Aamir Khan Fitness Secret : आमिर खान अनेक हटके विषय असलेले चित्रपट निवडतो आणि प्रत्येक चित्रपटासाठी तो खूप मेहनत घेतो. तो त्याच्या चित्रपटातील भूमिकेला न्याय देण्यासाठी १०० टक्के प्रयत्न करतो. त्याने त्याच्या भूमिकेसाठी अनेकदा फिटनेसमध्ये बदल केले आहेत. ‘दंगल’ चित्रपटासाठी त्याला डाएटवर लक्ष केंद्रित करावे लागले होते. चित्रपटादरम्यान त्याच्या फिटनेस दिनचर्येविषयी आमिर खान म्हणाला होता, “मी स्वत:ला पाच महिने दिले. यामध्ये डाएटने सर्वांत महत्त्वाची भूमिका बजावली होती. लोकांना वाटतं की, फक्त वर्कआउट गरजेचं आहे; पण जर योग्य डाएट नसेल, तर तुम्हीही काहीही करू शकत नाही. डाएट हे पहिल्या क्रमाकांवर येते. ५० टक्के डाएट, २५ टक्के वर्कआउट व २५ टक्के आराम घ्या. सलग आठ तास झोपा. जोपर्यंत तुम्ही हे करत नाही तोपर्यंत तुम्हाला फरक जाणवणार नाही.

लोक रात्री भात न खाणे, कमी जेवण करणे किंवा उपाशी राहणे किंवा जास्त प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन करणे, इत्यादी गोष्टी करतात; पण आमिर सांगतो की, तो तसे करत नाही. “मी वजन कमी करण्याच्या जुन्या मार्गाचे अनुकरण करतो, ज्यामध्ये कॅलरीज कमी आहेत. जर तुम्ही २,००० युनिट ऊर्जा खर्च केली, तर तुम्ही किती कॅलरीज खाता? जर तुम्ही तेवढ्याच कॅलरीज खात असाल, तर तुमचे वजन तेवढेच राहील. जर तुम्ही २,००० युनिट ऊर्जा खर्च केली आणि १,५०० कॅलरीजचा आहार घेतला, तर दररोज ५०० कॅलरीज कमी होतात. तसेच, जर तुम्ही १,००० युनिट ऊर्जा आणखी खर्च केली ​​आणि दररोज सात किमी चाललात, तर आठवड्यात ७,००० कॅलरीज कमी होतात. हेच विज्ञान आहे. जर तुम्ही १,५०० कॅलरीज सेवन करीत असाल, तर तो संतुलित आहार असला पाहिजे. त्यासाठी कार्ब्स, प्रोटीन्स, फॅट्स, फायबर व सोडियमची आवश्यकता असते,” असे आमिर खान याने ‘बॉलीवूड हंगामा’मध्ये सांगितले होते.

वजन कमी करण्यासाठी कॅलरीज कमी करणे, हा एक चांगला मार्ग आहे. हे जाणून घेण्यासाठी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ने तज्ज्ञांशी संवाद साधला.

कॅलरीज कमी करणे, ही फॅट आणि वजन कमी करण्यासाठी एक लोकप्रिय पद्धत आहे. सोप्या भाषेत सांगायचे, तर शरीराचे सध्याचे वजन संतुलित ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या कॅलरीजपेक्षा कमी कॅलरीजचा आहार घेणे होय. ‘ला फेमे’च्या न्युट्रिशनिस्ट राशी चहल सांगतात, “जेव्हा तुम्ही कमी कॅलरीज खाता तेव्हा तुमचे शरीर ऊर्जेसाठी साठवलेल्या फॅट्सकडे वळते, ज्यामुळे वजन कमी होते. वजन कमी करण्याच्या प्लॅनमधील ही एक महत्त्वाची बाब आहे.”

कॅलरीज कमी झाल्याने वजन कसं कमी होते, यामागे बायोलॉजी आहे. “आपल्या शरीराला श्वास घेणे, अन्न पचवणे, विचार करणे व शरीराची हालचाल करणे यांसारखी दैनंदिन कामे करण्यासाठी एका ठरावीक प्रमाणात ऊर्जेची आवश्यकता असते, जी कॅलरीजमध्ये मोजली जाते. जेव्हा आपण आपल्या शरीराच्या गरजेपेक्षा जास्त कॅलरीजचे सेवन करतो, तेव्हा या जास्तीच्या कॅलरीज फॅट्स म्हणून शरीरात साठवल्या जातात. त्याशिवाय जेव्हा आपण शरीराच्या गरजेपेक्षा कमी कॅलरीजचे सेवन करतो, तेव्हा शरीर ऊर्जेसाठी साठवलेल्या फॅट्सचा वापर करते, ज्यामुळे फॅट्स प्रमाण कमी होते,” असे चहल सांगतात.

कॅलरीज कमी झाल्याने हळूहळू दीर्घकाळासाठी वजन कमी होऊ शकते. चहल यांच्या मते, ही एक उत्तम पद्धत आहे, जी अनेकदा फायदेशीर ठरते. “कॅलरीचे सेवन कमी करून आणि शारीरिक हालचाली वाढवून तुमचे शरीर ऊर्जेसाठी फॅट्स कमी करण्यास सुरुवात करते. त्यामुळे शरीरातील फॅट्स आणि वजन कमी होते. तुमच्या शरीराला दिवसातून ठरावीक प्रमाणात जेवण घेण्याची सवय लागते.” त्या पुढे सांगतात.

कॅलरीजची कमरता प्रत्येकासाठी योग्य असू शकत नाही, हे लक्षात घ्या. “आरोग्याशी संबंधित समस्या असलेले लोक, खेळाड किंवा खाण्याशी संबंधित आजार असलेल्या व्यक्ती यांना वजन कमी करताना जास्त काळजी घ्यावी लागते. त्याशिवाय कॅलरीज अति जास्त
प्रमाणात कमी झाल्यास स्नायूंचे दुखणे, पौष्टिक कमतरता किंवा इतर आरोग्य समस्या निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकते. म्हणून कॅलरीजची कमतरता असतानाही संतुलन राखणे आणि शरीराच्या पौष्टिक गरजा समजून घेऊन त्या पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे” असे चहल यांनी स्पष्ट केले.