आपल्यापैकी बहुतेकांना पावसात भिजायला आवडते. कारण कडक ऊन, आर्द्रता आणि सतत उष्णतेनंतर जेव्हा आकाशातून पाण्याचे थेंब पडतात तेव्हा सगळ्यांनाच दिलासा मिळतो. परंतु बदलणारे हवामान आपल्यासाठी अनेक समस्या सुद्धा घेऊन येते. यातीलच एक समस्या म्हणजे, पावसाळ्यात आपल्या टाळूला खाज येते. ही समस्या सहसा कोंड्यामुळे निर्माण होते. यापासून सुटका मिळवण्यासाठी आपण सर्व प्रकारचे उपाय करतो, परंतु अनेक वेळा आराम मिळत नाही आणि टाळूला खाज येते. आज आपण अशा काही ट्रिक्स जाणून घेणार आहोत, ज्यामुळे आपल्याला या समस्येपासून सुटका मिळू शकते.
टाळूला खाज येत असल्यास ‘या’ गोष्टींचा वापर करा
- मेथी
टाळूला खाज येत असेल तर एक चमचा मेथीच्या दाण्यांमध्ये एक चमचा मोहरी मिसळा. हे मिश्रण बारीक करून त्याची पेस्ट बनवा. यानंतर ही पेस्ट केसांच्या मुळांमध्ये नीट लावा आणि सुमारे ३० मिनिटे तसेच राहू द्या. आता केस धुवून कोरडे करा.
Photos : मुलींना आईकडून वारशामध्ये मिळते Anxiety; संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती
- लिंबू
लिंबाच्या औषधी गुणधर्मांबद्दल आपण सर्वजण जाणतो. हे केसांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामुळे टाळूची खाज दूर केली जाऊ शकते. एक छोटा चमचा लिंबाचा रस घ्या आणि त्यात एक कप पाणी मिसळा. नंतर हे मिश्रण केसांना लावा आणि सुमारे १५ मिनिटे राहू द्या. शेवटी केस पाण्याने धुवा. आठवड्यातून दोन वेळा ही पद्धत अवलंबल्यास ही समस्या लवकर दूर होईल.
- एरंडेल तेल
एरंडेल तेलाच्या मदतीने टाळूची खाज दूर केली जाऊ शकते. यासाठी एक चमचा एरंडेल तेल, एक चमचा मोहरीचे तेल आणि एक चमचा खोबरेल तेल एकत्र करा. तयार झालेल्या तेलाने रात्री केसांच्या मुळांना मसाज करा आणि सकाळी उठून डोके स्वच्छ पाण्याने धुवा. त्याचा परिणाम काही दिवसात दिसून येईल.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)