नवी दिल्ली : जेव्हा स्त्रीला पहिल्यांदा मातृत्व लाभते, तेव्हा तिला आरोग्यापासून अनेक अडचणी, आव्हानांना तोंड द्यावे लागते. आपल्या बाळाला स्तनपान देणे, हा स्त्रीचा हक्क आहे. ते कसे व कुठे करावे, हेही ठरवण्याचेही स्वातंत्र्य स्त्रीलाच आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार स्त्रीने पहिल्यांदाच मातृत्वाची चाहूल लागल्यानंतर किंवा आई झाल्यानंतर तिने विनासंकोच स्तनपानविषयक सल्लागाराचा सल्ला घ्यावा. हे सल्लागार स्तनपानविषयक समस्यांचा शास्त्रीय अभ्यास केलेल तज्ज्ञ असतात. स्तनपानावाटे पुरेशा प्रमाणात बाळाला दूध कसे, त्याची गुणवत्ता चांगली असण्यासाठी काय काळजी घ्यावी, दुखरी स्तनाग्रे, दुग्धपानासाठीची योग्य पद्धत याचा शास्त्रशुद्ध सल्ला हे तज्ज्ञ देतात. त्यामुळे स्त्रीला आपल्या बाळाला योग्य रीत्या स्तनपान देता येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्तनपानाच्या वेळी आईने बाळाचे तोंड नव्हे तर नाक स्तनाग्रांना टेकेल, अशा पद्धतीने घ्यावे. तसेच बाळाचे पोट आपल्या पोटाला स्पर्श करेल अशा तऱ्हेने घ्यावे. त्यामुळे बाळाला त्यांचे डोके वळवून प्यावे लागणार नाही. बाळाचे नाक स्तनाग्रांना टेकवल्यानंतर बाळ आपसुक आपले डोके तिरके उचलून सहज स्तनपान करू लागते. बाळाच्या आगमनापूर्वी घरात आईने स्तनपानासाठी विशिष्ट जागा निश्चित करून घ्यावी. तेथे आरामदायक खुर्ची, स्तनपानासाठीची खास उशी, ‘स्नॅक्स’साठी छोटे टेबल, पाणी, नर्सिग पॅड, गरजेनुसार वाचण्यासाठी चांगले पुस्तक तेथे ठेवावे. जेणेकरून स्तनपानादरम्यान व्यत्यय येणार नाही.

स्तनपानाची वेळ मोजत बसू नये. बाळाला पहिल्या स्तनाचे दुग्धपान बाळाने स्वत:हून थांबवल्यावर त्याला दुसऱ्या स्तनापाशी न्यावे. काही बाळं पहिल्यांदा फक्त एकाच स्तनाने दुग्धपान करतात. दुसऱ्या वेळी दोन्ही स्तनांतून दुग्धपान करतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही कारणाने आईला घराबाहेर पडावे लागत असल्यास, बाळाला आपले दूध बाटलीतून द्यायचे असल्यास पहिल्या चार ते सहा आठवडय़ांत तसे करावे. जर बाळाला स्तनपान आठ आठवडे दिल्यास त्याला त्याची सवय लागून, ते बाटलीतून दूध घेणे टाळण्याचा धोका आहे. अशा मातांनी अन्य कुणाला तरी बाटलीतून हे दूध बाळाला देण्यास सांगावे व तसे झाल्यावर आईने घर सोडावे. जेणेकरून मातेला स्वत:ला स्तनपान देण्याचा मोह होणार नाही, असाही तज्ज्ञांचा सल्ला आहे. 

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health news learn right method breastfeeding woman motherhood health ysh
Show comments