भारत हा सणवारांचा देश म्हणून ओळखला जातो. भारतीय संस्कृतीत जवळपास दर महिन्याला एक सण असतोच. थंडीच्या दिवसात, वर्षाच्या सुरुवातीला येणारा सण म्हणजे मकर संक्रांती. विशेष म्हणजे इतर सणांची तारीख ही पंचांगानुसार बदलती असते मात्र संक्रांत ही दरवर्षी १४ जानेवारी या तारखेलाच येते. यावर्षी संक्रात १५ जानेवारी रोजी आली आहे. मकर संक्रांतीला ज्याप्रमाणे अध्यात्मिक महत्त्व आहे त्याचप्रमाणे शास्त्रीय महत्त्वही आहे. या दिवसा आधी रात्र मोठी असते आणि दिवस लहान असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र आणि दिवस समान असतात. या नंतर रात्री लहान दिवस मोठा होत जातो. तसेच संक्रांतीनंतर ऋतूबदल होण्यास सुरुवात होते. हवेतील गारवा कमी होऊन उष्णता वाढायला लागते. संक्रांतीच्या आधीच्या दिवसाला भोगी असे म्हणतात. थंडीत बाजारात जास्त भाज्या उपलब्ध असल्याने सर्व भाज्या खाऊ शकतो. भोगीच्या दिवशी सर्व भाज्या एकत्र करुन भाजी केली जाते. तसेच बाजरी शरीर उष्ण ठेवण्यास आवश्यक असल्याने या दिवशी तीळ लावून बाजरीची भाकरी खाण्याचीही पद्धत आहे.
मकर संक्रांती म्हणजे काय ?
मकर ही एक रास असून सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला संक्रांती असे म्हटले जाते. तर मकर संक्रांतीच्या दिवशीच सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून याला मकर संक्रांती म्हणतात. आता हा सण दरवर्षी एकाच तारखेला कसा येतो असा प्रश्नही आपल्यातील अनेकांना निश्चितच पडला असेल. तर हा हिंदु संस्कृतीतील एकमेव असा सण आहे जो त्याच तारखेला येतो. याचे कारण म्हणजे तो सूर्याच्या (सूर्याच्या स्थानावर) कॅलेंडरनुसार बाकी सर्व सण हे चंद्र कॅलेंडरवर (चंद्राच्या स्थानावर) आधारलेले असतात. सोलर सायकल ही दर ८ वर्षांनी एकदा बदलते, त्या वेळी मात्र हा सण १५ जानेवारीला येतो. यावर्षीही संक्रात १५ जानेवारी रोजी आली आहे.
आणखी वाचा – मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या भोगीचं महत्व माहित आहे का?
भारताशिवाय इतर देशातही होतो साजरा
संक्रांत हा सण केवळ भारतातच साजरा होतो असे नाही तर आशिया खंडातील अनेक ठिकाणी तो साजरा केला जातो. नेपाळमध्ये याला माघी किंवा माघी संक्रात, थायलंड मध्ये सोंग्क्रान, लाओस मध्ये पी मा लाओ आणि म्यानमार मध्ये थिंगयान असे म्हंटले जाते. भारतात देखील याला लोहरी, मकर संक्रांती, पोंगल इत्यादी नावे आहेत. या सणाला गुजरात आणि राजस्थान राज्यांमध्ये पतंगाचा सण म्हणून ओळखले जाते. यामागे करमणूक होणे हा उद्देश असला तरीही शास्त्रीय कारणही आहे. पतंग सकाळी सकाळी उठून उडवल्याने शरीराला ऊन लागून भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन D मिळते. याने थंड हवे पासून होणाऱ्या समस्या पासून दूर होण्यास मदत होते.
आणखी वाचा – Makar Sankranti : हलव्याच्या दागिन्यांनी खुलवा तुमचे सौंदर्य
तीळ आणि गूळ यांचे काय महत्व आहे?
मकर संक्रांतीला तीळ आणि गूळ यांचे लाडू किंवा वड्या करण्याची पद्धत आहे. यामागे भूतकाळात झालेल्या कडू आठवणींना विसरून त्यात तीळ आणि गूळ यांचा गोडवा भरायचा असे म्हटले जाते. पण या गोष्टीलाही वैत्रानिक दृष्टीकोन आहे. तीळ हे उष्ण आणि स्निग्ध असतात. थंडीत शरीराला उष्णता आणि स्निग्धतेची आवश्यकता असते. तसेच गुळातही उष्णता असल्याने या पदार्थांचे महत्त्व आहे.