नवी दिल्ली : उच्चदाब अनेक व्याधींचे कारण ठरत असले तरी यामुळे हृदयरोगाचा अधिक धोका असतो. या पार्श्वभूमीवर आरोग्यतज्ज्ञ रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचा सल्ला देतात. नियमित व्यायाम आणि पोषक आहार हे त्यासाठी उपयुक्त ठरते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
योग्य आहार नसेल तर रक्तदाब वाढण्याचा धोका असतो. या व्याधीग्रस्तांनी आहारात सोडियमचे प्रमाण कमी करावे, तसेच अधिक कॉफी पिणे टाळावे, असे नुकत्याच केलेल्या एका संशोधानात स्पष्ट झाले.
जपानी संशोधकांच्या म्हणण्यानुसार रक्तदाब धोकादायक पातळीवर असेल तर एका दिवसात दोन किंवा त्यापेक्षा अधिक कप कॉफी ही रक्तदाब वाढवण्यास कारण ठरते. अमेरिकेतील ‘हार्ट असोशिएशन’च्या संशोधनानुसार मद्य हेदेखील रक्तदाब वाढण्याचे एक कारण आहे. या व्याधीग्रस्तांसाठी तर मद्य अधिक धोकादायक आहे. मद्याचा विपरीत परिणाम हृदय, मूत्रिपड, यकृतावरही होतो. त्यामुळे मद्यपानापासून दूर राहण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.