निरोगी राहण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी पिणे आवश्यक असते. दररोज योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने आपण अनेक आजरांपासून लांब राहू शकतो. त्यामुळे भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. काहीवेळा उत्तम आरोग्यासाठी थंड पाण्याऐवजी गरम पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. तर काहीजण वजन कमी व्हावे यासाठी सतत गरम पाणी पीत असतात. सर्दी, खोकला, ताप यांसारख्या व्हायरल आजारांमध्ये गरम पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. अशाप्रकारे अनेकवेळा आपण गरम पाणी पितो, पण त्याचा शरीरावर काय परिणाम होत असेल याबद्दल जास्त माहिती नसते.
तज्ञांच्या मते थंड किंवा गरम पाणी पिण्याऐवजी साधे पाणी प्यावे. अपचनाचा त्रास असणाऱ्यांना सकाळी गरम पाणी पिण्याची सवय असते, तर काहीजण कायम गरम पाणीच पितात. पण जास्त गरम पाणी प्यायल्याने शरीराला नुकसानकारक ठरू शकते. यासाठी गरम पाणी प्यायल्याने शरीरावर काय परिणाम होतो ही जाणून घेणे आवश्यक आहे.
आणखी वाचा : झोपेत घोरणे असु शकते गंभीर आजरांचे लक्षण; वेळीच सावध व्हा
गरम पाणी पिण्याचे फायदे
अपचनाची समस्या कमी करते
गरम पाणी प्यायल्याने अपचनाची समस्या कमी होते. अपचन किंवा ऍसिडिटी जाणवत असेल तर कोमट पाणी प्यावे, यामुळे नक्की मदत होईल.
वजन कमी करण्यासाठी उपयुक्त
वजन कमी करण्यासाठी गरम पाणी मदत करते. दिवसभरात जेवल्यानंतर कोमट पाणी प्यायल्याने जेवण लगेच पचण्यास मदत होते. त्यामुळे वजन न वाढता नियंत्रणात राहते. यासोबतच गरम पाणी प्यायल्याने जास्त भूक लागत नाही.
पचनक्रिया सुधारते
गरम पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. कोमट पाणी आतडयांना हायड्रेट करते, त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
आणखी वाचा : सणांच्या दिवसात जास्त जेवणे ठरू शकते नुकसानदायक; हे सोपे उपाय करून टाळा धोका
गरम पाणी पिण्याचे तोटे
किडनीसाठी ठरू शकते धोकादायक
किडनी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे काम करते. सतत गरम पाणी प्यायल्याने डिहायड्रेशन होऊ शकते. जास्त गरम पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडत नाहीत. त्यामुळे किडनी खराब होण्याची शक्यता असते.
झोप पुर्ण होत नाही
रात्रीच्या वेळेस जर तुम्ही गरम पाणी पिऊन झोपला तर तुमची झोप पुर्ण होत नाही. कारण तुम्हाला सतत लघवीला लागल्यासारखे वाटते. तसेच रात्रीच्या वेळी गरम पाणी प्यायल्याने रक्तवाहिन्यांवर दबाव जाणवतो. झोप पुर्ण न झाल्यास अनेक शारीरिक, मानसिक आजरांना आमंत्रण मिळते. त्यामुळे रात्रीच्या वेळी गरम पाणी पिणे टाळावे.
डिहायड्रेशनची समस्या
निरोगी राहण्यासाठी शरीराला हायड्रेट ठेवणे गरजेचे असते. त्यासाठी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पण गरम पाणी प्यायल्याने डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते.
आणखी वाचा : रात्रीच्या जेवणात ‘या’ पदार्थांचा समावेश चुकूनही करू नका; ठरतील आरोग्यास धोकादायक
इलेक्ट्रोलाईट्सवर होतो परिणाम
जास्त गरम पाणी प्यायल्याने रक्तातील इलेक्ट्रोलाइट्स पेशींपेक्षा जास्त पातळ होऊ शकतात. रक्त आणि पेशी यांच्यातील संतुलन राखण्यासाठी रक्तातील अतिरिक्त पाणी पेशींमध्ये काढले जाते. त्यामुळे पेशी फुगतात आणि मेंदूवर दबाव वाढतो. यामुळे डोकेदुखी आणि इतर समस्या उद्भवू शकतात.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)