लंडन : जीवनसत्त्व ‘ब ६’ची पूरक मात्रा जास्त प्रमाणात घेतल्यास चिंता आणि नैराश्य भावना कमी होते, असे नव्या अभ्यासात निदर्शनास आले. ब्रिटनमधील रीडिंग विद्यापीठाच्या संशोधकांनी जीवनसत्त्व ‘ब ६’ च्या अधिक मात्रेच्या तरुण व प्रौढांवरील परिणामांचा अभ्यास केला. त्यात असे दिसले की, दररोज महिनाभर या जीवनसत्त्वाच्या गोळय़ा नियमित घेतल्यानंतर त्यांच्यातील चिंतेचे व नैराश्याचे प्रमाण घटले. या अभ्यासाचे निष्कर्ष ‘ह्यूमन सायको फार्मालॉजी’ या औषधांचा मनावरील परिणामांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राच्या विज्ञानपत्रिकेत नुकतेच प्रसिद्ध झाले.
भावभावनांमधील अनियमित चढउतारांवरील नियंत्रणासाठीच्या उपचारात मेंदूंतील चलनवलनातील स्तरांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या पूरक मात्रांचा प्रयोग या अभ्यासांतर्गत करण्यात आला. रीिडग विद्यापीठाचे संशोधक व या अभ्यास अहवालाचे लेखक डेव्हिड फिल्ड यांनी सांगितले की, ‘ब ६’ जीवनसत्त्व शरीरात विशिष्ट रासायनिक संदेशवाहक तयार करण्यास मदत करते. जे मेंदूतील आवेगांना प्रतिबंध करते. या शमन परिणामांचा सहभागी व्यक्तींतील घटलेल्या चिंतांशी संबंध जोडण्यास या अभ्यासाद्वारे यश आले आहे.
यासंदर्भात आधी झालेल्या अभ्यासांनुसार बहुविध जीवनसत्त्वांमुळे ताण सौम्य करण्यास मदत होत असल्याचे निष्कर्ष मिळाले होते. इतर काही अभ्यासांनुसार ठरावीक जीवनसत्त्वांमुळे हा परिणाम दिसून येतो. ताज्या अभ्यासानुसार जीवनसत्त्व ‘ब ६’मुळे गॅमा अमिनोब्युट्रिक आम्ल (गाबा) शरीरात निर्माण होते. हे रसायन मज्जापेशी आणि मेंदूत निर्माण होणारे आवेग रोखते. या अभ्यासात ३०० पेक्षा जास्त सहभागी व्यक्तींवर जीवनसत्त्व ‘ब ६’ किंवा ‘ब १२’ वापरण्यात आले. या जीवनसत्त्वांच्या किंवा इतर चिंताशामक औषधांच्या दैनंदिन मात्रेपेक्षा सुमारे ५० पट अधिक मात्रा आहारासह महिन्यासाठी देण्यात आली. त्यात ‘ब १२’च्या तुलनेत ‘ब ६’ हे चिंता व नैराश्य घटवण्यात अधिक परिणामकारक ठरल्याचे दिसले.
‘ब ६’ हे जीवनसत्त्व टय़ूना मासे, चणे आणि अनेक फळांत असते, परंतु भावभावनांवरील सकारात्मक परिणामांसाठी या जीवनसत्त्वाच्या अधिक पूरक मात्रेचाच उपयोग होतो, हे या अभ्यासातून सिद्ध होते. तरीही फिल्ड यांनी सांगितले की, हा प्रयोग प्राथमिक अवस्थेत आहे. औषधांच्या तुलनेने आहाराद्वारे उपचारांसंदर्भात कमी व्यक्तिसमूहांवर प्रयोग करून या अभ्यासाचे निष्कर्ष काढले आहेत. अजून व्यापक प्रयोगाची अपेक्षा आहे, मात्र नैराश्य-चिंता घटवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या दुष्परिणामांच्या तुलनेत आहाराद्वारे केलेल्या उपायांचे दुष्परिणाम नगण्य असतात. त्यामुळे भविष्यात या विकारांवर मात करण्यासाठी या उपाययोजना परिणामकारक ठरू शकतात, असे फिल्ड यांनी सांगितले.