महिलांना सरळ केसांचे फारच कौतुक असते. ज्या महिलांचे केस सरळ असतात त्या अधिक सुंदर दिसतात असा समज बहुतेक महिलांमध्ये आहे. त्यामुळेच आता भरमसाठ पैसे खर्च करून महिला आपले केस कृत्रिमरित्या सरळ करून घेतात. असे केल्याने अधिक सुंदर दिसता आलं तरीही असे करणे महिलांच्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. अमेरिकेमध्ये केलेल्या एका अभ्यासातून धक्कादायक बाब समोर आली आहे. ही बातमी वाचल्यानंतर तुमच्याही काळजीत भर पडेल.
या अभ्यासामध्ये असे सांगण्यात आले आहे की ज्या महिला केमिकलयुक्त हेअर स्ट्रेटनिंगची उत्पादने वापरतात त्यांना गर्भाशयचा कर्करोग होण्याचा धोका, ही उत्पादने कधीही न वापरणाऱ्या महिलांच्या तुलनेत दुप्पट असतो. नॅशनल कॅन्सर इंस्टीट्यूटच्या जर्नलमध्ये छापून आलेले निष्कर्ष कृष्णवर्गीय महिलांसाठी अधिक प्रासंगिक ठरतात. कारण या महिला अशा उत्पादनांचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात, असे निदर्शनस आले आहे.
शतपावलीचा कंटाळा करणाऱ्यांनी एकदा ‘हे’ फायदे वाचाच; अनेक गंभीर आजारांवरही करता येईल मात
या अभ्यासातून मिळालेली माहिती महत्त्वपूर्ण ठरणार असली, तरीही अभ्यासातून मिळालेल्या निष्कर्षांची पुष्टी करण्यासाठी अधिक संशोधन करणे गरजेचे आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थमधील कॅन्सर एपिडेमियोलॉजिस्ट, प्रमुख लेखिका अलेक्झांड्रा व्हाईट यांनी या अभ्यासाचे नेतृत्व केले. त्यांनी एएफपीला सांगितले की त्यांनी आधी केलेल्या संशोधनातून त्यांना या विषयी अधिक माहिती मिळत गेली. या संशोधनात, कायम टिकणारा केसांचा रंग आणि स्ट्रेटनर यांचा स्तन आणि गर्भाशयाच्या कर्करोगाशी संबंध आढळून आला आहे.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायर्नमेंटल हेल्थ सायन्सेसच्या संशोधकांनी ३३ हजारांहून अधिक महिलांच्या केसांची काळजी घेण्याच्या पद्धतींचे परीक्षण केले. यावेळी त्यांना असे आढळून आले की ज्या महिलांनी कधीही हेअर स्ट्रेटनरचा वापर केला नाही त्यातील अंदाजे १.६४ टक्के महिलांना वयाच्या ७० व्या वर्षी गर्भाशयचा कर्करोग होण्याची शक्यता असते. मात्र, ज्या महिला अशा उत्पादनांचा वारंवार वापर करतात त्यांना हा धोका ४.०५ टक्क्यांपर्यंत वाढतो.
अलेक्झांड्रा व्हाईट यांनी सांगितले की गर्भाशयाचा कर्करोग हा तुलनेने दुर्मिळ प्रकारचा कर्करोग आहे. अशा उत्पादनांमधील रसायनांमध्ये पॅराबेन्स, फॅथलेट्स आणि परफ्यूमचा समावेश होतो. हे घटक अंतःस्रावी प्रणालीमध्ये व्यत्यय आणतात आणि संप्रेरक नियमनावर प्रभाव पडतात. याचाच परिणाम म्हणजे महिलांमध्ये गर्भाशयचा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढते.