सीताफळ हे मुळचं वेस्ट इंडिज बेटे आणि दक्षिण अमेरिकेचे फळ. आपल्याकडे मिल्कशेक, आईस्क्रीममध्ये भरपूर प्रमाणात या फळाचा वापर केला जातो. कॅल्शिअम, लोह, थायमीन, रिबोफ्लेविन, नियासिन, ‘क’ जीवनसत्त्व आणि ‘बी वन’ व ‘बी टू’ जीवनसत्त्व यांचं उत्तम स्त्रोत असलेलं हे फळ आहे. त्याचप्रमाणे सीताफळात प्रथिने, मेद, तंतुमय, पिष्टमय पदार्थ व नैसर्गिक फलशर्कराही भरपूर प्रमाणात असते म्हणूच सीताफळ खाणं फायदेशीर आहे.
पण सीताफळ हे थंड आहे म्हणून रात्री खाण्यापेक्षा सहसा दुपारी या फळाचे सेवन करावे. सीताफळ हे नेहमी जेवणानंतर एक दोन तासांनी खावे. त्यातून ज्यांना वरचेवर सर्दी-खोकल्याचा त्रास असेल त्यांनी सीताफळ खाऊ नये. सीताफळात मेदही असतं. म्हणूनच हे फळ अतिप्रमाणात खाल्ल्याने वजन वाढू शकते. त्यामुळे बैठेकाम करणाऱ्यांनी सीताफळ कमी प्रमाणातच खावे.
सीताफळातील औषधी गुणधर्म
– शरीरात अशक्तपणा आला असेल किंवा काम करताना थकवा जाणवत असेल तर अशा वेळी सीताफळ खाल्ल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होऊन शक्ती निर्माण होते.
– अतिसार झाला असेल तर सीताफळाचा रस फायदेशीर असतो.
– छातीत, पोटात जळजळ जाणवत असेल तर सीताफळ खाल्ल्यानं आराम पडतो.
– लहान मुलांच्या वाढीसाठीही सीताफळ अधिक फायदेशीर आहे.