नवी दिल्ली : देशातील पाच कोटी ७० लाख नागरिक बुरशीजन्य आजाराने ग्रस्त आहेत. ही माहिती देशातील विविध आरोग्य क्षेत्रांतील संस्थांनी केलेल्या संशोधनातून स्पष्ट झाली आहे.
नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, एम्स कल्याणी (पश्चिम बंगाल) आणि चंडीगड पीजीआयसह ब्रिटनमधील मॅनचेस्टर विद्यापीठाच्या संशोधकांनी भारतातील बुरशीजन्य आजारासंबंधी माहिती गोळा केली. त्यांच्या अहवालानुसार देशातील ४.४ टक्के लोकसंख्या या आजाराने ग्रस्त आहे.
दिल्लीतील एम्सचे ज्येष्ठ प्राध्यापक अनिमेष रे यांनी सांगितले की, देशात बुरशीजन्य आजाराचे प्रमाण खूप मोठे आहे. एका वर्षांत सुमारे ३० लाख नागरिकांना क्षयरोगाची लागण होते, तर बुरशीजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या यापेक्षा किती तरी अधिक आहे.
‘जर्नल ओपन फोरम इन्फेक्शन डिसीज’मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या या अहवालात मुलांना होणाऱ्या ‘टिनिया कॅपिटिस’ आजाराचे प्रमाण अधिक आहे.
या संशोधनात सहभागी असलेल्या डॉ. डेव्हिस डेिनग यांनी सांगितले की, भारतात सार्वजनिक आरोग्य सेवा या आता खासगी सेवांसारख्या अधिक चांगल्या होत आहेत; परंतु बुरशीजन्य आजार रोखण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर जागरूकता आवश्यक आहे.