अभ्यासकांचा निष्कर्ष; विकसनशील देशांमध्ये अधिक परिणाम
पक्षाघाताने येणारे अपंगत्व तसेच मृत्यू याला हवेतील प्रदूषण प्रामुख्याने कारणीभूत असल्याचा निष्कर्ष अभ्यासकांनी काढला आहे. विशेषत: विकसनशील देशामध्ये हे गंभीर असल्याचे आरोग्यविषयक नियतकालिकातील एका लेखात अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे.
धूम्रपान, उच्च रक्तदाब, स्थूलपणा यापेक्षा स्वयंपाकावेळी होणारा धूर तसेच वाहनातून निघणारा धूर याद्वारे होणारे हवा प्रदूषण हे पक्षाघातासाठी सर्वाधिक धोकादायक असल्याचा निष्कर्ष आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या चमूने काढला आहे. त्यासाठी १९९० ते २०१३ या कालावधीत १८८ देशांमधून त्यांनी अधिकृत आकडेवारी गोळा केली. अशा स्वरूपाचा हा पहिलाच अभ्यास असल्याचा दावा ऑकलंड विद्यापीठातील व्हेलेरी फेजिन यांनी केला आहे.
दरवर्षी जगभरात दीड कोटी लोकांना पक्षाघात होतो. त्यापैकी ६० लाख मृत्युमुखी, तर ५० लाख अपंग होतात, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. पक्षाघातासाठी उच्च रक्तदाब, आहारात फलाहाराचे अल्प प्रमाण, स्थूलपणा, मिठाचे जादा सेवन अशी काही कारणे आहेत. आता या धोक्यांमध्ये वाहन प्रदूषण सातव्या, तर स्वयंपाकावेळी होणाऱ्या धुरांमुळे पक्षाघात होण्याचा धोका असल्याचे कारण आठव्या क्रमांकावर आहे.
अभ्यासकांनी या संशोधनात जी पक्षाघाताची कारणे विशद केली आहेत, त्यात ९०.५ टक्के कारणे ही जीवनशैलीशी निगडित आहेत. यात धूम्रपान, खूप साखर खाणे व्यायामाचा अभाव तसेच मधुमेह व हृदयरोग हे कारणीभूत आहेत. भविष्यातील नियोजनाच्या दृष्टीने हे निष्कर्ष उपयुक्त असल्याचे ‘दि लँसेंट न्युरोलॉजी’त विशद केले आहे.