डॉ. विराग गोखले – response.lokprabha@expressindia.com
फॅमिली डॉक्टर
चारचौघांत वावरत असताना होणारे गॅसेस ही अनेकांची डोकेदुखी असते. आपल्याला असे गॅसेस का होतात, त्यावर उपाय काय, हे समजून घेतलं तर त्यावर उपाय करता येतात.
पचनसंस्थेच्या पोकळीतील हवा, ‘एअर ऑफ डिसकम्फर्ट’ (air of discomfort) हा एक सार्वत्रिक विकार आहे. अर्थात हीच हवा तोंडावाटे बाहेर आली तर ती ढेकर. अन्न ग्रहण करून तृप्त झाल्याचे दर्शवते व ती अन्न वाढणाऱ्या व्यक्तीला समाधान देऊन जाते. पचनसंस्थेच्या दुसऱ्या टोकातून बाहेर पडणारा वायू – अपानवायू, त्या व्यक्तीला व आसपासच्या सर्वानाच लाजिरवाणे करतो. म्हणून गमतीने त्याला ‘लाफिंग गॅस’ (laughing gas) म्हटले जाते. ही प्रक्रिया पूर्णपणे नॉर्मल असू शकते. पूर्ण निरोगी माणसाच्या पचनसंस्थेतून दिवसाला १६ वेळा अपानवायू बाहेर पडतो. दिवसभरात २००-१२०० मि.ली., सर्वसाधारण ६०० मी.लि. एवढे त्याचे प्रमाण असते. स्त्रियांनाही पुरुषांइतकाच त्याचा त्रास जाणवतो. रात्री झोपेत जास्तीत जास्त प्रमाणात अपानवायू बाहेर पडतो. मानवांनाच नाही तर मांजरे, कुत्रे, गाई, एवढेच काय हत्तींनाही अपानवायू पिडत असतो. पूर्वी एका इंग्रजी चित्रपटात एक गमतीदार परिस्थिती दाखवली होती. घरात झोपलेल्या वृद्धेने अपानवायू मुक्त केला, की जवळच बसलेल्या कुत्र्याला तिची मुलगी काठीने मारायची, लगेच कुत्रे बाहेर पळून जायचे. हेतू हा की, समोर बसलेल्या पाव्हण्याला, आवाजाचे कारण, म्हातारी नसून कुत्रा आहे असे वाटावे. हळूहळू त्या कुत्र्याला त्याची एवढी सवय झाली, की वृद्धेने पानवायू सोडला, की तो कुत्रा त्याला कोणी मारायच्या आतच बाहेर पळून जायचा!
वर म्हटलेल्या नॉर्मलच्या सीमेपेक्षा जास्त गॅस निर्माण झाल्यास त्याला गॅसेसचा विकार अथवा ‘फ्लॅटुलेंट डायस्पेप्सिया (flatulent dyspepsia) म्हणतात. जास्त प्रमाणात ढेकर येणे, अपानवायू सुटणे, पोट फुगल्यासारखे व जड वाटणे, शौचाला साफ न होणे, ही सारी या विकाराची लक्षणे आहेत.
जठरातला गॅस हा सर्वसाधारणपणे गॅसमिश्रित अन्न व पेयातून आलेला असतो, तसेच कधीकधी आपण तोंडावाटे आत ओढलेला असतो. स्ट्रॉने पेय घेताना आपण आधी स्ट्रॉमधला गॅस आत ओढतो, त्यामुळे निर्माण झालेल्या पोकळीत पेय वर ओढले जाते. आपण अध्येमध्ये थांबून, स्ट्रॉने जेव्हा पेयाचे सेवन करतो, तेव्हा आत ओढलेला गॅस हा नगण्य नसतो.
जोसेफ प्रिस्टले या इंग्लिश केमिस्टने १७७२ साली, काबरेनिक अॅसिड पाण्यात मिसळून काबरेनिक जल बनवले. जगभर गॅसेसवरील उपाय म्हणून त्याचा वापर होत असे. १८९४ मध्ये डायस्पेप्सिया टॉनिक (dyspepsia tonic) म्हणून ‘पेप्सी’ बाजारात आले; पण या पेयांचा व आपण घेत असलेल्या अन्य गॅसयुक्त पेयांचा- सोडा, इनो, इतर कोला जातीची पेये (काबरेनेटेड ड्रिंक्स) यांचा शरीरावर बरोबर विरुद्ध परिणाम होतो. पेय घेतल्यावर, गॅसमुळे जठर फुगते आणि नंतर आकुंचन पावते. परिणामस्वरूप, ढेकर रूपात हा गॅस बाहेर पडतो. आपल्याला बरं वाटतं; पण वास्तविक आपण बाहेरून शरीरात घेतलेली हवा बाहेर टाकतो आणि त्यातलाच काही गॅस पुढे आतडय़ात जाऊन पोटात गुरगुर होणे, पोट फुगल्यासारखे वाटणे आदी लक्षणे निर्माण करतो. म्हणून पोटात गॅस जमल्याचा संशय असेल तर गॅसयुक्त, फिझवाल्या पेयांऐवजी कार्मिनेटिव्ह (carminative) या प्रकारात मोडणारे पदार्थ म्हणजे बडीशेप, लवंग, दालचिनी वगरे घ्यावे. यांनी ढेकर येऊन पोटातील गॅस बाहेर पडायला मदत होते. काही अन्नपदार्थामध्ये त्यांच्या अंगरूप रचनेतच गॅस असतो. उदाहरणार्थ, सफरचंदाच्या आकारमानात २० टक्के गॅस असतो. आपण तोंडावाटे गिळलेला गॅस, लगेच ढेकर येऊन बाहेर पडला नाही, तर साधारण ३० मिनिटांत तो गॅस अपानवायू म्हणून पचनसंस्थेच्या दुसऱ्या टोकाने बाहेर पडू शकतो.
काही लोक पुन:पुन्हा ढेकर देतात. ढेकर नाही दिली तर त्यांना कोंडल्यासारखे वाटते. असल्या बहुसंख्य केसेसमध्ये हा गॅस पोटात निर्माण झालेला गॅस नसून, तो प्रत्येक ढेकरेबरोबर आत ओढला गेलेला गॅस असतो, असे क्ष किरण चाचण्यांवरून दिसून आले आहे. याला एअरोफॅगी (aerophagy) असे नाव आहे. पेशंटचे इतरत्र लक्ष वेधून त्याला दुसऱ्या कशात तरी गुंतवले की ही प्रक्रिया थांबते. या ढेकरा कशामुळे येताहेत हे पेशंटला समजावून सांगितले, की त्याचा फायदा होऊ शकतो.
जठर अथवा छोटय़ा आतडय़ाच्या पोकळीत अडथळा निर्माण होऊन अन्न त्यात साचून राहिले तर ते आंबते व त्यामुळे पोटात गॅस तयार होतो. एरवी पोटातला गॅस हा पोटात तयार झालेला नसतो.
पोटात तयार होणाऱ्या अॅसिडवर आतडय़ाच्या पहिल्या भागात (duodenum) तयार होणाऱ्या पाचक स्रावातील HCO3 वर होत असलेल्या प्रक्रियेमुळे कर्बद्विल वायू तयार होतो. म्हणून साध्या चघळायच्या अॅण्टॅसिड (antacid) गोळ्यांनीही गॅसचे प्रमाण कमी होऊ शकते.
आपल्या आतडय़ात जवळजवळ दोन पौण्ड जिवाणू असतात. त्यांच्या चयापचय प्रक्रियेमुळे आतडय़ात गॅस बनतो. काही लोकांच्या टॉयलेट सीटमधील पाण्यात मलविष्ठा तरंगते – ती मलातील मिथेन गॅसमुळे. काही लोकांच्या आतडय़ांमध्ये मिथेन निर्माण करणाऱ्या जिवाणूंचे प्रमाण जास्त असते. ही प्रवृत्ती अनुवांशिक असते.
अन्न अर्धवट पचलेल्या अवस्थेत, मोठय़ा आतडय़ात पोहोचल्यास आतडय़ातील जिवाणूंपासून जास्त गॅस तयार होतो. अन्न पचनाची सुरुवात, तोंडातल्या लाळेबरोबर निर्माण होणाऱ्या पाचक एन्ज़ाइम्स म्हणजे विकरांमुळे होते. म्हणून अन्न घाईघाईने खाल्ल्यास, चावण्यास पुरेसा वेळ न दिल्यास, गॅस तयार व्हायची शक्यता वाढते.
शिजवलेले अन्न अधिक सहज पचते. अन्न शिजवताना, अन्नातील पेशींच्या बाहेरच्या आवरणात छेद निर्माण होतात व पाचक विकर पेशीत प्रवेश करून अन्नाचे पूर्ण पचन करू शकतात. त्यामुळे कमी गॅस तयार होतो. म्हणून गॅसेसचा त्रास असलेल्यांनी कच्च्या भाज्या, सॅलड टाळणे चांगले.
कडधान्यांच्या उसळी व तत्सम अन्न प्रकारात, काही अॅण्टिट्रायप्टिक (antitryptic) घटक असतात. त्यामुळे पचनात बाधा येते आणि जास्त गॅस बनतो. उसळी जरा जास्त शिजवल्या, की हे अॅण्टिट्रायप्टिक घटक नष्ट होतात. पचनाची प्रक्रिया सुधारते. मटकी, मूग, चवळी इत्यादींना मोड आणल्यानेसुद्धा ती सहज पचतात. तळलेले पदार्थ पचायला जरा जड असतात. त्यांच्यापासून गॅसेस तयार होण्याची शक्यता बळावते.
काही पिष्टमय पदार्थ, आतडय़ातून रक्तात सहजासहजी शोषले जात नाहीत. त्यापासून त्रासदायक ठरण्याइतका गॅस तयार होऊ शकतो. कोबी, फ्लॉवर तसेच घेवडा, फरसबी, चवळी, मका, काही डाळी या गटात मोडतात. २०० ग्राम बीन्सपासून ७०० मिली गॅस बनतो. आसमंतात भरारी मारणाऱ्या अंतराळवीरांना बीन्स खायची परवानगी नसते. बीन्समुळे निर्माण होणारा व अपानवायू रूपाने बाहेर पडणारा गॅस, त्यांच्या स्पेस सूटला इजा करू शकतो!
वयोमानानुसार दुधातील लॅक्टोज साखर पचवणाऱ्या लॅक्टेज विकराची निर्मिती कमी होत जाते. त्यामुळे दूध, बासुंदी, पेढे वगरे खाल्ल्यास त्यापासून जास्त प्रमाणात गॅस बनतो. त्यामुळे दूध टाळून ताक अथवा दही घेणे श्रेयस्कर. बद्धकोष्ठता असेल तर आतडय़ात साचलेल्या मलामुळे, जिवाणूंच्या वाढीला चालना मिळते आणि त्यामुळे जास्त गॅस तयार होतो.
गॅसची दरुगधी हायड्रोजन सल्फाइडमुळे असते. आहारात प्रोटीनचे वा सल्फरचे प्रमाण जास्त असल्यास, अर्धवट पचलेल्या प्रोटीनपासून आतडय़ांतील जंतू हायड्रोजन सल्फाइड निर्माण करतात. बीन्स, चीज, अंडी यांच्या सेवनाने अशा प्रकारचा गॅस बनतो.
आतडय़ात अमिबा जंतूचे इन्फेक्शन झाल्यास अथवा पोटात कृमी झाल्यास गॅसचे प्रमाण वाढते. वैद्यकीय सल्ल्याने अमिबा व कृमीच्या औषधांचा प्रयोग गॅसने त्रस्त झालेल्या रुग्णाने करायला हरकत नाही. दुधाचे दही करणारा लॅक्टोबॅसिली (lactobacilli) जिवाणू तोंडावाटे घेतल्यास, वाईट गॅस बनवणाऱ्या जिवाणूंचे प्रमाण कमी होऊ शकते. या व तत्सम जिवाणूंना प्रो-बायोटिक्स म्हणतात. असंख्य ब्रॅण्ड्सची प्रो-बायोटिक्स सध्या बाजारात उपलब्ध आहेत. गॅस शोषून घेणाऱ्या सायमेथिकोन, एमपीएस, अॅक्टिव्हेटेड चार्कोल वगैरे औषधांनी गॅसचा त्रास कमी व्हायला मदत होते. तसेच अन्न पचवणारी विकरेही गोळी, कॅप्सूल व लिक्विड स्वरूपात मिळतात.
गॅसेसचा विकार असलेल्यांनी अन्न हळूहळू व नीट चावून खाणे, गॅसयुक्त पेये न घेणे, स्ट्रॉचा वापर टाळणे, कच्च्या भाज्या, फ्लॉवर, कोबी, बीन्स कमी खाणे, दुधाचे कमी पिणे हे उपाय करून पाहावेत. अन्यथा या विकारापासून डॉक्टरांच्या मदतीने काही अंशी मुक्तता करून घेता येईल.
सौजन्य – लोकप्रभा