Weight Loss Remedies: आपण ती म्हण ऐकलीये का, ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये. कोणत्याही गोष्टीचे प्रमाणापेक्षा जास्त सेवन हे घातकच हे सांगायची वेळ येते कारण तुमच्या आमच्यातील अनेकांना बिंज इटिंगची म्हणजेच सतत खात राहण्याची सवय असते. ही मंडळी एकवेळ कमी जेवतील पण इतर वेळेस मात्र सुक्या खाऊवर ताव मारण्यात यांचा पहिला नंबर असतो. मूठभर चिप्स, फरसाण, गाठीया, कोल्ड्रिंक्सच्या बॉटल्स हे म्हणजे जेवण नाही पण ‘OTT अँड चिल’ च्या काळात या ‘कुरुमकुरुम’ खाण्याकडे अधिकाधिक लोक आवडीने वळू लागले आहेत. ही सवय लवकरात लवकर मोडावी हे तर आपण अनेकदा ऐकले असेल, स्वतःलाही पटत असेल पण समजा एखाद्या वेळेस तुमच्याकडूनही खूप खाल्लं गेलं तर काय करावं हे आज आपण पाहणार आहोत. सोशल मीडियावर हेल्थ अँड वेलनेस कोच दिलशाद याकूबी यांनी एका पोस्टमार्फत बिंज इटिंगनंतर वजन वाढण्याची शक्यता कमी करण्यासाठी कोमट पाण्याचा एक उपाय शेअर केला आहे. फ्लॅक्ससीड, हिमालयन पिंक सॉल्ट (सैंधव मीठ) व कोमट पाणी यांच्या सेवनाने खरोखरच आपल्याला वजन व जळजळ कमी करण्यास मदत होऊ शकते हे जाणून घेऊया..

कोमट पाण्याचा उपाय नेमका काम कसा करतो?

स्पर्श हॉस्पिटल, बंगळुरू येथील वरिष्ठ क्लिनिकल आहारतज्ज्ञ सौम्या नाडकर्णी यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, फ्लॅक्ससीड (अंबाडीच्या बिया), सैंधव मीठ व कोमट पाणी हे तीन घटक जेव्हा एकत्र येतात तेव्हा ‘सिनेर्जिस्टिक प्रभाव’ तयार होतो. जो खूप खाल्ल्यानंतर पोट बिघडण्याच्या शक्यता कमी करतो.

पचनास मदत: फ्लॅक्ससीडच्या पावडरमधील विरघळणारे फायबर पोटात जेलसारखा पदार्थ बनवतात, जे आतड्यांच्या हालचालींचे नियमन करण्यास मदत करतात. सोप्या शब्दात सांगायचं तर यामुळे शरीरातून बाहेर टाकण्यासाठी एकाप्रकारचे ल्युब्रिकेशन आतड्यांमध्ये तयार होते व हे बद्धकोष्ठता कमी करू शकते आणि पोट स्वच्छ होण्याचा नियमितपणा वाढवू शकते.

इलेक्ट्रोलाइट संतुलन आणि हायड्रेशन: हिमालयीन पिंक सॉल्ट (सैंधव मीठ) हे इलेक्ट्रोलाइट्सचा शरीराला पुरवठा करण्यास मदत करते. आपण जेव्हा खूप खातो तेव्हा पाणी पिण्याचे प्रमाण कमी झालेले असते. या निर्जलीकरणामुळे इलेक्ट्रोलाइट्सचे असंतुलन होऊ शकते. कोमट पाण्यातून फ्लॅक्ससीड्स व पिंक सॉल्ट घेतल्याने शरीरात इलेक्ट्रोलाइट्सची पातळी स्थिरावते.

पोषणासाठी सर्वोत्तम: कोमट पाणी गॅस्ट्रोइंटेस्टाइनल मार्गाला शांत करते, सूज कमी करते आणि पचन प्रक्रियेस मदत करते. परिणामी शरीरातून टाकाऊ पदार्थ बाहेर पडतात व आवश्यक सत्वांचे शरीरात नीट शोषण होते. हे तिन्ही घटक फायबर, आवश्यक खनिजे आणि हायड्रेशन देऊन शरीराला संतुलन बाळगण्यास मदत करतात.

२ चमचे अंबाडीच्या बिया करू शकतात कमाल

एस्टर सीएमआय हॉस्पिटल, बंगळुरूच्या पोषण आणि आहारशास्त्र विभागाच्या प्रमुख एडविना राज यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, फ्लॅक्ससीड्स हे ओमेगा 3, लिग्नॅन्स व अँटिऑक्सिडंट्स सारख्या इतर फायदेशीर पोषक घटकांसह न विरघळणाऱ्या व विरघळणाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या फायबरचे उत्कृष्ट स्त्रोत आहेत. २ चमचे अंबाडीच्या बियांमध्ये ८ ग्रॅम फायबर, ६ ग्रॅम प्रथिने, १३५ कॅलरीज व ३८०० मिली ओमेगा ३ असते. वजन कमी करणे, बद्धकोष्ठता, जळजळ कमी करणे, हृदयविकार कमी करणे आणि कर्करोगाचा धोका कमी करणे हे त्याचे काही संभाव्य फायदे लक्षात घेता फ्लॅक्ससीड्स हे एक सुपरफूड आहे असेही म्हणता येईल.

हे ही वाचा<< गाडीच्या प्रवासात मळमळ, उलटी होत असेल तर लिंबू जवळ ठेवाच! डॉक्टरांनी सांगितले फायदे, लिंबू खाऊ नका उलट असा वापरा

नाहीतर उपायच करेल घात!

मात्र आपण एडविना यांनी सांगितलेली ही बाब सुद्धा लक्षात घ्यायला हवी की, फ्लॅक्ससीड्सचे सेवन हा वजन कमी करण्याचा जादुई उपाय नाही. आपल्याला जर वजनावर नियंत्रण ठेवायचे असेल तर पुरेशा प्रमाणात द्रवपदार्थांचे सेवन, नियमित व्यायाम व निरोगी जीवनशैली यांचा मेळ साधायला हवा. शिवाय आपण पाहिलेला हा उपाय वापरताना सुद्धा अतिरेक करूच नये. फ्लॅक्ससीड्सचे अतिसेवन केल्यास पोट बिघडू शकते व पुन्हा वेगळ्या पचन समस्या उद्भवू शकतात. शिवाय गर्भवती महिला, थायरॉईडचा त्रास असल्यास किंवा किडनी संबंधित विकाराने ग्रस्त असणाऱ्यांनी सुद्धा हा उपाय विचारपूर्वक आपल्या दिनचर्येत जोडावा. त्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.