झोप न येणं ही आता एक सामान्य समस्या बनत चालली आहे. प्रत्येकाच्याच आयुष्यात असणारे ताणतणाव, मानसिक अस्वास्थ्य आणि मोबाईल किंवा लॅपटॉप स्क्रीनसमोर बसून तासंतास केलेले काम यामुळे बरेचदा रात्री झोप न लागण्याची समस्या आपल्याला भेडसावते. झोप लागण्यासाठी १ ते १०० आकडे मनात मोजण्याचा सल्ला तुम्हालाही तुमच्या वडीलधाऱ्या माणसांनी नक्कीच दिला असेल. कधीकधी आपण आपले मनातील विचार दूर करण्यासाठी गाणी ऐकतो, मात्र अनेक प्रयत्न केल्यानंतरही आपल्याला शांत झोप लागत नाही. अशावेळी काय करायचं हा प्रश्न अनेकांना पडतो.
आपल्या चांगल्या आरोग्यासाठी योग्य झोप घेणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. मात्र जर तुम्हाला शांत झोप लागण्यास अडचण येत असेल तर अशा परिस्थितीत तुम्हाला ४-७-८ श्वसन तंत्र मदत करू शकते. झोपेशी संबंधित हा उपाय योगिक तंत्रावर आधारित असून तो श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो. तज्ज्ञांनी असं सांगितलंय की या उपायाचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनात करायला सुरुवात केल्यास आपल्याला काही मिनिटांमध्ये झोप लागू शकते. तसेच, यामुळे आपल्या शरीरातील तणाव कमी होण्यासही मदत होऊ शकते. आज आपण ४-७-८ श्वासोच्छवासाचे तंत्र काय आहे ते जाणून घेऊया.
Brown Sugar Vs White Sugar: आरोग्यासाठी चांगली साखर कुठली? तज्ज्ञांनी दिलं ‘हे’ उत्तर
शरीराला आराम देण्यासाठी हे तंत्र तयार करण्यात आलं असल्याचं अनेक आरोग्य तज्ज्ञ म्हणतात. या तंत्रानुसार, काही काळ श्वास रोखून धरला जातो. याच्या मदतीने शरीराला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन पोहचवले जाते. या व्यायामामुळे मन आणि शरीराला आराम देऊन श्वास नियंत्रणावर लक्ष केंद्रित केले जाते.
हा व्यायाम करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. यावेळी मन आणि डोकं शांत ठेवावं. आधी सरळ झोपा, यावेळी तुमचा चेहरा छताकडे असुद्या. श्वास घेताना आपली जीभ एकाच जागी ठेवावी. ही स्थिती ४-५ वेळा किंवा झोप येईपर्यंत पुन्हा करा. ही प्रक्रिया काही लोकांसाठी कठीण असू शकते, परंतु सरावाने तुम्हाला हे जमू शकते.
श्वास घेण्याचा सराव कसा करावा?
- सर्व प्रथम, आपले ओठ थोडे उघडा आणि हलका आवाज काढा.
- या दरम्यान, तोंडातून पूर्णपणे श्वास सोडा.
- यानंतर, आपले ओठ बंद करा आणि श्वास घेताना आपल्या मनात ४ आकडे मोजा.
- नंतर सात सेकंद श्वास रोखून ठेवा.
- आठव्या सेकंदाच्या सुरूवातीस, तोंडातून एकाच वेळी श्वास सोडा.
Brown Sugar Vs White Sugar: आरोग्यासाठी चांगली साखर कुठली? तज्ज्ञांनी दिलं ‘हे’ उत्तर
४-७-८ श्वास तंत्राचे फायदे
- श्वासोच्छवासात सुधार.
- डोकं आणि मन शांत होण्यास मदत.
- एकाग्रता वाढते.
- झोपण्याची पद्धत अधिक चांगली होते.
- उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
- शरीराला आराम मिळतो.
जर तुम्हाला झोप येत नसेल किंवा तुमची झोपेची पद्धत बिघडली असेल तर त्याचे कारण जाणून घेण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.