Bhendi Benfits: आपल्याकडे असं म्हणतात की जगात दोन पद्धतीची लोकं असतात, एक म्हणजे ज्यांना भेंडीची भाजी खूप आवडते आणि दुसरे म्हणजे ज्यांना भेंडीची भाजी नीट कशी बनवायची हे माहीतच नसते. योग्य पद्धतीचे शिजवल्यास भेंडीचा चिकटपणा सहज गायब होऊ शकतो आणि यामुळेच भेंडी चवीलाही कमाल लागते. अशाच चविष्ट भेंडीचे आरोग्याला सुद्धा कमाल फायदे आहेत. १०० ग्रॅम भेंडी सुद्धा तुम्हाला काय फायदे देऊ शकते हे आज आपण तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत. गुरू प्रसाद दास, वरिष्ठ आहारतज्ञ, केअर हॉस्पिटल्स, भुवनेश्वर यांच्या मते, भेंडीमंडई भरपूर फायबर, व्हिटॅमिन सी सारखे अँटिऑक्सिडंट आणि इतर अनेक जीवनसत्त्व असतात. १०० ग्रॅम भेंडीतील जीवनसत्त्वांची व पोषण मुल्यांची आकडेवारी जाणूनघेऊया ..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१०० ग्रॅम भेंडी म्हणजे…

  • कॅलरी: 35
  • फॅट्स 0.2 ग्रॅम
  • सोडियम: 6.9 मिलीग्राम
  • कार्ब्स 6.4 ग्रॅम
  • फायबर: 1.2 ग्रॅम
  • साखर: 1.5 ग्रॅम
  • प्रथिने: 1.9 ग्रॅम
  • व्हिटॅमिन सी: 13 मिलीग्राम
  • व्हिटॅमिन के: 31.3 मायक्रोग्राम
  • फोलेट: 105.1 मायक्रोग्राम
  • मॅग्नेशियम: 53 मिलीग्राम
  • पोटॅशियम: 103 मिलीग्राम

भेंडीच्या सेवनाने आरोग्याला काय फायदे मिळतात? (Health Benefits Of Bhendi)

1) फायबर: भेंडीमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असल्याने भेंडीची भाजी पचनास मदत करते, आतड्यांच्या आरोग्यास प्रोत्साहन देते आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करू शकते.

2) अँटिऑक्सिडंट्स: भेंडीमध्ये व्हिटॅमिन सी आणि विविध फायटो केमिकल्ससारखे अँटिऑक्सिडंट असतात जे ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात.

3) भेंडी जीवनसत्त्वे सी आणि के, फोलेट, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे.

4) भेंडीमधील फायबर आणि इतर संयुगे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात.

डायबिटीस रुग्ण भेंडी खाऊ शकतात का?

दास यांच्या माहितीनुसार, भेंडीमध्ये कमी कॅलरीज असतात आणि त्यात फायबरचे प्रमाण मुबलक असते, त्यामुळे भेंडीचे सेवन रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करू शकते. शिवाय भेंडीचा ग्लायसेमिक इंडेक्स सुद्धा कमी आहे. मात्र रक्तातील साखर संतुलित ठेवण्यासाठी भेंडीचे सेवन हे सुद्धा प्रमाणात करणे आवश्यक आहे.

गर्भवती महिलांसाठी भेंडी सुरक्षित आहे का?

भेंडीमध्ये व्हिटॅमिन ए आणि सी मुबलक प्रमाणात असते जे रोगप्रतिकारक शक्ती आणि संपूर्ण आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात. शिवाय भेंडीमधील फोलेट हे गर्भाच्या विकासासाठी उत्तम ठरते म्हणूनच गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात भेंडीचे सेवन फायदेशीर ठरू शकते. गर्भारपणात अनेक महिलांना बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवतो ज्यावर भेंडीतील फायबर हे उत्तम उपाय ठरू शकते.

हे ही वाचा<< १०० ग्रॅम कांदा शरीराला काय काय देऊ शकतो? कोणी खावा, कोणी टाळावा, नेमकी माहिती इथे वाचा

दरम्यान भेंडीच्या अतिसेवनामुळे काही दुष्परिणाम सुद्धा होऊ शकतात. भिंडीमध्ये ऑक्सॅलिक ऍसिड नावाचे संयुग असते, जे शरीरात कॅल्शियम शोषून घेण्यास व्यत्यय आणू शकतात शिवाय भेंडींमधील बियांमुळे किडनी स्टोन असणा-या लोकांसाठी किंवा किडनीचे आजार असलेल्या लोकांसाठी सेवनावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. मुळात भेंडीतील चिकटपणा शरीराची पचनसंस्था सक्रिय करून मूत्रपिंडाला मदतच करतो पण तरीही संतुलित आहाराने तुम्ही संभाव्य धोके टाळू शकता.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. गरज भासल्यास वैद्यकीय सल्ला आवर्जून घ्या)

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 100 gram bhindi nutrition value how bhendi can help in diabetes blood sugar control and pregnant ladies problems health news svs