आत्ताच्या जीवनशैलीमुळे आपल्याला सगळ्या गोष्टी कमी वेळेत कशा होतील? हे हवं असत. परंतु अनेकदा गोष्टी पटापट करण्यामुळे त्या गोष्टींचा फायदा होण्यापेक्षा तोटाच होतो. आपण आपल्या आरोग्यासाठी तरी विचारपूर्वक गोष्टींचा वापर केला पाहिजे. आज स्वयंपाक करण्यासाठी हजारो मशीन, वेगवेगळी उपकरणे बाजारात आहेत. या उपकरणातून काम जरी पटकन होत असले तरी त्याचा शरीराला फायदा होत नाही. याचच एक उदाहरण म्हणजे रोज स्वयंपाक करण्यासाठी वापरली जाणारी भांडी. तुम्ही नेहमीच्या अॅल्युमिनियमच्या किंवा स्टीलच्या भांड्यांपेक्षा मातीची भांडी वापरल्यास आरोग्यास ते लाभदायक ठरते. मेट्रो शहरात मातीची भांडी हळूहळू हद्दपार झाली. मात्र गेल्या काही वर्षांपासून पुन्हा एकदा मेट्रो शहरांमध्ये ह्या भांड्यांचा ट्रेण्ड आला आहे.
काय आहेत फायदे?
१. स्वादिष्ट आणि पौष्टिक जेवण
मातीच्या भांड्यांमध्ये बनवलेले जेवण अधिक पौष्टिक आणि स्वादिष्ट लागते. मातीच्या तव्यावर चपाती करतांना मातीचे तत्व चपातीमध्ये शोषले जाते यामुळे त्याची पौष्टिकता वाढते.
२. गॅसची समस्या दूर होण्यास मदत
तुम्हाला वारंवार पोटात गॅस होत असतील तर तुम्ही आवर्जून मातीच्या भांड्यात शिजवलेले अन्न खा. मातीच्या भांड्यात शिजवलेल्या अन्नामुळे गॅस सारखी समस्या होत नाही.
३. मिळतात पोषक तत्त्वंं
प्रत्येक व्यक्तीच्या शरीराला साधारणपणे १८ पोषक तत्त्वांची गरज असते. मातीच्या भांड्यातून ही पोषक तत्त्व मिळण्यास मदत होते. कॅल्शियम, सल्फर, सिलीकॉन, कोबाल्ड आणि अशी अनेक पोषक तत्त्वंं मातीच्या भांड्यात अन्न शिजवल्यामुळे मिळतात.
या गोष्टींची घ्या काळजी!
मातीची भांडी घेताना त्याचा तळ बघावा. तो जाड असायला हवा. नाहीतर उष्णतेने भांडे तडकू शकते. नवीन मातीची भांडी आणल्यानंतर ती किमान २४ तास पाण्यात पूर्ण बुडवून ठेवावी. २४ तासानंतर भांडी व्यवस्थित सुकवावी. वापर झाल्यावर काही अन्नकण त्यात अडकून राहू शकतात. म्हणून या भांड्यांचे काम झाले की त्यात गरम पाणी ओतून स्वच्छ करावी. तेलाचा तवंग, अन्नकण सहज निघून येण्यास मदत होते.