तलाव आणि पाणथळ जागेचं वैभवं म्हणजे काय असा प्रश्न विचारला तर पटकन डोळ्यासमोर कमळ हे नाव येतं. भारताचं राष्ट्रीय फूल म्हणून ओळखलं जाणारं कमळ आपण फक्त देवाच्या चरणी अर्पण करण्यासाठीच वापरतो. परंतु कमळाचं फूलचं नाही तर त्याचं देठ, पान आणि बीदेखील अत्यंत उपयोगी आहे. कमळकाकडी किंवा कमळाचा देठ हे काश्मिरी, सिंधी, पंजाबी खाद्यसंस्कृतीमध्ये वापरल्याचे दिसून येते. तसेच मखाणा म्हणजे कमळाची बी हिचादेखील मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येतो. बऱ्याच ठिकाणी उपवासाच्या पदार्थांमध्ये किंवा प्रसादामध्ये हे मखाणे दिले जातात. मात्र हे मखाणे कसे तयार करतात हे फार कमी जणांना माहित आहेत.
मखाणा हा शरीरासाठी अत्यंत उपयोगी असून त्याला आयुर्वेदिक महत्त्व आहे. बिहारमध्ये जवळपास ९० टक्के याची निर्मिती केली जाते. मखाणा तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज असते. विशेष म्हणजे मखाणे तयार करताना कोणत्याही केमिकल्सचा वापर करण्यात येत नाही. सेंद्रिय पद्धतीने ही शेती केली जाते आणि त्यातून मखाणा तयार होतो.
दिसायला लहान असणारे मखाणे तयार करण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. कमळाच्या बिया काढून त्या वाळवल्या जातात. मात्र या वाळवत असताना त्यात २५ टक्के ओलावा शिल्लक राहिलं याची खबरदारी घ्यावी लागते. या बिया वाळल्यानंतर त्यांच्यातील ओलावा टिकून राहण्यासाठी त्यावर थोडं पाणी शिंपडावं लागतं. त्यानंतर हे काळे दाणे पांढरे होण्यासाठी त्यांना गरम तव्यावर भाजलं जातं. दाणे भाजून झाल्यानंतर एका लाकडाच्या सहाय्याने एक-एक दाणा सोलला जातो. विशेष म्हणजे हे दाणे सोलल्यानंतर त्यातून केवळ १ ते ३ मखाणेच बाहेर येतात.
अनेक जण उपवास असताना मखाणे खातात. तसंच काही जण रोजच्या आहारातही यांचा समावेश करतात. मखाणामध्ये मोठ्या प्रमाणावर औषधी गुणधर्म आहेत. तसंच त्यात प्रोटीन, एंटीऑक्सिडेंट, व्हॅटामिन, कॅल्शियम यांचा मोठं प्रमाण असतं.