नवी दिल्ली : वाढत्या वयाबरोबर शरीरात अनेक बदल घडून येतात. यामध्ये प्रामुख्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या, कमी दिसणे, केस गळतीचा समावेश होतो. एका विशिष्ट वयानंतर केस पांढरे होणे किंवा ते गळणे ही सामान्य बाब आहे. मात्र कमी वयात ही समस्या निर्माण झाली तर अत्यंत चिंताजनक स्थिती निर्माण होते. कारण केस हे आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवतात. स्त्रियांप्रमाणेच पुरुषांचेही लांब आणि दाट केस हे त्यांचे देखणेपण वाढवते. पण, नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार केसगळती, टक्कल अशा समस्यांमागे ऊर्जा निर्माण करणारी पेये (एनर्जी ड्रिक्स)ही जबाबदार असू शकतात, हे स्पष्ट झाले.
‘द सन’च्या संशोधनात नमूद करण्यात आले आहे की, नियमित ‘एनर्जी ड्रिक्स’ प्राशन केल्यास केस कमकुवत होतात. त्याचबरोबर ते गळतात आणि ते पांढरे होण्याचे प्रमाण अधिक असते. स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये ‘एनर्जी ड्रिक्स’ घेण्याचे प्रमाण अधिक असून ते नियमित प्राशन करणाऱ्या पुरुषांमध्ये ही समस्या निर्माण होण्याचे प्रमाण ३० टक्क्यांनी अधिक आहे.
संशोधनानुसार ‘एनर्जी ड्रिक्स’प्रमाणेच शीतपेये, गोड चहा आणि कॉफीमुळेही ही समस्या निर्माण होऊ शकते.