बाहेर जाताना केसांना नीट बांधणे, डोक्यावरून स्कार्फ घेणे, वेळोवेळी तेल लावून अन् शाम्पू करून आपण केसांची काळजी घेत असतो. परंतु, कधी कधी यापेक्षा काहीतरी अधिक करणे गरजेचे असते. बाहेरील ऊन, धूळ, धूर या सर्वांमुळे नाही म्हटले तरी त्यांची चमक कमी होते; त्यांचा पटकन गुंता होतो आणि मग ते खराब होतात. ज्यांना शक्य असते, ते पार्लरमध्ये स्पा ट्रीटमेंट घेण्यासाठी जातात. परंतु, जर बाहेर जाण्याइतका वेळ तुमच्याकडे नसला, तर घरीदेखील अगदी पार्लरप्रमाणे स्पा थेरपी घेता येऊ शकते; ज्यामुळे तुमचे केस अधिक सुंदर, चमकदार होऊन त्यांना सांभाळणे सोपे जाऊ शकते.
त्यासाठी घरात असणाऱ्या वस्तूंचा वापर तुम्ही करू शकता. सुटीच्या दिवशी केसांकडे खास लक्ष द्यायचे असल्यास घरातच पार्लरप्रमाणे स्पा थेरपी कशी करायची ते पाहा.
साहित्य
तुमच्या आवडीचे केसांना लावायचे तेल
हेअर मास्क
मोठ्या दातांचा कंगवा
शॉवर कॅप किंवा प्लास्टिकची पिशवी
टॉवेल
शाम्पू
कंडिशनर
हेअर सिरम
हेही वाचा : केसांना घनदाट व चमकदार ठेवेल घरातील ‘हा’ एक पदार्थ; पाहा या सहा पद्धती
कृती
१. केस विंचरून घ्यावे.
सर्वप्रथम केस कोरडे असताना मोठ्या दातांच्या कंगव्याने केसांमधील गुंता काढून केस विंचरून घ्या.
२. तेलाचा मसाज
तुमच्या आवडीचे केसांना लावायचे तेल हलके कोमट करून घ्या. केसांना भांग पाडून, केसांच्या मुळापासून ते टोकापर्यंत तेल लावून घेऊन छान हलक्या हाताने मसाज करावा. आपले केस शेवटी म्हणजेच केसांची टोके सर्वाधिक कोरडी होत असल्याने त्याकडे जास्त लक्ष द्यावे. मसाज करून झाल्यानंतर अर्धा तास तेल केसांमध्ये राहू द्यावे. जास्त चांगल्या परिणामांसाठी रात्रभरसुद्धा केस तसेच ठेवून देऊ शकता.
३. हेअर मास्क
केसांना आणि त्यांच्या टोकांना तुमच्या आवडीचा हेअर मास्क व्यवस्थित प्रमाणात लावावा. आता तो सगळीकडे समान रीतीने पसरवा. त्यासाठी कंगव्याने केस विंचरून नंतर ते शॉवर कॅप किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बांधून ठेवावेत. त्यामुळे हेअर मास्कमधील घटक केसांमध्ये व्यवस्थित शोषले जाण्यास मदत होते.
४. वाफ घेणे
शक्य असल्यास केसांना स्पामध्ये दिली जाते तशी वाफ देऊ शकता. त्यासाठी स्टीमरचा किंवा गरम केलेल्या टॉवेलचा उपयोग करता येऊ शकतो.
हेही वाचा : कपड्यावरील चहाचे डाग चुटकीसरशी निघून जातील; ‘हे’ पाच घरगुती उपाय करतील तुम्हाला मदत…
५. शाम्पू आणि कंडिशनर
आता हेअर मास्कवरील सांगितलेल्या ठरावीक वेळेतनंतर केस सौम्य शाम्पूने धुऊन घ्या. केसांना तेल लावले असल्याने किमान दोनदा शाम्पूचा वापर करून, केसांवरील तेल निघून गेले असल्याची खात्री करा.
केसांना [मुळांपाशी नाही] व केसांच्या टोकांना व्यवस्थित कंडिशनर लावून काही मिनिटांसाठी केस तसेच ठेवावेत. नंतर कोमट पाण्याने केस धुवावेत.
६. केस पुसणे
ओल्या केसांमधील पाणी मऊ टॉवेलने हलक्या हातांनी टिपून घ्यावे. खरखरीत टॉवेलने, केस झटकून किंवा डोके घासून ते पुसू नये. असे केल्यास केस तुटण्याची शक्यता अधिक असते.
७. हेअर सिरम
केसांची चमक वाढवण्यासाठी, दमट केसांवर एखाद्या चांगल्या सिरमचा वापर करावा. त्यामुळे केसांना सुंदर चमक येण्यास मदत होईल.
८. केसांना कोरडे करणे
केस वळवण्यासाठी त्यांना कोरडे करण्यासाठी हेअर/ ब्लो ड्रायरचा उपयोग करू शकता; परंतु त्यातून खूप जास्त प्रमाणात गरम हवा येणार नाही याची काळजी घ्या. ड्रायर नसल्यास केस मोकळे सोडून, ते हवेवर वाळू द्या.
९. केसांची सजावट
सर्व गोष्टी करून झाल्यानंतर तुम्हाला हवी तशी केसांची ठेवण करू शकता.