मंगल कातकर mukatkar@gmail.com
प्रत्येकालाच आपलं घर आनंदात न्हाऊन निघावं असं वाटत असतं. वर्षांच्या प्रथम दिनी जर घरात आनंदाचं वातावरण राहिलं तर वर्षभर तो आनंद तसाच प्रवाही राहतो असं आपण मानतो. त्यामुळे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर लोक घर किंवा घरासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करतात, पुजाअर्चा करतात, महत्त्वाचे कार्यक्रम आयोजित करतात. हे करण्यामागे लोकांचा हाच उद्देश असतो की असेच आनंदाचे क्षण वर्षभर आपल्या घरात येऊ देत व आपलं घर सुखा-समाधानाने नांदू दे.
चार भिंती व त्यावर छप्पर घातले की तयार होणारी वास्तू म्हणजे घर होत नसते. ती वास्तू ‘घर’ होण्यासाठी तिला मांगल्याचा स्पर्श लागतो, नात्याची वीण लागते, प्रेमाचं शिंपण लागतं. असं प्रेम, माया, आपुलकीने ओतप्रोत भरलेलं घर माणसाला जगण्याची उमेद देतं, त्याच्या आयुष्यात सुखाची पखरण करतं. घरात सौख्य नांदू लागतं. घरातलं मांगल्य, सौख्य, समृद्धी दाखविण्यासाठीचं घराच्या दारात आपण हिंदूू नववर्षांच्या प्रथम दिनी गुढी उभारतो व ही सुख-समृद्धी अशीच अखंड राहो म्हणून तिची पूजा करतो.
प्राचीन काळापासून साजरा होत आलेला गुढीपाडव्याचा सण आजही आपण तेवढय़ाच उत्साहाने साजरा करतो. येणारं नवीन वर्ष आपल्यासाठी सुख, समाधान व ऐश्वर्य घेऊन यावं असा विचार प्रत्येकाच्याच मनात असतो आणि याच विचारातून प्रत्येक घर नववर्षांच्या स्वागतासाठी सज्ज होतं. घराची साफसफाई केली जाते. बांबूची काठी, भरजरी वस्त्र, धातूचा गडू, साखरेची माळ, फुलांच्या माळा, आंब्याच्या पानांची डळाळी व कडूनिंब, पुरणपोळी किंवा श्रीखंड-पुरीच्या नैवैद्य अशी जय्यत तयारी प्रत्येक घरी केली जाते. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या शुभ मुहूर्तावर दारी रांगोळी काढून, तोरणं बांधून आपल्या घराच्या सौख्याचं, मांगल्याचं प्रतिक म्हणून लोक शुचिर्भूत होऊन, नवीन कपडे परिधान करून आपल्या घराच्या दारात हौसेने गुढी उभी करतात. उभी केलेली उंच गुढी जणू आपल्या घराचे समृद्धपण सगळय़ांना दाखविते. खेडेगावांमध्ये आपल्या घरची गुढी सगळय़ात उंच असावी म्हणून लोक जास्तीत जास्त लांबीचा बांबू शोधून आणतात. हे करण्यामागे असुया नसते, तर आपल्या घराचं अस्तित्व उठावदार करण्याची मनिषा असते. त्यामुळे त्या दिवशी कोणी कोणी गावात उंच गुढी उभारली आहे हे कौतुकाने पाहिले जाते, बोलले जाते.
प्रत्येकालाच आपलं घर आनंदात न्हाऊन निघावं असं वाटत असतं. वर्षांच्या प्रथम दिनी जर घरात आनंदाचं वातावरण राहिलं तर वर्षभर तो आनंद तसाच प्रवाही राहतो असं आपण मानतो. त्यामुळे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर लोक घर किंवा घरासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करतात, पुजाअर्चा करतात, महत्त्वाचे कार्यक्रम आयोजित करतात. हे करण्यामागे लोकांचा हाच उद्देश असतो की असेच आनंदाचे क्षण वर्षभर आपल्या घरात येऊ देत व आपलं घर सुखा-समाधानाने नांदू दे.
दुर्दैवाने सणासुधीच्या अलीकडे कोणाच्या घरी एखादा दु:खद प्रसंग घडला असला तरीही त्यांच्या दारात गुढी उभी केली जाते. मात्र ही गुढी दूरचे नातेवाईक किंवा शेजारी उभी करतात. त्यामागे हाच उदात्त हेतू असतो की भविष्यात त्या लोकांच्या जीवनातलं दु:ख कमी व्हावं व त्यांच्या घरात पुन्हा सुख व समाधान नांदावं. यावरून आपल्याला घर आणि गुढी यांचं असणारं जिव्हाळय़ाचं नातं स्पष्ट होतं.
कोणताही सण घरातल्या स्त्रीच्या आनंदाला उधाण आणणारा असतो. गुढीपाडवा जवळ येतो आहे म्हटलं की गृहिणींची कामाची लगबग सुरू होते. घरच्या साफसफाईपासून ते गुढी उभारण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची जमवाजमव करण्यापर्यंत स्त्रियांची धावपळ सुरू असते. गुढी पुजताना नवीन साडी आणि दागिने घालता यावेत म्हणून स्त्रिया हौसेने खरेदी करतात. नैवैद्यासाठी पुरणावरणाचा स्वयंपाक करायचा की श्रीखंड-पुरीचा बेत आखायचा हे चाणाक्ष गृहिणी उपलब्ध वेळ व साधनं यानुसार ठरवते. काही ठिकाणी गोड पदार्थाबरोबर कैरी, वाटली डाळ, गूळ. करवंद घालून कडूनिंबाचादेखिल नैवैद्य ती आवर्जून तयार करते.
चैत्र महिन्याबरोबर सुरू झालेल्या उन्हाळय़ात आपल्या घरातल्या मंडळींचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी हे पूर्वापार चालत आलेले सोपास्कार गृहिणी आवर्जून करते. शहरांमध्ये नववर्षांनिमित्त शोभायात्रा काढल्या जातात. हौशी स्त्रिया आपल्या घरी गुढी उभी करून पारंपरिक पोशाख घालून नटून-थटून ढोल-ताशे वाजवत मिरवणुकीत सहभागी होतात.
पूर्वी गावागावांमध्ये गुऱ्हाळं चालायची तेव्हा म्हणे लोक गुढीपाडव्याला देवळात जाऊन सगळय़ा लोकांना भरपूर गूळ वाटायचे. असं गूळ वाटण्याचं भाग्य वर्षभर आपल्या घराला मिळो म्हणजेचं शुभ प्रसंग आपल्या घरी घडो हाच यामागे हेतू असावा. थोडक्यात, चैत्राच्या पालवीबरोबर आपल्या घरात आनंदाचा चैत्र फुलवणारा गुढीपाडवा दरवर्षी आपला आनंद द्विगुणित करीत राहतो व आपलं घरदार सौख्याच्या पालवीने बहरून टाकतो.
बहिणाबाईंच्या शब्दांत सांगायचे तर-
गुढीपाडव्याचा सन
आतां उभारा रे गुढी
नव्या वरसाचं देनं
सोडा मनांतली आढी