Krishna Janmashtami 2024 : देशभरात कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. कृष्ण जन्माष्टमी हा सण भगवाण कृष्णाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. हिंदू धर्मामध्ये या सणाला विशेष स्थान आहे. श्रावणातल्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला हा सण साजरा केला जातो. यंदा २६ ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाईल. जन्माष्टमीचा सण भारतातच नव्हे, तर जगभरातील अनेक देशांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी रात्री १२ वाजता भगवान श्रीकृष्णाची विधिवत पूजा केली जाते. या दिवशी उपवास करण्याची परंपरा आहे. तसेच वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवण्याचीही परंपरा आहे. विशेषत: कोकणात कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी शेवग्याची खोबरं घालून केलेली भाजी, आंबोळ्या आणि काळ्या वाटण्याची उसळ बनवण्याची परंपरा आहे. जन्माष्टमीला कोकणातील घराघरांत तुम्हाला हे पदार्थ बनवले गेल्याचे पाहायला मिळतात. पण, जन्माष्टमीच्या निमित्तानेच कोकणात हे पदार्थ का बनवले जातात? त्यामागचे कारण आपण जाणून घेऊ…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आंबोळी आणि काळ्या वाटाण्याची उसळ हे कोकणातील अतिशय लोकप्रिय पारंपरिक पदार्थ आहेत. कोकणात भाताचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्याने येथील अनेक पदार्थ हे भातापासून बनविले जातात. त्यात आंबोळी हा देखील तांदळापासून तयार होणारा पदार्थ आहे. त्याचबरोबर उसळ हा पदार्थ महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी बनविला जातो; पण काळ्या वाटाण्याची उसळ हा कोकणातील स्पेशल पदार्थ आहे. कोकणात प्रत्येक सणासुदीला, लग्न समारंभ आणि धार्मिक कार्याला काळ्या वाटाण्याची उसळ किंवा सांबार बनविले जाते. पण, हे पदार्थ शरीरास कितपत फायदेशीर आहेत आणि ते बनविण्यामागचा मुख्य उद्देश काय होता? हे आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊ…

Read More Krishna Janmashtami 2024 Related News : जन्माष्टमीनिमित्त अस्सल कोकणी पद्धतीने बनवा काळ्या वाटाण्याची उसळ आणि आंबोळी; पटकन नोट करा रेसिपी

जन्माष्टमीच्या दिवशीच ‘हे’ पदार्थ का बनविले जातात?

खाद्यसंस्कृती तज्ज्ञ मोहसिना मुकादम यांच्या मते, कोकणात कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी शेवग्याची खोबरं घालून केलेली भाजी, आंबोळ्या आणि काळ्या वाटाण्याची उसळ बनविण्याचे कारण म्हणजे पावसाळ्यात हे पदार्थ बनविण्यासाठी लागणारे साहित्य सहज उपलब्ध असायचे. म्हणजे कोकणात अनेकांच्या घरासमोर शेवगा आणि नारळाचे झाड असायचे, तसेच काळे वाटाणे आणि तांदूळ अनेकांच्या घरी असायचेच, यामागचे कारण म्हणजे कोकणात भात शेती मोठ्याप्रमाणात होते याशिवाय मूग, काळे वाटाणे अशा कडधान्यांचे पिकंही घेतले जाते. त्यामुळे हे पदार्थ आणण्यासाठी त्यांना सहसा लांब कुठे दुकानात, बाजारात जाण्याची गरज भासायची नाही, हल्ली शेती करण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी सणानिमित्त हे पदार्थ मात्र बनवले जातात.

त्याशिवाय या पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेट, मिनिरल्ससह अनेक पोषक घटक असतात; जे त्या ऋतूनुसार आपल्या शरीराला फायदेशीर असतात. त्यामुळे श्रावणात कृष्ण जन्माष्टमीनिमित्त हे पदार्थ आवर्जुन बनवले जातात. विशेषत: तळकोकणात हे पदार्थ आवडीने खाल्ले जातात. या भागात काळ्या वाटण्याची भाजी बनवण्याची पद्धत देखील काहीशी वेगळी आहे, चिकण, मटण ज्याप्रकारे आपण वाटण, मसाले टाकून बनतो अगदी त्याच पद्धतीने ही भाजी बनवली जाते. त्यानंतर ती भाकरी किंवा आंबोळ्यांबरोबर खाल्ली जाते.

या भाज्यांमध्ये कोणते पोषक घटक असतात?

आहारतज्ज्ञ पल्लवी सावंत म्हणाल्या की, कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी खरं तर दही, पोहे, चणा डाळ, खोबरे यांचे महत्त्व आहे. मात्र कालपरत्वे सण साजरे करण्यासाठी उपलब्ध पदार्थांचा वापर करून प्रसाद तयार करण्याचे प्रमाण वाढत आहे. त्याच पद्धतीने कोकणातही प्रत्येक सणाला उपलब्ध पदार्थांमधून खास पदार्थ तयार करण्याची परंपरा सुरू झाली असावी. दरम्यान, कोकणात कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बनविल्या जाणाऱ्या पदार्थांमागे वेगळा इतिहास असला तरी हे पदार्थ पावसाळ्यात शरीरास अनेक आवश्यक पोषक घटक पुरविण्याचे काम करतात.

शेवग्याची भाजीतील पोषक घटक

शेवग्याच्या पानांमध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. ही पाने पचायला हलकी असतात, तसेच यातील गुळगुळीतपणामुळे पचनसंस्थेचे कार्य सुरळीत करण्यास मदत होते. आतड्यांच्या आरोग्यासाठीही हे अधिक फायदेशीर मानली जातात. त्याशिवाय शेवग्याच्या पानांच्या सेवनाने ग्लायसेमिक इंडेक्स कमी करण्यास मदत होते.

आंबोळीमधील पोषक घटक

उडीद आणि तांदूळ आंबवून, त्यापासून तयार केल्या जाणाऱ्या लुसलुशीत आंबोळ्या आतड्यातील सूक्ष्मजीवांना उत्तम प्रकारे कार्यरत राहण्याची ऊर्जा देतात. चवदार आंबोळीमुळे शरीरास ऊर्जा मिळते. त्यात प्रथिने आणि खनिजांचे प्रमाण अधिक असते आणि त्या पचायलाही हलक्या असतात.

काळ्या वाटाण्याची उसळ आणि त्यातील पोषक घटक

कोकणात पूर्वी सहज उपलब्ध होणारे कडधान्य म्हणजे काळे वाटाणे. त्यामुळे काळे वाटाणे अधिक प्रमाणात खाल्ले जायचे. आजही कोकणातील अनेक कार्यक्रमांत तुम्हाला काळ्या वाटाण्याची उसळ किंवा सांबार सहज पाहायला मिळेल. त्यातही शरीरास आवश्यक ऊर्जेचे प्रमाण अधिक आहे. त्याशिवाय त्यात मॅग्नेशियम, झिंक यांसारखी खनिजे आहेत; जे आपले हृदय, स्नायू व मूत्रपिंडाचे कार्य सुरळीत पार पाडते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Happy krishna janmashtami 2024 why amboli kalya vatanyachi usal sevgya bhaji made on occasion of krishan janmashtami in konkan read why sjr