Health Tips : निरोगी राहण्यासाठी योग्य आणि पुरेपूर आहार घेणे आवश्यक असते. परंतु बदलत्या जीवनशैलीमध्ये सर्वात जास्त दुर्लक्ष आहाराकडे होते. दैनंदिन कामांमधील गडबडीमध्ये आपले जेवणाकडे सहज दुर्लक्ष होते. अशात कोणते पदार्थ खाणे गरजेचे आहे, कोणते टाळायला हवे याचा विचार करायला वेळ मिळणे हे त्याहून कठीण. पण काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने कालांतराने त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यासाठी आहाराशी निगडीत बाबींची माहिती घेणे आवश्यक असते.
दिवसभरातील कामं करून थकल्यानंतर बहुतांश घरातील सर्वजण कुटुंबासोबत रात्रीचे जेवण करतात. अशावेळी आपण दोन घास जास्तचं खातो. पण रात्रीच्या वेळी कमी खाण्याचा सल्ला बरेच जण देतात, कारण जेवल्यानंतर सगळे लगेच झोपतात त्यामुळे शरीराची हालचाल होत नाही. अशात रात्रीच्या जेवणात नेमक्या कोणत्या पदार्थांचा समावेश करावा आणि कोणत्या पदार्थांचा समावेश करू नये असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. आयुर्वेदानुसार रात्रीच्या जेवणात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा जाणून घेऊया.
Health Tips : हृदयापासून मेंदूपर्यंत अनेक आजारांवर काजू आहे गुणकारी, जाणून घ्या फायदे
रात्रीच्या जेवणात या पदार्थांचा समावेश करावा
आयुर्वेदानुसार रात्रीच्या जेवणात कार्ब असणाऱ्या पदार्थांचा समावेश करावा. रात्रीचे जेवण बनवताना कडीपत्ता, हळद, डाळी आणि थोड्या प्रमाणात आले अशा पदार्थांचा समावेश करू शकता. तसेच रात्रीच्या जेवणात हलक्या पदार्थांचा समावेश करावा. कारण रात्री शरीराची हालचाल होत नाही त्यामुळे फॅट जमा होण्याची शक्यता असते. योग्य प्रमाणात अन्नपदार्थांचे सेवन केले जात आहे ना हे देखील लक्षात ठेवा.
रात्रीच्या जेवणात हे पदार्थ खाणे टाळा
आयुर्वेदानुसार रात्रीच्या जेवणात तेलकट, पचायला जड असणारे पदार्थ, मिठाई, चॉकलेट, मांसाहारी पदार्थ, आईसक्रीम, दही अशा पदार्थांचा समावेश टाळावा. जंक फूड आणि स्टोर केलेले अन्नपदार्थ खाणेदेखील टाळावे. या पदार्थांच्या सेवनाने अपचन, कफ होणे, लठ्ठपणा अशा समस्या उद्भवू शकतात.