Having Excessive Hair Fall And Don’t Know Why? आपण सर्वांनी कधी ना कधी एनर्जी ड्रिंक्सचं सेवन केलंच असेल. ड्रिंक्स नेहमीच तुम्हाला त्वरित बूस्ट मिळविण्यात मदत करतात. पण तुम्हाला माहीत आहे का की, या एनर्जी ड्रिंक्समुळे फायदा होण्यापेक्षा नुकसानच जास्त होते; विशेषतः तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी जगभरातील अनेक अभ्यासांनी असे सुचवले आहे की, एनर्जी ड्रिंक्स, जे इन्स्टंट कॅफिन आणि साखरेची पातळी वाढवतात, ते काही त्रासदायक दुष्परिणामांशी जोडलेले आहे. तर, चला जाणून घेऊ की एनर्जी ड्रिंक्स तुमच्या केसांवर कसा परिणाम करतात ते.

एनर्जी ड्रिंक्सचा केसगळतीशी कसा संबंध?

एनर्जी ड्रिंक्समध्ये विशेषतः पॅकेज केलेल्या ड्रिंक्समध्ये बहुतेकदा कॅफिन, साखर, अमिनो अॅसिड आणि विविध घटक असतात. न्यूट्रिएंट्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, कॅफिन आणि साखरेचे सेवन शरीरातील हार्मोनल संतुलन बिघडवते, ज्यामुळे केसगळती होते, विशेषतः पुरुषांमध्ये. बीजिंगमधील सिंघुआ विद्यापीठातील तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासात असा निष्कर्ष काढण्यात आला आहे, “पेयांचा एक विशिष्ट संच पुरुषांमध्ये टक्कल पडण्याचा धोका ३० टक्क्यांनी वाढवू शकतो”. त्यांनी असे म्हटले आहे की, दर आठवड्याला “एक ते तीन लिटर” एनर्जी ड्रिंक्स पिणाऱ्या पुरुषांना केसगळतीचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते.

कॅफिन आणि केस गळण्यामागील विज्ञान

जवळजवळ प्रत्येक एनर्जी ड्रिंकमध्ये कॅफिन हा एक प्रमुख घटक आहे, जो तुम्हाला दीर्घकाळ ऊर्जावान राहण्यास मदत करतो. इंटरनॅशनल जर्नल ऑफ डर्मेटोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, जास्त प्रमाणातील कॅफिन केसांच्या कूपांना उत्तेजित करू शकते, ज्यामुळे कालांतराने केस पातळ होतात. फिटनेस प्रशिक्षक प्रियांक मेहता पुढे म्हणतात की, कॅफिनमुळे इन्सुलिन स्पाइक शरीरात डीएचटी पातळी (डायहाइड्रोटेस्टोस्टेरॉन)चे उत्पादन वाढवू शकते, जो केस गळण्याशी थेट संबंधित हार्मोन आहे.

साखर आणि केस गळतीमागील विज्ञान

पोषणतज्ज्ञ तान्या शर्मा स्पष्ट करतात की, जगभरातील संशोधनातून असे दिसून आले आहे की, मधुमेह आणि लठ्ठपणाला कारणीभूत ठरणाऱ्या इन्सुलिन प्रतिरोधामुळे पुरुष आणि महिला असा दोघांमध्येही केस गळू शकतात किंवा टक्कल पडू शकते. इन्सुलिन प्रतिरोधामागील सर्वांत मोठे कारण म्हणजे साखर, रिफाइंड कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असलेला आहार.

ताणतणावाचे कारण

आहारतज्ज्ञ न्मामी अग्रवाल यांच्या मते, “केसगळतीसाठी ताणतणाव हे एक मुख्य कारण आहे.” आणि जास्त प्रमाणात कॅफिनचे सेवन शरीरात तणाव संप्रेरक वाढवू शकते, ज्यामुळे कालांतराने चिंता, निर्जलीकरण व दीर्घकालीन ताण येऊ शकतो. अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की, दीर्घकालीन ताण केसगळतीशी संबंधित आहे.

नैसर्गिक पेये जी तुम्हाला कोणत्याही दुष्परिणामांशिवाय ऊर्जा देतात

१. नारळ पाणी : नारळ पाणी हे कदाचित सर्वांत लोकप्रिय नैसर्गिक ऊर्जा पेयांपैकी एक आहे, जे तुम्हाला हायड्रेटेड राहण्यास मदत करते. त्यात कॅलरीज आणि फॅट्सदेखील कमी असतात, ज्यामुळे ते जागृत राहण्यासाठी आणि ऊर्जावान राहण्यासाठी एक आरोग्यदायी पेय बनते.

२. कोम्बुचा: कोम्बुचामध्ये नैसर्गिक कॅफिन असते, जे तुमच्या शरीरात ऊर्जा भरते. त्यासोबतच जीवनसत्त्वे जोडण्यास मदत करते, ज्यामुळे पचन आरोग्य आणि संबंधित शारीरिक कार्यांना मदत होते.

३. सत्तू शरबत : हे एक पारंपरिक भारतीय पेय आहे, जे तुम्हाला कार्बोहायड्रेट्स, प्रथिने व खनिजे पुरवते. त्यात कमी सोडियम सामग्री आणि ग्लुटेनमुक्त गुणधर्मदेखील आहेत, जे तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते.

४. कोल्ड प्रेस्ड फ्रूट ज्यूस : फळांमध्ये नैसर्गिक साखर, जीवनसत्त्वे व खनिजे असतात, जी तुमच्या शरीराला त्वरित उर्जेने चालना देण्यास मदत करतात.