केस गळणे, टक्कल पडणे, अकाली केस पांढरे होणे यांसारख्या समस्यांची शिकार केवळ महिला आणि पुरुषच नाही, तर आता लहान मुलेही होत आहेत. लहान वयात केस पांढरे होण्यामागे पोषणाचा अभाव हे सर्वांत मोठे कारण आहे. आजकाल आपल्या खाण्याच्या सवयी अशा झाल्या आहेत की, त्यात फक्त चव आहे; पण पोषक घटक नाहीत. लहान मुलांनाही नेमक्या अशाच खाण्याची सवय लागत आहे; ज्यामुळे लहान वयातच मुलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. त्यात दृष्टी कमी होणे, मधुमेह, लठ्ठपणा व केस पांढरे होणे यांसारख्या समस्यांचाही समावेश आहे. त्यामुळे जे आजार अनेकांना उतारवयात होतात तेच आजार हल्ली लहान वयातच मुलांना होत आहेत.
त्यावर डॉ. दीक्षा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे; ज्यात त्यांनी असे काही पदार्थ सांगितले आहेत की, ज्यांचा मुलांच्या आहारात समावेश करून, केस पांढरे होण्यापासून बऱ्याच अंशी त्यांचा बचाव करता येऊ शकतो.
१) आवळा
आवळा व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सनी समृद्ध आहे; ज्यामुळे केसांशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. आवळा चवीला तुरट असल्यामुळे तुम्ही त्यापासून बनवलेला जाम खाऊ शकता.
२) काळे तीळ
काळे तीळ मेलेनिनचे उत्पादन वाढवते; जे आपली त्वचा आणि केस यांचा रंग राखण्यासाठी आवश्यक आहे. तुम्ही काळ्या तिळाचे लाडू खाऊ शकता किंवा त्याची पावडर चपातीमध्ये टाकूनही खाऊ शकता.
३) काळे मनुके
काळ्या मनुक्यात लोहाचे प्रमाण अधिक असते. त्यात व्हिटॅमिन सीदेखील असते; जे खनिजे लवकर शोषून घेत केसांना पुरवते. त्यामुळे केस अकाली पांढरे होण्याची समस्या तर दूर होतेच; पण केस गळणेही कमी होते.
४) कढीपत्ता
कढीपत्त्यात भरपूर जीवनसत्त्वे ए, बी, सी व बी 12 असतात. त्याशिवाय त्यामध्ये लोह आणि कॅल्शियमदेखील असते. त्यामुळे केस गळणे आणि पांढरे होण्याच्या समस्येपासून आराम मिळतो.
५) देशी तूप
देसी तुपाचा वापर जेवणात केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढण्याबरोबर त्वचा आणि केसांचे आरोग्यही सुधारते. त्याचे योग्य प्रमाणात सेवन केल्याने केसांची गुणवत्ता सुधारते.