Weight Loss Exercises : आपल्या शरीराला आहाराबरोबर हालचालींचीदेखील तितकीच गरज असते. त्यामुळे डॉक्टर नेहमी व्यायामाचा सल्ला देतात. पण, वाढत्या वजनामुळे अनेकांना व्यायाम करणं झेपत नाही. अशांसाठी काही सोपे व्यायामप्रकार आज जाणून घेणार आहोत.

हल्ली वाढत्या वजनामुळे अनेक जण त्रस्त आहेत. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी लोक विविध उपाय करून पाहतात. त्यात वजन कमी करण्यासाठी व्यायाम हा उत्तम उपाय सांगितला जातो; पण जास्त वजनामुळे अनेकांना व्यायाम करणं अवघड जातं. विशेषत: ७० किलोपेक्षा अधिक वजन असलेल्या लोकांना उडी मारणे किंवा धावण्याचे व्यायाम करणं कठीण काम वाटू शकतं. हे करताना दुखापत होण्याचा धोका लक्षात घेता, तज्ज्ञांकडूनही व्यायाम करताना काळजी घेण्याचे आवाहन केले जाते. पण, आता काळजीचे कारण नाही; कारण फॅट लॉस अँड गट रिसेट कोच डॅनियल लिओ यांनी ७० किलोपेक्षा अधिक वजन असणाऱ्यांसाठी काही सोपे व्यायामप्रकार सांगितले आहेत. त्यांच्या मदतीने तुम्ही काही दिवसांत फरक अनुभव घेऊ शकता.

फाय नी क्लॅप (५० वेळा)
स्क्वॅट (५० वेळा)
फाय नी टॅप (५० वेळा)
रॉ द बोट (५० वेळा)
साईड बेंड (५० वेळा)
पंच साईट टू साईट (५० वेळा)
साईड जॅक (५० वेळा)
बट किकर (५० वेळा)
फाय नी (५० वेळा)
क्रॉस क्रंच (५० वेळा)

(हे व्यायाम प्रकार कशाप्रकारे करायचे याचा इन्स्टाग्राम व्हिडीओ खाली दिलेला आहे)

हे सर्व १० व्यायामप्रकार तुम्ही रोज दोन ते चार सेटमध्ये करा आणि सात दिवसांत फरक पाहा.

या व्यायामप्रकारांमुळे खरंच फरक दिसेल का?

‘डीटीएफ’च्या संस्थापक व आहारतज्ज्ञ सोनिया बक्षी यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, पोस्टमधील व्यायाम़प्रकार शारीरिक ताकद, स्थिरता व सातत्य निर्माण करण्यासाठी खूप प्रभावी आहेत. या व्यायामप्रकारांमुळे तुम्हाला शारीरिकदृष्ट्या मजबूत आणि सकारात्मक वाटण्यास मदत होईल.

या व्यायामांमुळे स्नायूंची वाढ आणि वजन कमी होण्यासाठी मदत होईलच; पण त्याचबरोबर योग्य आहार घेणेदेखील आवश्यक आहे, असेही बक्षी पुढे म्हणाल्या.

त्याशिवाय तु्म्ही वॉल पुश-अप्सदेखील करू शकता. त्यात प्लँक्स हा व्यायामप्रकार प्रत्येक जण करू शकतो. प्लँक्सच्या मदतीने कोर स्ट्रेंथमध्ये वाढ, शारीरिक लवचिकता सुधारणे व पाठदुखीचा त्रास कमी करण्यासही मदत होऊ शकते.

तसेच सतत दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे ताण आणि चिंता कमी होण्यास मदत होईल. कारण- दीर्घ श्वासोच्छ्वासामुळे स्नायूंना अधिक ऑक्सिजन मिळण्यास मदत होते. त्यामुळे पेटके आणि थकवा येण्याचा धोका कमी होतो. त्यासाठी नाकातून दीर्घ श्वास घ्या आणि नंतर तो तोंडावाटे हळूहळू बाहेर सोडा, असे बक्षी म्हणाल्या.

एकदा तुमचे शरीर या व्यायामप्रकारांशी जुळवून घेऊ लागले की, वजन कमी करण्यासाठी इतर थोडे कठीण व्यायाम (HIIT) प्रकारही करू शकता. पण, यासाठी तुम्हाला योग्य प्रशिक्षकाची गरज भासेल. व्यायामाव्यतिरिक्त आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. कार्बोहायड्रेट्सयुक्त आहाराचे सेवन कमी करून प्रोटीनयुक्त आहाराचे सेवन करणे अनुकूल ठरू शकते. फॅट्स कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीने साखर, गोड पदार्थ, साखरयुक्त पेये आणि अल्कोहोलचे सेवन टाळणे महत्त्वाचे आहे.

काहीच न करण्यापेक्षा शरीराची थोडीफार का होईना हालचाल करणे महत्वाचे आहे. तसेच तुम्हाला काही दीर्घकालीन आरोग्य समस्या असतील, तर त्यावर योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणेही अत्यंत गरजेचे आहे.

Story img Loader