे तसेच यात्रेचे स्वागताध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर असल्यामुळे वैज्ञानिक विषयाच्या अनुषंगाने काही साकारण्याचा प्रयत्न करता येईल का याचा विचारदेखील संस्थांनी करावा, असे आवाहन श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या कार्यवाह अश्विनी बापट यांनी केले आहे.
पूर्वसंध्येला कार्यक्रमांची रेलचेल
यंदा नववर्ष स्वागतयात्रेच्या पूर्वसंध्येला गुरुवार, ३१ मार्च रोजी सूर विठ्ठल या कार्यक्रमात आदित्य ओक यांचे ऑर्गन, तर वरद कठापुरकर यांचे बासरीवादन होणार आहे. शुक्रवार, १ एप्रिल रोजी ठाणेकर नागरिक आणि राष्ट्र सेविका समिती महिला पौरोहित्य वर्गाचे सामुदायिक अथर्वशीर्ष, शिवमहिम्न आणि रुद्रपठण होणार आहे. प्रफुल्ल माटेगावरकर यांचा ‘सह्याद्रीतील सात रत्ने: एक संवाद गड कोटांशी’ हा कार्यक्रम होणार आहे.