Happy Fathers Day 2018 . आई- वडिलांशी असणारं नात्यांचं समीकरण हे प्रत्येकासाठीच वेगळं असतं. प्रत्येकाच्या आयुष्यात या दोन व्यक्तींचं महत्त्व हे शब्दांतही व्यक्त करणं तसं कठीणच. अशा या नात्यांमध्ये आईशी सहसा मुलं जास्त सहजपणे वावरतात, तिच्याकडे व्यक्त होतात. पण, बाबांसोबत वागताना किंबहुना त्यांच्यासमोर नुसतं उभं राहायलासुद्धा काहीजणांची भंबेरी उडते. अर्थात ही आदरयुक्त भीती असते. बाबांशी असणाऱ्या नात्यात मैत्रीचा शिरकाव होण्यासाठी तसा बराच वेळ दवडतो. काहीजण याला अपवादही ठरतात.
असो, शेवटी बाबांविषयी सांगावं आणि बोलावं तितकं कमीच. त्यामुळे यंदाच्या फादर्स डेच्या निमित्ताने बाबांप्रती असणारं तुमचं प्रेम व्यक्त करायचं असेल तर त्यांना एखादी छानशी भेटवस्तू द्या. मुख्य म्हणजे भेटवस्तू लहान असो किंवा मोठी, त्यामागे दडलेल्या भावना तुमच्या बाबांपर्यंत पोहोचल्या म्हणजे मिळवलं. आता तुम्ही म्हणाल बाबांना भेटवस्तू देणं म्हणजे आणखी एक परीक्षा…. घाबरण्याची गरज नाही, कारण आता आपण अशा काही भेटवस्तूंवर नजर टाकणार आहोत, ज्या तुम्ही फादर्स डेच्या निमित्ताने बाबांना भेट स्वरुपात देऊ शकता.
FIFA World Cup 2018 : …म्हणून स्पर्धेसाठी पात्र ठरूनही भारतीय संघ खेळला नाही १९५०चा वर्ल्डकप!
*तुमच्यातल्या दडलेल्या कलाकाराला जागं करत एखादं सुरेख भेटकार्ड तयार करणं हा कधीही सर्वात सोपा आणि आवडीचा मार्ग. मुख्य म्हणजे आपल्या पठ्ठ्याची किंवा परीराणीची कलाकारी पाहून बाबाही भारावतील यात शंका नाही.
*पार्टी वगैरे आमच्या पिढीला आवडत नाही, असं म्हणणाऱ्या बाबांच्याच पिढीला या संकल्पनेचं कौतुक असतं. तर मग, त्यांच्यासाठी आणि त्यांच्या मित्रमंडळींसाठी एका खास पार्टीचं आयोजन करणं हासुद्धा उत्तम पर्याय आहे.
*ट्रेकिंग, सायकलिंग, फिटनेस या सर्व गोष्टींकडे तुमच्या सुपरस्टार बाबांचा कल असेल, तर त्यांच्यासाठी एखादी चांगल्या ब्रँडची सायकल, ट्रेकिंगचे शूज किंवा त्याच्याशी निगडीत एखादं उपकरण तुम्ही भेट देऊ शकता.
*नव्या तंत्रज्ञानाशी बाबांची चांगली मैत्री असेल तर त्यांना एखादा टॅब, आयपॅड, लॅपटॉप भेट देण्याचा पर्यायही वाईट नाही.
*जुन्या पिढीचा आवडीचा छंद म्हणजे अनमोल गोष्टींचा संग्रह. याच अनमोल गोष्टींप्रती असणारं त्यांचं प्रेम ओळखत बाबांसाठी तुम्ही एखादी छानशी जुनी गोष्ट त्यांना भेट स्वरुपात देऊ शकता.
*फोटोग्राफीची आवड असणाऱ्या बाबांसाठी तुम्ही छानसा कॅमेरा भेट देऊ शकता. मुळात बाबांनी टीपलेल्या काही जुन्या- नव्या फोटोंचा कोलाज, एखादा व्हिडिओ तयार करुन त्यांच लहानसं स्क्रीनिंगही तुम्ही बाबांसाठी आयोजित करु शकता.
*खेळाची आवड कोणाला नसते? काय म्हणता, तुमच्याही बाबांना खेळाची आवड आहे. तर मग त्यांच्यासाठी त्यांच्याच आवडीच्या खेळाशी निगडीत एखादी गोष्ट भेट म्हणून द्या.
*घड्याळ, एखाद्या चांगल्या ब्रँडचा गॉगल, पर्फ्युम या गोष्टी बाबांना आवडतातच. त्यामुळे डोक्यात भेटवस्तू घेण्यासाठीचे असंख्य प्रश्न असतील तर हे पर्याय कधीही उत्तम.
*वाचनाची आवड असणाऱ्या गटात तुमचेही बाबा येत असतील तर त्यांच्या आवडत्या लेखकाचा एखादा कथासंग्रह किंवा त्यांना आवडेल अशा पठडीतील एखादं पुस्तक त्यांना भेट द्या.
*चित्रपट किंवा नाटक पाहण्यास बाबांचं प्राधान्य असेल, तर ते पाहण्यासाठी त्यांना घेऊन जा. नेहमीच डेटवर जाण्यासाठी खास व्यक्तीची साथ तुम्हाला मिळेलच. पण, एक खास दिवस बाबांसाठी, आयुष्यातील अतिशय महत्त्वाच्या डेटसाठी नक्कीच राखून ठेवा.