Stale Food: भारतामध्ये जेवणाला पूर्णब्रह्म असे म्हटले जाते. जेवण बाहेर फेकून देणे अन्नाचा अपमान करण्यासारखे आहे असे आपल्या देशात मानले जाते. त्यामुळे असंख्य भारतीय घरांमध्ये रात्री बनवलेले जेवण सकाळी किंवा सकाळी तयार केलेले अन्नपदार्थ रात्री जेवणामध्ये खाल्ले जातात. फोडणीचा भात, फोडणीची पोळी असे काही पदार्थ आपण खात असतो. पण शिळे अन्न खाल्याने अनेक आजार बळावू शकतात असे म्हटले जाते. उन्हाळ्यामध्ये शिळे अन्नपदार्थ खाल्याने नुकसान होऊ शकते.
तज्ज्ञांच्या मते, शिळे अन्न खाण्यापूर्वी गरम करणे योग्य असते. १५ सेकंदांमध्ये 165°F तापमानामध्ये जेवण गरम करुन खाऊ शकतो. असे केल्याने जेवण ताजे व रुचकर बनते. पण एकच पदार्थ सतत गरम केल्याने तो खाणे हानिकारक ठरु शकते. असे शिळे पदार्थ खाल्याने शरीराला त्रास होऊ शकतो. यामुळे तयार केलेला पदार्थ वेळेत खाण्याचा सल्ला दिला जातो.
शिळे अन्नपदार्थ खाणे योग्य की अयोग्य?
आयुर्वेदानुसार, जेवण तयार केल्यानंतर किमान ३ तासांमध्ये त्याचे सेवन करणे आवश्यक असते. गरम-गरम जेवणामध्ये अनेत पोषक तत्त्व असतात. तीन तासांनंतर हे घटक हळूहळू नाहीसे होत जातात. शिळे अन्नपदार्थ आपण खाऊ शकतो. पण ते २४ तासांमध्ये खाणे शरीरासाठी फायदेशीर असते. २४ तासांनंतर ते शिळे अन्न खाल्याने अपाय होऊ शकतात. घरामध्ये जास्तीचे अन्न राहिल्यास ते नीट साठवून ठेवावे. ते ताजे राहील, याची काळजी घ्यावी. शिळे जेवण ठराविक काळाआधी खाल्याने मानवी शरीराला कोणताही अपाय होत नाही.
शिळ्या पदार्थांच्या सेवनामुळे काय होते?
शिळे जेवणामुळे शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात. यामुळे अपचन होऊ शकते. पोटाला सूज येणे, पचनक्रियेमध्ये अडथळा निर्माण होणे अशा गोष्टी घडू शकतात. काही वेळेस यामुळे जुलाब, विषबाधा अशा समस्या उद्भवू शकतात. अन्नपदार्थ जर खूप दिवसांपूर्वी तयार केले असतील, तर त्याने स्वास्थ बिघडू शकते. जेवण ताजे, गरम-गरम असताना खाल्याने शरीराला जास्त पोषण मिळते असे आयुर्वदामध्ये म्हटले आहे.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)