शरीराच्या योग्य वाढीसाठी चौरस आहार घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे रोजच्या जेवणात वरण भात, भाजी, पोळी यांचा समावेश करायला हवा. आपण सेवन करत असलेल्या प्रत्येक खाद्यपदार्थाचा शरीरासाठी फायदाच होत असतो. परंतु, प्रत्येकाचं प्रमाण आणि मात्रा ठरलेली असते. कोणताही पदार्थ प्रमाणापेक्षा जास्त खाल्ला गेला तर तो शरीरासाठी अपायकारकही ठरतो. त्यामुळे कोणता पदार्थ किती प्रमाणात खावा किंवा कशा पद्धतीने खावा हे ठाऊक असणं गरजेचं आहे. त्यासोबतच काही ठराविक भाज्या आणि पदार्थ सोडले तर कच्चे अन्न खाऊ नये त्यामुळे शारीरिक त्रास उद्भवण्याची शक्यता असते.
काही वेळा बाजारातून आणलेला एखादा पदार्थ किती शिजवला तरी तो कच्चा राहतो. त्यामुळे त्याचं सेवन केल्यानंतर त्याचं नीट पचन होत नाही. परिणामी, पोटदुखी, उलट्या होणं अशा समस्या निर्माण होतात. यात अनेक वेळा गृहिणींची तक्रार असते की अमूक डाळ नीट शिजत नाही. तर अशा वेळी डाळी किंवा कडधान्य नीट शिजावेत आणि त्यांचं योग्य पचन व्हावं यासाठी काही सोप्या घरगुती टीप्स आहेत.त्यामुळे डाळ किती जड असली तरी ती पटकन शिजते आणि ती खाल्ल्यानंतर पचायलाही हलकी होते.
१. डाळ शिजत आल्यावर त्यात थोडंसं आलं किसून घालावे.
२. डाळीला फोडणी देताना कढीपत्ता, मोहरी,जिरे यांच्यासोबत कधीतरी दालचिनीचा तुकडा, काळे मिरे,तमालपत्र घालावे.
३. वरण-भात जेवताना त्यावर लिंबू पिळावे
४. शक्यतो डाळीत किंवा वरणात काळ्या मीठाचा वापर करावा.
५. डाळ शिजताना त्यात कांदा, लसूण, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो अशा भाजा कधीतरी घालाव्यात. अशा भाज्यांची जोड दिल्यास डाळ पचायला हलकी होते.
६. डाळीचे गोड पदार्थ करताना त्यात वेलची, जायफळ आणि सुंठ जरूर घालावी.
७. डाळींचे पदार्थ असलेले जेवण जेवल्यानंतर अननस किंवा पपईच्या दोन फोडी खाल्ल्या तरी पचन सोपे होते.
८. डाळ शिजवण्यापूर्वी किंचतशी भाजून घ्यावी.