Hardik Pandya Watch in Champions Trophy Final: भारताचा अष्टपैलू तडाखेबाज खेळाडू हार्दिक पंड्याच्या कामगिरीची यंदा फारशी चर्चा झाली नसली, तरी त्याच्या घड्याळांची मात्र चांगलीच चर्चा झाली. हार्दिकनं पाकिस्तानविरुद्धच्या साखळी सामन्यात घातलेल्या एक्सक्लुझिव्ह घड्याळाची किंमत तब्बल ६ ते ७ कोटींच्या घरात असल्याचं समोर आलं होतं. आता एकीकडे अवघा देश टीम इंडियानं न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामन्यात मिळवलेल्या दणदणीत विजयाचा आनंद साजरा करत असताना दुसरीकडे या सामन्यात हार्दिक पंड्यानं घातलेलं असंच आणखी एक एक्सक्लुझिव्ह घड्याळ आणि त्याची किंमत याची जोरजार चर्चा नेटिझन्समध्ये पाहायला मिळत आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ६ कोटींचं घड्याळ
हार्दिक पंड्याच्या अॅक्सेसरी बॅगमध्ये अनेक महागड्या आणि ब्रँडेड गोष्टी पाहायला मिळतात. त्यात हार्दिक पंड्याचं घड्याळ प्रेम तर जगजाहीर! पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हार्दिकनं रिचर्ड मिले आरएम २७-०२ (Richard Mille RM 27-02) हे महागडं घड्याळ घातलं होतं. या घड्याळाची किंमत ८ लाख डॉलर्स म्हणजेच जवळपास ६.९३ कोटी रुपये इतकी असल्याचं सांगितलं जात आहे.
अंतिम सामन्यातल्या घड्याळाची किंमत…
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियानं अंतिम सामन्यात विजय मिळवल्यानंतर स्पर्धा जिंकल्याबद्दल भारतीय संघाला जवळपास २३ लाख डॉलर्सचं बक्षिस मिळालं. ही रक्कम भारतीय चलनात जवळपास २० कोटींच्या आसपास आहे. पण अंतिम सामन्यात हार्दिक पंड्यानं घातलेल्या एक्सक्लुझिव्ह घड्याळाची किंमत तब्बल १८ ते २१ कोटींच्या घरात असल्याचं समोर आलं आहे!
‘इंडियन होरोलॉजी’च्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार हार्दिक पंड्याच्या घड्याळाची बाजारपेठेतली किंमत जवळपास १५ लाख डॉलर्स अर्थात ९ कोटी १५ लाखांच्या घरात असल्याचं समोर आलं होतं. पण First Time Class Pieces आणि Jaztime यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या अशा एक्सक्लुझिव्ह घड्याळांच्या यादीनुसार हार्दिकनं घातलेल्या या घड्याळाची किंमत थेट २१ ते २५ लाख डॉलर्स इतकी वाढली आहे! भारतीय चलनात ही किंमत जवळपास १८ ते २१ कोटी इतकी आहे. त्यामुळे हार्दिकच्या घड्याळाची किंमत ही जवळपास आख्ख्या टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफीसारखी स्पर्धा जिंकल्यानंतर मिळालेल्या बक्षिसाच्या एकूण रकमेपेक्षाही काकणभर जास्तच आहे!
हार्दिकनं कोणतं घड्याळ घातलं होतं?
न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात हार्दिक पंड्यानं ‘रिचर्ड मिले आरएम २७-०४ राफेल नदाल टुरबिलियन’ हे घड्याळ घातलं होतं. जगभरात आजतागायत अशी फक्त ५० घड्याळं बनवण्यात आली आहेत. हे घड्याळ अतिशय दुर्मिळ आणि खास खेळाडूंसाठी बनवण्यात आलं आहे. जगज्जेता टेनिसपटू राफेल नदालच्या कोलॅबोरेशनमध्ये ही घड्याळं बनवण्यात आली आहेत.
१. या घड्याळाचं वजन त्याच्या बेल्टसह अवघं ३० ग्रॅम आहे! एखाद्या क्रिकेट बॉलपेक्षाही याचं वजन कमी आहे.
२. एखाद्या क्रिकेटपटूनं घड्याळ घातलं असताना त्याला बसू शकणाऱ्या धक्क्यांपेक्षा कितीतरी जास्त धक्के सहन करू शकणारं तंत्रज्ञान यात वापरण्यात आलं आहे.
३. टेनिस रॅकेटच्या जाळीप्रमाणे या घड्याळात स्टीलच्या तारांची डिझाईन तयार करण्यात आली आहे.
४. घड्याळाची केस TitaCarb अर्थात कार्बन फायबरपासून बनवण्यात आली आहे.