मराठी नववर्ष म्हणजेच गुढी पाडव्याचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे आता बरेचजण हा गुढी पाडव्याचा सण साजरा करण्यासाठी त्यांच्या त्यांच्या परिने तयारीला लागले आहेत. आनंद, उत्साह, जल्लोष, नवे संकल्प आणि अर्थातच नवी सुरुवात या साऱ्याची सुरेख सांगड घालत दारी आलेला हा सण म्हणजे अनेकांच्याच जिव्हाळ्याचा विषय. नात्यांमधील प्रेम आणि विश्वास दृढ करणाऱ्या या सणाचं महत्त्वसुद्धा प्रत्येकासाठी वेगळं आहे. बदलत्या काळानुसार पाडवा साजरा करण्याच्या पद्धतींमध्येही विविधता पाहायला मिळत आहे. गुढी पाडव्याच्या याच उत्साही वातावरणात टेलिव्हिजन कलाकारही काही मागे नाहीत. त्यातही मराठी टेलिव्हिजन विश्वात मालिकांमध्येही या सणाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. अशाच काही मालिकांपैकी एक म्हणजे ‘खुलता कळी खुलेना’. या मालिकेच्या निमित्ताने अभिनेत्री अभिज्ञा भावेने साकारलेली नकारात्मक भूमिका सध्या चांगलीच गाजत आहे.
अभिज्ञा भावे गुढी पाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी सज्ज झाली आहे. या सणाबद्दलच लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना अभिज्ञा म्हणाली, ‘यंदाचा पाडवाही मी सेटवरच साजरा करणार आहे. या सणाबद्दल मी उत्साही आहेच. पण, यंदा मी कोणा एका स्वरुपात गुंतवणूक करुन हा सण साजरा करणार आहे. मग ती गुंतवणूक कोणत्याही प्रकारची असू शकते. त्यामुळे गुंतवणुकीसाठी मी प्रयत्नशील असेन. पारंपरिक पद्धतीने गुढी पाडवा साजरा करण्याविषयी म्हणायचं झालं तर, घरी गोडाधोडाचा विशेष म्हणजे पुरणपोळीचा बेत असणारच आहे.’
गुढी पाडवा आणि त्यानिमित्ताने विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या शोभायात्रांमधील सळसळता उत्साह आणि एकंदर त्या सर्व वातावरणाविषयी सांगताना अभिज्ञाने तिच्या व्यग्र वेळापत्रकामुळे शोभायात्रांमध्ये सहभागी होता येत नसल्याची खंत व्यक्त केली. पण, त्यासोबतच जर का वेळ आणि संधी मिळाली तर आपण या खास दिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शोभायात्रेत नक्कीच सहभागी होऊ, अशी आशाही तिने व्यक्त केली. नवीन वर्ष म्हटलं की नवी सुरुवात आली आणि नवी सुरुवात म्हटलं की नवे संकल्प आलेच. नवीन वर्षाच्या निमित्ताने करण्यात येणाऱ्या संकल्पाविषयी विचारले असता अभिज्ञा म्हणाली, ‘माझा संकल्प बऱ्याच दिवसांपूर्वी सुरुही झाला आहे. मी सध्या सार्वजनिक ठिकाणी प्रवास करताना, वावरताना शक्य तितकी अस्खलित मराठी बोलण्याचा प्रयत्न करत आहे.’
गुढी पाडव्याच्या निमित्ताने मालिकांच्या सेटवरही उत्साहाचे वातावरण असते. अशाच वातावरणाचा उत्साह ‘खुलता कळी खुलेना’च्या सेटवरही पाहायला मिळणार आहे. पण, पाडव्याच्या निमित्ताने अभिज्ञा साकारत असलेल्या ‘मोनिका’च्या व्यक्तीरेखेसोबत फार काही चांगले घडणार नाहीये. पण, त्या एका व्यक्तिरेखेमुळेच मालिकेच्या कथानकामध्ये काही आकर्षक वळणं येतील, असेही अभिज्ञाने सांगितले.
शब्दांकन- सायली पाटील
sayali.patil@indianexpress.com