सौजन्य –
हेडसेट.. ज्याच्या-त्याच्याकडे आज मिळणारी गोष्ट. मग तो स्टेशनवरून घेतलेला असो किंवा महागडय़ा शोरूममधून! मोबाइलवर हवे ते गाणे- अल्बम बघा आणि लावा कानात, मग कोणी कितीही हाका मारो.. हॉर्न वाजवो.. आपण, आपलं गाणं आणि बॉण्ड म्हणजे हेडसेट !!!
अगदी सुरुवातीला संदेश ऐकण्यासाठी वापरण्यात आलेलं हे उपकरण आज ज्याच्या-त्याच्या खिशात असते. मिलिटरीमध्ये आणि रेडिओ दूरसंचारामध्ये (Telecommunication) चा सर्वाधिक वापर होता. तेव्हा रेडिओला स्पीकर्स होते पण विसाव्या शतकाच्या मावळतीला वॉकमॅन, म्युझिक प्लेअर आणि त्याच्या जोडीने हेडफोन आले, मग कालांतराने त्यांचे प्रकार आणि रूप बदलले. डिझायिनगच्या कल्पनेने ‘इअरबड’ जन्माला आला. सध्याचं ब्ल्यूटूथ हेडसेट जे वायरलेस आहे, त्याने खिशापासून कानापर्यंत लोंबकळणाऱ्या वायरला टाटा म्हटले. दोन कानांत हेडफोन एक तर डोक्यावरून नाहीतर मानेवरून केलेली संक्षिप्त जोडणी (Compact) असे लेटेस्ट स्वरूप खूप जणांना आवडले. हेडसेटही अशाच वस्तूंच्या यादीत मोडतो, ज्यांचा वापर योग्य वेळी आणि योग्य ठिकाणीच केला तर उत्तम, नाहीतर नुकसान असते.
प्रत्येकाच्या शर्टाच्या आतून असलेले हे कनसिल्ड वायिरग (Concealed Wiring) बाहेरून दिसत नाही आणि त्याचे इयरबड्स बाहेर मानेवर लटकवलेले असतात. अशी गाणी ऐकण्यात काही गर नाही पण आपण ते कसे ऐकतो आणि कधी ऐकतो, कुठे ऐकतो यावर अवलंबून असते. हेडफोनचा वापर वाढतो तेव्हा अपघाताची शक्यताही वाढते. लोकांचे जीव जातात, तेव्हा या गोष्टी गांभीर्याने येऊ लागतात.
या विषयावर थोडी आकडेवारी मिळालीय. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला साधे हेडफोन होते. फोनवरून एफ. एम. आणि गाणी ऐकता यायची. पण गाण्यासाठीची मेमरी कमी होती. शिवाय हेडफोनमध्ये जास्त तंत्रज्ञान वापरले नव्हते. फोन्समध्ये इक्विलायझर्स (Equalizers) नव्हते. त्यामुळे २००४-२००५ च्या सुमारास हेडफोन्सच्या अपघातांची संख्या १६ होती २०१०-२०११ साली ती ४७ झाली म्हणजे ६ वर्षांत ३१ ने वाढली.
‘मी आणि माझे दोन मित्र कामानिमित्त विरार येथे आलो होतो. प्लॅटफॉर्म नंबर दोनवर गाडी येणार असल्याने इतरांप्रमाणे आम्हीसुद्धा प्लॅटफॉर्म नंबर एकवरून रेल क्रॉसिंग करून प्लॅटफॉर्म नंबर दोनवर जायचे ठरवले. अचानक आजूबाजूचे लोक थांबले का म्हणून मी बघितले तर त्या दोन नंबरच्या रेल्वे रुळांवर ट्रेन येत होती. मी हेडसेट कानातून काढले तर ट्रेनचा कर्कश हॉर्न कानी पडत होता. लोकसुद्धा ओरडत होते. रेल्वे ट्रॅकच्या मध्यभागी आम्ही तिघे चालत होतो. मी दोघांनाही माझ्याबरोबर मागे खेचले आणि क्षणात गाडी निघून गेली. तिघांच्याही कानात हेडसेट्स असल्याने ना गाडीचा हॉर्न ऐकू आला, ना लोकांचा आरडाओरडा. लोक आम्हाला ओरडलेच पण त्या दिवशी आमचा तिघांचा जीव वाचला होता.’ – राज देवकर
या अपघातात ७० टक्के लोकांनी आपला जीव गमावला. केवळ ट्रेनमुळे ५५ टक्के अपघात झाले. या अपघातांची संख्या शहरांमध्ये जास्त होती. एका आकडेवारीनुसार ३० टक्के अपघात शहरात झाले. त्याहून मुख्य म्हणजे ६७ टक्केअपघात हे ३० वष्रे वयोगटातील तरुणांचे होते.
मुख्य म्हणजे हेडफोन्स कानात असणे ठीक आहे, पण पूर्ण वेळ कानात असावा का? अतिवापरामुळे कानाला होणारा अपाय हा हेडसेटच्या वापरामुळे होणाऱ्या नुकसानापेक्षा जास्त गंभीर आहे. आपण हेडसेट पुन्हा घेऊ शकतो.. पण कान गेले तर.. तेव्हा अतिवापर हा अपंगत्वाची होम डिलिव्हरी मागवल्यासारखं आहे. हेडफोनमधल्या नॉईज कॅन्सलेशन या पर्यायाने आजूबाजूचा आवाज वज्र्य करता येतो आणि फक्त गाणी ऐकू येतात.
हे करावे-
१) दोन स्थानकांतला वेळ जाणून तेवढय़ाच गाण्यांची प्लेलिस्ट करावी. (उदा. बस स्टॉपवर चढल्यापासून तुम्हाला तिसऱ्या थांब्यावर उतरायचे असेल व त्यातले अंतर २० मिनिटांचे असेल तर साधारण १५ मिनिटे होतील, अशी गाणी प्लेलिस्टवर सेट करा म्हणजे प्लेलिस्ट संपली की आपोआप आपण उतरायला तयार होऊ.
२) साधारण २००४-२००७ च्या काही नोकियाच्या फोन्समध्ये एकच ईयरप्लग होता. त्याचा फायदा होता. आत्ताही आपण सार्वजनिक ठिकाणी वावरत असू तेव्हा कानात एकच प्लग घातला किंवा अतिशय कमी आवाजात गाणी ऐकली तर आपण अधिक दक्ष राहतो.
३) आपले कान तसेही लग्नसमारंभ, गणपती, नवरात्री आणि इतर अनेक उत्सवांत ध्वनिप्रदूषणाचा भोगत असतातच. आपण गाण्याचे शौकीन असलो आणि मोठय़ा आवाजात गाणी ऐकण्याची परंपरा चालू ठेवली. म्हातारपणी गाणी तर राहतील पण ती ऐकायला कान नसतील. तात्पर्य, गाणी हळू आवाजात ऐका.
हे करू नये-
१) रस्ता ओलांडताना किंवा रस्त्यावरून चालताना गाणं बंद आणि कान मोकळे ठेवा. २) सार्वजनिक ठिकाणी गाणी ऐकू नका. ३) इक्विलायझरने ताल म्हणजे बीट्स वाढवणे आणि रॉक हे सेटिंग केले तर फार मोठा आवाज होतो. तो फार वेळ ऐकणे टाळले पाहिजे.
४) साउंड कॅन्सलेशनचा वापर शक्य तितका कमी करावा.
शेवटी ‘व्हायचे ते होणारच’ म्हणून ‘दैव आणि कर्म’ या असंबद्ध गोष्टींना जबाबदार ठरवण्यापेक्षा जितकी काळजी घेणे शक्य आहे तितकी ती घ्यावी, कारण कान आणि शरीर असले तरच भविष्यात नवीन गाण्यांचा आस्वाद घेणे शक्य होईल. योग्य गोष्टी योग्य जागी वापरणे यात आपलेच भले आहे. अपघातांनंतर भांडण्यापेक्षा किंवा ‘जर.. तर’ करण्यापेक्षा सावधानी बाळगणे सर्वोत्तम.
टायर कंपनीच्या जाहिरातीनुसार ‘स्ट्रीट्स आर फिल्ड विथ इडियट्स’ आपणच बनतोय का, हे लक्षात घेतले पाहिजे.