आई- वडिलांनंतर आपल्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्ती म्हणजे भावंड. कधी आपण त्यांच्यासोबत खेळतो, कधी भांडतो, तिरस्कार करतो, कधी अनेक आठवणी शेअर करतो, कधी स्पर्धा करतो, मात्र त्यांच्याशिवाय आपलं आयुष्य अपूर्ण असतं. यात मोठी भावंड ही आई- वडिलांनंतरचे आपले दुसरे पालक असतात. कारण काही गोष्टी चुकल्या तर मोठी भावंड ही हक्काने ओरडतात, समजवतात. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात भावंडांविषयी एक आपुलकीचे, जिव्हाळ्याचे नाते असते. अगदी लहानपणापासूनंच सगळ्या गोष्टी शेअर करण्यासाठी भावंड हक्काची माणसं असतात. त्यामुळे भावंडांचे नाते हे खूप मौल्यवान असते. याच पार्श्वभूमीवर दरवर्षी १० एप्रिल हा दिवस भावंड दिवस अर्थात सिबलिंग्स डे म्हणून साजरा केला जातो.
भावंड दिवसाचे महत्त्व (Siblings Day 2023)
भावंड ही आपल्या आयुष्यातील पहिले चांगले मित्र असतात. वेळेप्रसंगी हे काहींचे शत्रूही बनतात, परंतु आयुष्यात जेव्हा काळजीचा, दु:खाचा प्रसंग येतो तेव्हा भाऊ- बहिण दोघेही एकमेकांसोबत असतात. बिनशर्त प्रेम आणि शेवटपर्यंत एकमेकांसोबत राहण्याचे वचन दिलेले सर्वात गोड नाते हे भाऊ-बहिणीचे असते. त्यामुळे आपण लहानाचे मोठे होण्यापासून आपल्या जीवनाला आकार देण्यात भावा-बहिणीची महत्त्वाची भूमिका असते.
पण आपल्या आयुष्यात भावंडांना किती महत्त्व आहे हे सांगण्यासाठी भावंड दिवस हा विशेष दिवस आहे. या दिवशी तुम्ही तुमच्या भावंडांना भेटवस्तू, देऊन, कौतुकाचे दोन शब्द बोलून आणि प्रेम व्यक्त करत हा दिवस साजरा करु शकता.
मानेवरील अतिरिक्त चरबी कमी करायचीय? मग घराबसल्या करा ‘ही’ ५ योगासने आणि पाहा फरक
काय आहे इतिहास? (Siblings Day History)
न्यूयॉर्कमधील पॅरालीगल क्लॉडिया एव्हर्ट या महिलेने अगदी लहान वयात आपला भाऊ अॅलन आणि बहिण लिसेट यांना गमावले. त्यामुळे त्यांची आठवण म्हणून हा दिवस साजरा करण्यात सुरुवात झाली. पहिल्यांदा १९९५ मध्ये हा दिवस साजरा करण्यात आला. क्लॉडियाने तिच्या दोन्ही भावंडांना दोन वेगवेगळ्या अपघातात गमावले त्यामुळे हा दिवस साजरा करून त्यांनी आपल्या भावंडांविषयीचे प्रेम, सन्मान व्यक्त करण्याचे ठरवले. यानिमित्ताने आपल्या आयुष्यातील भावंडांविषयी असलेले महत्व, प्रेम अधोरेखित करता येते. यासाठी क्लॉडियाने १० एप्रिल हा दिवस निवडला. कारण या दिवशी तिची बहीण लिसेट हिचा वाढदिवस असायचा. यानंतर तिने त्याचवर्षी सिबलिंग फाउंडेशनची स्थापना केली. याअंतर्गत परिस्थिती, जन्म, परस्पर कौटुंबिक कलह यामुळे विभक्त झालेल्या भावंडांना पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जातो.