भारतातील विविध जाती-धर्म, संस्कृती आणि रितीरिवाजांचे जगात अनेक लोकांना आकर्षण आहे. विविधतेने नटलेल्या या देशाच्या खाण्यात सुद्धा वैविध्य आहे. या खाण्याची चव चाखण्यासाठी जगातील अनेक पर्यटक भारत भेटीवर येतात. त्याचप्रमाणे विदेशी सेलिब्रिटी शेफ सुद्धा याकडे आकर्षित होतात. ऑस्ट्रेलियन सेलिब्रिटी शेफ गेरी मेहिगन हे यापैकीच एक आहेत. दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांकडे आकर्षित झालेल्या गेरींनी भारतीय खाद्यपदार्थांमध्ये वापरले जाणारे कढीपत्तासारखे घटक आपल्या जेवणात वापरण्यास सुरूवात केली. मेहिगन यांनी नुकतीच आपली भारत भेट पूर्ण केली असून, भारतीय खाद्यपदार्थातील वैविध्यता पाहून ते प्रभावित झाले. ‘मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया’ हा ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध रियालिटी शो चालवणा-या मेहिगन यांनी ऑस्ट्रेलियन लोकांना दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांच्या दुनियेची ओळख करून देण्याची इच्छा व्यक्त केली. मेहिगन म्हणाले, भारतीय पदार्थ खूप चविष्ट असून, दक्षिण भारतीय पदार्थ माझ्यासाठी नाविन्यपूर्ण आहेत. मी अप्पम बनविण्याचा प्रयत्न केला. माझ्या या भेटी दरम्यान पदार्थ बनविण्यासंदर्भातल्या काही टिप्स आणि ट्रिक्स सुद्धा जाणून घेतल्या. मेहिगन हे दिल्लीतील ‘ओझी फेस्ट’साठी आले होते. दिल्लीत असताना त्यांनी चांदनी चौकातील प्रसिद्ध मसाले बाजारास भेट देऊन अनेक प्रकारचे मसाले खरेदी केले. रस्त्यावर मिळणा-या खाद्यपदार्थांच्या कायम शोधात असणारे मेहिगन म्हणाले, मसाल्याच्या बाजारात फिरताना मला मसाल्याचे अनेक रंग आणि प्रकार पाहायला मिळाले. हे सर्व अदभूत होते. मी या सर्वाचा आनंद घेत असताना, बरोबरच्या लोकांचे डोळे मात्र मसाल्याच्या तीव्रतेने पाणावले होते.
भारतात असतना मेहिगन यांनी मुंबईतील डब्बावाल्यांबरोबर पदार्थ बनवले, चेन्नईतील एका दुचाकी बनवणा-या कारखान्याला भेट दिली, दिल्लीतील ऑस्ट्रेलियन दुतावासामध्ये बारबेक्यू बनवले आणि जयपूरमध्ये एका संगीत समारंभाला उपस्थिती लावली. ऑस्ट्रेलियात स्वत:चे रेस्तरॉं असलेले मेहिगन म्हणतात, ट्विटरवर अनेकवेळा मला पनीर मसाला आणि चाटच्या रेसपीज विचारल्या जातात किंवा दिल्या जातात.
सध्या ते अप्पम, मसाला डोसा आणि मालपुवा या पदार्थांकडे आकर्षित झाले आहेत. मे २०१४ मध्ये त्यांचे नवीन पुस्तक बाजारात येत असून, या पुस्तकात अनेक भारतीय पाककृतींना स्थान देण्यात आले आहे.