A 93-year-old athlete is as healthy as a 40-year-old: ९३ व्या वर्षी, रिचर्ड मॉर्गन ही व्यक्ती त्याच्या वयाच्या अर्ध्याहुनही कमी वयाच्या व्यक्तीपेक्षा जास्त फिट आहे असे दाखवून देणारा अहवाल गेल्या महिन्यात जर्नल ऑफ अप्लाइड फिजियोलॉजीमध्ये प्रकाशित झाला होता. आयर्लंडचे नागरिक असलेले मॉर्गन यांची फिटनेस ही चर्चेचा मुद्दा ठरत आहे. मॉर्गन हे व्यवसायाने बेकर होते आणि आता सध्या निवृत्त आयुष्य जगत आहेत. त्यांच्या फिटनेसच्या चर्चा ऐकल्यावर कदाचित आपल्यालाही असे वाटू शकत असेल की कित्येक वर्षे ही व्यक्ती कठोर परिश्रम करत असेल, व्यायाम, आहार सगळ्यात किती नियम पाळले असतील, इत्यादी पण मुळात तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की मॉर्गन यांनी ७३ व्या वर्षापर्यंत विशेष असा व्यायाम केलेलाच नव्हता.
इनडोअर रोइंगमध्ये चार वेळा विश्वविजेते असलेले मॉर्गन ९२ वर्षांचे असताना त्यांच्या फिटनेसविषयी अभ्यास झाला होता. त्यांच्या हृदयाचे आरोग्य, स्नायूंचे वजन व एकूण तंदुरुस्ती हे एखाद्या ३० ते ४० वयाच्या व्यक्तीसारखेच आहे. याविषयी मॉर्गन यांनी वॉशिंग्टन पोस्टला माहिती देताना आपल्या फिटनेसच्या रुटीनबद्दल सांगितले, ते म्हणाले एके दिवशी अचानकच त्यांना हे रुटीन आवडू लागले आणि मग हेच रुटीन त्यांच्या आयुष्याचा एक भाग झाले.
मॉर्गन यांना काही अनुवांशिक फायदे असू शकतात, परंतु संशोधकांनी असे म्हटले आहे की त्याच्या चांगल्या आरोग्याचा किमान काही टक्के श्रेय त्याने दोन दशकांपूर्वी वयाच्या ७३ व्या वर्षी सुरू केलेल्या दिनचर्येला द्यायला हवे. दीर्घकालीन परिणामांसाठी सातत्य कायम आहे हे अधोरेखित करणारा त्यांचा प्रवास आहे. तसेच शिस्त हा व्यायामातील किती महत्त्वाचा भाग आहे हे सांगणारी मॉर्गन यांची सवय म्हणजे व्यायाम सुरू करण्यास त्यांना कधीही उशीर झालेला नाही तसेच त्यांच्या आहारात सुद्धा नियमित अधिक प्रोटीनयुक्त पदार्थ समाविष्ट असतात.
डॉक्टरांचं मत काय?
डॉ. सुनील जी किनी, सल्लागार, ऑर्थोपेडिक आणि रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरी, मणिपाल हॉस्पिटल्स यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, व्यायामाची पथ्ये सुरू करण्यासाठी वयोमर्यादा नसतात आणि तुम्ही केव्हाही सुरुवात केली तरी फायदे निश्चित असतात. मात्र तुम्ही वयाच्या जितक्या लवकरच्या टप्यावर सुरुवात कराल तितके जास्त फायदे तुमच्या वाट्याला येऊ शकतात.
तर केअर हॉस्पिटल्सच्या जॉइंट रिप्लेसमेंट आणि आर्थ्रोस्कोपिक सर्जन विभागाचे प्रमुख,वरिष्ठ सल्लागार, डॉ रत्नाकर राव यांच्या म्हणण्यानुसार, वृद्धापकाळात व्यायाम केल्याने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारणे, गतिशील राहण्यास मदत होणे, स्नायूंची ताकद आणि हृदयविकार आणि मधुमेह यांसारख्या जुनाट परिस्थितींचा धोका कमी करणे असे अनेक फायदे होऊ शकते. तसेच हे मानसिक आरोग्यासाठी देखील योगदान देऊ शकते. वृद्धपकाळात इराणवरील अवलंबत्व कमी करण्यासाठी याचा खूप फायदा होऊ शकतो.
तुम्हीही आयुष्यात उशिराने व्यायाम करायला सुरुवात केली असेल तर काय करावे आणि करू नये याची यादी पाहायला विसरु नका .
काय करावे?
- कोणताही व्यायाम कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी चर्चा आवर्जून करा.
- कमी प्रभाव असलेल्या व्यायामापासून सुरुवात करा आणि हळूहळू उच्च तीव्रतेच्या व्यायाम प्रकारांकडे वळा.
- एरोबिक व्यायाम (उदा. चालणे, पोहणे) आणि सामर्थ्य प्रशिक्षण यांचे मिश्रण असलेले रुटीन फॉलो करा.
- आपल्या शरीराचे ऐका आणि वेदना किंवा अस्वस्थतेच्या लक्षणांकडे लक्ष द्या.
- हायड्रेटेड राहा आणि तुमच्या फिटनेसच्या उद्दिष्टांना पाठिंबा देण्यासाठी संतुलित आहार ठेवा.
- लवचिकता वाढवणाऱ्या व्यायाम प्रकारांवर भर द्या
- तुम्हाला आवड असेल असे व्यायाम प्रकार निवडा
काय करू नये?
- उगाच ताण घेऊ नका, स्वतःला त्रास होईल असे व्यायाम करण्यापेक्षा शरीराला हळुहळू सवय लावा.
- काही विशिष्ट त्रास असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन उच्च तीव्रतेचे व्यायाम टाळा
- व्यायामाच्या आधी वॉर्म अप व व्यायाम झाल्यावर कूल डाऊन करणे टाळू नका.
- वेदनाच होत असतील तर व्यायाम करणे टाळा किंवा प्रकार, तीव्रता बदलून पाहा
- आठवड्यात एकदा तरी शरीराला फक्त आराम द्या.
- आहारात अधिक कॅलरीज किंवा पचनास जड पदार्थांचे सेवन टाळा
- तुमच्या क्षमता ओलांडताना संकोच बाळगणे टाळा.
हे ही वाचा << पूनम पांडेच्या मृत्यूचं कारण ठरलेला गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग का होतो? ‘या’ लक्षणांनी शरीर देत असतं संकेत
लक्षात घ्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यास कधीही उशीर होत त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आपणही आज अगदी आतापासून सुदृढतेच्या दिशेने एक पाऊल पुढे टाळायला सुरुवात करा.