18 Years Old Student Death Heart Attack: मध्य प्रदेशातील इंदूर येथील १८ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा कोचिंग क्लासमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे प्रकरण सध्या समोर आला आहे. इतक्या तरुण वयात हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का याविषयी अनेकांना कुतूहल वाटत आहे. मागील काही कालावधीत समोर आलेल्या प्रकारणांनुसार, जगभरातील इतर लोकसंख्येच्या तुलनेत किमान दहा वर्षं आधी भारतीयांमध्ये हृदयविकाराची लक्षणे दिसतात. किशोरवयीन मुलांमध्ये याचे प्रमाण वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे परीक्षेच्या वेळी प्रचंड दबावामुळे हृदयावर येणारा ताण, तसेच आहार, विश्रांती, झोप आणि व्यायामाच्या दिनचर्येत अनियमितता. इंदूर मधील घटनेमागील कारण काय असू शकतं? अशा प्रकारची जोखीम वाढण्यासाठी कोणते घटक कारणीभूत असू शकतात? याविषयी आज आपण इंडियन एक्सस्प्रेसला तज्ज्ञांनी सांगितलेले महत्त्वाचे मुद्दे जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ. राजीव भागवत, इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट, नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मुंबई यांनी इंडियन एक्सस्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, “किशोरवयीन गटातील हृदयविकाराचा झटका हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी (एचसीएम) मुळे येऊ शकतो, जो सहसा एक दुर्मिळ अनुवांशिक विकार असतो. ही स्थिती हृदयाच्या स्नायूंमध्ये कडकपणा आणते आणि यामुळे हृदयाला आवश्यक प्रमाणात रक्त पंप करता येत नाही.

अचानक येणाऱ्या हृदयविकाराच्या झटक्याआधी लक्षणे दिसतात का? कशी ओळखावीत?

काही लोकांमध्ये अशा परिस्थितीत लक्षणे दिसत नाहीत तर इतरांना तणावाच्या परिस्थितीत, व्यायाम करताना किंवा शारीरिक, मानसिक कष्ट करत असताना लक्षणे जाणवू शकतात. अशा मंडळींना संपूर्णपणे अस्वस्थता जाणवेपर्यंत आपल्याला होत असलेल्या त्रासाचा अंदाजही येत नाही. जेव्हा रक्तवाहिन्या आधीच अरुंद झालेल्या असतात तेव्हा काही प्रमाणात लक्षणे दिसून येऊ शकतात जसे की अचानक छातीत दुखणे, हृदयाची लय कमी जास्त वेगाने होऊ लागणे, प्रचंड थकवा येणे, बेशुद्ध होणे, अस्वस्थता जाणवणे, इत्यादी लक्षणे प्राथमिक टप्प्यावर दिसून येऊ शकतात.

कमी वयात हृदयविकाराचा झटका येण्याचे कारण काय?

डॉ भागवत म्हणतात की, आपल्यापैकी अनेकांना माहीत नसलेली गोष्ट म्हणजे बाळाचा जन्म होताच शरीरात फॅटी स्ट्रीक्स बनू लागतात. अनुवांशिकदृष्ट्या धमन्यांमध्ये फॅट्स जमा झाल्यास, वेगाने प्लॅक वाढू लागतो त्यामुळे लहान वयातच हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. या हृदयविकाराच्या झटक्याचे स्वरूप काहीवेळा इतके तीव्र असू शकते की, हृदयाच्या ठोक्यासह हृदयाच्या खालच्या कप्प्यातील चेंबर्स व व्हेंट्रीकल्स आकुंचन प्रसारण पावण्याऐवजी थरथरू लागतात. याला व्हेंट्रीक्युलर फायब्रिलेशन म्हटले जाते, याने एकंदरीत शरीरात ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा कमी होतो परिणामी अवयवांची कार्यक्षमता कमी होऊन मृत्यू सुद्धा होऊ शकतो.

हृदयावर ताण आणणारी किंवा हृदयाच्या ऊतींना नुकसान पोहोचवणारी कोणतीही स्थिती अचानक मृत्यूचा धोका वाढवू शकते. कधीकधी तीव्र शारीरिक हालचालींमुळे हृदयरोगाचे निदान न झालेले किंवा कौटुंबिक इतिहास नसूनही तरुणांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते.

स्ट्रेस कार्डिओमायोपॅथी म्हणजे काय?

जरी एखाद्याचा कौटुंबिक इतिहास नसला तरीही, एखाद्याला ‘स्ट्रेस कार्डिओमायोपॅथी’ चा धोका निर्माण होऊ शकतो. तीव्र शारीरिक आणि भावनिक तणावामुळे उद्भवणारी ही स्थिती असते, ज्यामुळे प्लेक फुटल्याशिवाय हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याला सहसा वेळेवर न खाणे किंवा तासनतास न झोपणे अशा घातक सवयी जडलेल्या असू शकतात.

डॉ भागवत सांगतात की, “जेव्हा तुम्ही तणावपूर्ण प्रसंग अनुभवता, तेव्हा तुमचे शरीर एड्रेनालाईनसारखे हार्मोन तयार करते, ज्याचे जास्त प्रमाण हृदयावर परिणाम करू शकते. यामुळे हृदयाला रक्ताचा पुरवठा करणार्‍या लहान धमन्या अरुंद होऊ शकतात, रक्त प्रवाह कमी होतो आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. कधीकधी एड्रेनालाईन थेट हृदयाच्या पेशींना जाऊन चिकटते, ज्यामुळे कॅल्शियम मोठ्या प्रमाणात पेशींमध्ये प्रवेश करते. त्यामुळे हृदयाच्या नियमित लयीत व्यत्यय येतो. म्हणूनच विद्यार्थ्यांनी योग्य खाणे, विश्रांती घेणे आणि पुरेशी झोप आणि व्यायाम करणे आवश्यक आहे. “

हे ही वाचा<< 90-30- 50 चा फंडा वजन कमी करताना जपेल जिभेचे चोचले; तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे ‘असं’ असावं डाएटचं ताट

तरुणांमध्ये अचानक येणारा हृदय विकाराचा झटका टाळता येऊ शकतो का?

अन्य विकार असल्यास, कौटुंबिक इतिहास असल्यास हृदयाची तपासणी करणे आवश्यक असते. “हृदयाच्या लयीवर सतत लक्ष ठेवण्यासाठी औषध किंवा इम्प्लांट करण्यायोग्य कार्डिओव्हर्टर-डिफिब्रिलेटर (ICD) छातीत ठेवले जाऊ शकते. हृदयाचे ठोके असामान्य झाले तर, ICD ला ही गोष्ट जाणवेल आणि हृदयाची लय सुरळीत करण्यासाठी ताबडतोब विजेसारखा झटका दिला जाईल. वयाच्या विशीतच नीट तपासणी करणे, जीवनशैलीत सुधारणा करणे व सर्वात महत्त्वाचे म्हणजे तज्ज्ञांचा सल्ला घेणे हे सुरक्षित राहण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 18 year old student dies of heart attack in a coaching class what triggered heart disease in 20s cardiologist explains risk and signs svs
First published on: 19-01-2024 at 18:45 IST