नवी दिल्ली : गेल्या तीन वर्षांपासून जग करोना साथीचा सामना करत आहे. आतापर्यंत सुमारे ६७ कोटी नागरिकांना या आजाराचा संसर्ग झाला आहे. तर, ६७ लाख नागरिकांच्या मृत्यूस हा आजार कारण ठरला आहे. साथीच्या सुरुवातीला ‘सार्स -सीओव्ही २’ फक्त श्वसन यंत्रावरच विपरीत परिणाम करतो, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. परंतु कालानुरूप विषाणूमध्ये बदल होत गेले. त्यानंतर त्याच्या लक्षणात आणि वर्तनात बदल झाले. त्याचबरोबरच त्याचे गंभीर परिणाम मर्यादित नसल्याचेही स्पष्ट झाले.

गेल्या काही महिन्यांपासून करण्यात आलेल्या संशोधनानुसार करोना विषाणू फक्त श्वसनयंत्रणेवरच परिणाम करत नसून त्याचा संपूर्ण शरीरावर गंभीर परिणाम होतो, असे अधोरेखित झाले आहे. मेरीलँड विद्यापीठाच्या सहकार्याने एक संशोधन करण्यात आले आहे. यामध्ये करोनाचा शरीराच्या वेगवेगळय़ा अवयवांवर कसा परिणाम होतो, हे तपासण्यात आले. यानुसार शरीरातील ८४ टक्के भागांत संक्रमणाच्या दुष्परिणामाच्या खुणा दिसल्या. यामध्ये मेंदू, पचनसंस्थेशी संबंधित अवयव, हृदय, डोळे यांच्यावर झालेल्या परिणामांची माहिती मिळाली. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी करोनाबाबत नागरिकांनी अधिक सतर्क होणे आवश्यक आहे, असा सल्ला दिला आहे.

Story img Loader