10 Famous Myths : आरोग्य आणि फिटनेस हे आहाराशिवाय अपूर्ण आहे. तुम्ही जे काही अन्नपदार्थ सेवन करता त्याचा परिणाम फक्त शारीरिकच नव्हे तर मानसिक, त्वचा आणि केसांच्या आरोग्यावरसुद्धा होतो. त्यामुळे आहाराविषयी योग्य माहिती असणे आवश्यक आहे.
२०२५ मध्ये पदार्पण करताना तुम्ही चांगल्या आहाराच्या सवयी लावू शकता. त्यासाठी काही प्रचलित गैरसमज दूर करणे गरजेचे आहे, ज्यामुळे तुम्हाला संपूर्ण आरोग्यासाठी आहाराचे महत्त्व समजून घेणे सोपे जाईल.
मुंबई-परळ येथील ग्लेनिगल्स हॉस्पिटलच्या इंटर्नल मेडिसिनच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. मंजुषा अग्रवाल यांनी काही खालील गैरसमज दूर केले आहेत.
१. कर्बोदके तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही?
कर्बोदके हे अनेकदा आरोग्यासाठी चांगले नाही असे मानले जाते, पण कर्बोदके मेंदूच्या कार्यासाठी आणि ऊर्जा पातळी राखण्यासाठी अतिशय आवश्यक आहेत. कर्बोदकांचे एका ठराविक प्रमाणात सेवन करणे फायद्याचे ठरू शकते. कर्बोदकेयुक्त धान्य, फळे आणि भाज्यांचे सेवन संतुलित आहार घेण्यास मदत करतात.
२. रोज आठ ग्लास पाणी प्यावे?
तुम्ही दिवसभरात किती शारीरिक हालचाल करता, तुम्ही कोणत्या वातावरणात राहता आणि तुमची एकूण आरोग्य स्थिती कशी आहे, यासारख्या विविध घटकांवर पाण्याचे सेवन अवलंबून आहे. किती ग्लास पाणी प्यावे, हे व्यक्तीपरत्वे बदलू शकते. आठ ग्लास पिणे हे एकमेव उत्तर नाही. यापेक्षा कमी पाणी पिणे किंवा जास्त पाणी पिणेसुद्धा तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
३. महागडी स्किनकेअर प्रोडक्ट वापरल्याने चांगले परिणाम दिसून येतात?
तुमची स्किनकेअर प्रोडक्ट किती महाग आहेत, यामुळे तुमच्या त्वचेवर काही फरक पडत नाही. तुमचे स्किनकेअर प्रोडक्ट तुमच्या त्वचेचा प्रकार, पोत, टोनला सोयीस्कर असले पाहिजे; तेव्हाच योग्य तो परिणाम दिसून येईल, मग त्याची किंमत कितीही असो.
४. धूम्रपानापेक्षा व्हेपिंग अधिक सुरक्षित आहे?
धूम्रपान किंवा व्हेपिंग हे आपल्या फुफ्फुसांना हानी पोहोचवते आणि निकोटीनमुळे आपल्याला व्यसनाधीन बनवते. धूम्रपानापेक्षा व्हेपिंग अधिक सुरक्षित आहे असा अनेकांचा गैरसमज आहे. खरं तर धूम्रपान आणि व्हेपिंग या दोन्ही सवयी सोडणे चांगल्या आरोग्यासाठी खूप गरजेच्या आहेत.
५. उपाशी राहिल्याने वजन लवकर कमी होते
वजन कमी करण्यासाठी काही लोक दीर्घकाळ उपाशी राहतात. पण, तुम्हाला माहितीये का यामुळे तुमची चयापचय क्रिया मंद होऊ शकते, ज्यामुळे वजन कमी करणे आणखी कठीण होऊन जाते. दीर्घकाळ उपाशी राहिल्यानंतर तुम्हाला एकाच वेळी खूप जास्त अन्न खावे असे वाटते, त्यामुळे थोडे थोडे कमी अन्नाचे सेवन करा आणि संतुलित आहारावर लक्ष केंद्रित करा.
६. प्रत्येक ग्लुकोज स्पाइक आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही?
दर दोन तासांनी रक्तातील साखर मोजण्यामागे कारण आहे. “मध्यम स्पाइक आणि तीव्र स्पाइक इन्सुलिन रेझिस्टंससारख्या आरोग्याच्या समस्या विषयी माहिती सांगते.” हैदराबाद येथील ग्लेनेगल्स अवेअर हॉस्पिटलचे मुख्य आहारतज्ज्ञ डॉ. बिराली स्वेथा सांगतात
७.स्ट्रेंथ ट्रेनिंग स्त्रियांसाठी योग्य नाही?
पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी खूपच कमी असते, त्यामुळे स्ट्रेंथ ट्रेनिंग स्त्रियांसाठी चांगली आहे. “हाडांचे आरोग्य, आणि फिटनेस सुधारण्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग अत्यावश्यक आहे”, असे डॉ. बिराली सांगतात.
८. कच्च्या भाज्यांचे रस पिणे हे निरोगी आरोग्यासाठीचा एकमेव पर्याय आहे
सर्व कच्च्या भाज्यांमध्ये ऑक्सलेट असतात, जे जास्त प्रमाणात सेवन केल्यास किडनी स्टोनसुद्धा होऊ शकतात. जर या भाज्या शिजवून खाल्ल्या तर अधिक चांगले आहे. “रस हे जीवनसत्त्वांचा चांगला स्रोत असू शकतो, पण त्यात फायबरचा अभाव असतो, जे पचनासाठी आणि भूक कमी करण्यासाठी आवश्यक आहे. सर्व भाज्या आरोग्यासाठी चांगल्या आहेत, पण संतुलित पोषण आहार घेणे दीर्घकालीन आरोग्यासाठी चांगले आहे,” असे डॉ. बिराली सांगतात
हेही वाचा : Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैक पिते ताजा टोमॅटोचा ज्यूस; तज्ज्ञांनी सांगितले याचे फायदे
९. A2 तूप हे अतिशय उपयुक्त आहे
A2 दूध वापरून बनवलेले तूप, ज्यामध्ये फक्त A2 बीटा केसीन प्रकारचे प्रोटिन असते, त्याला A2 तूप म्हणतात. यात फॅट्स असतात. “या तुपात आरोग्यासाठी फायदेशीर फॅट्स असले तरी तितके उपयोगाचे नाही. या तुपाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने वजन वाढू शकते किंवा हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यासाठी या तुपाचे सेवन करताना समतोल राखणे महत्त्वाचे आहे,” असा डॉ. बिराली यांनी दावा केला आहे.
१०. बियाणे तेल आरोग्यासाठी चांगले नाही
वनस्पती आधारित बियांच्या तेलांमध्ये अनसॅच्युरेडेट फॅटी ॲसिडस् भरपूर प्रमाणात असतात, ज्याची आपल्या शरीराला गरज असते. तसेच सर्व प्रकारचे तेल हे कॅलरीयु्क्त असतात, म्हणून तुम्ही वापरत असलेल्या तेलाच्या प्रकारापेक्षा तुमचे एकूण फॅट्सचे सेवन यावरून चांगल्या आरोग्याचा अंदाज घेता येतो.
डॉ. बिराली सांगतात की, सूर्यफूल किंवा कॅनोला तेल यासारखे बियाणे तेल नैसर्गिकरित्या हानिकारक नसतात. “योग्य प्रमाणात वापरल्यास, ते निरोगी आहाराचा भाग बनू शकतात. याचे अतिसेवन आणि विविध प्रकारच्या फॅट्सचा अभाव हा एक चिंतेचा भाग आहे,” असे डॉ. बिराली पुढे सांगतात.
© IE Online Media Services (P) Ltd