नवी दिल्ली : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने चंदीगड येथील रुग्णालयाने रेडिओलॉजी तज्ज्ञांप्रमाणेच अत्यंत अचूकपणे पित्ताशयाच्या कर्करोगाचे निदान केले आहे. ‘लँसेट रिजनल हेल्थ साऊथ ईस्ट एशिया’मध्ये यासंबंधी संशोधनाची माहिती देण्यात आली आहे.
पित्ताशयाच्या कर्करोगाचे निदान होण्यास विलंब लागतो. या आजाराचा मृत्यू दरही अधिक आहे. चंदीगडमधील वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्था आणि ‘आयआयटी दिल्ली’च्या एका गटाने ‘अल्ट्रासाऊंड’चा उपयोग करून पित्ताशयाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी ‘डीप लर्निग मॉडेल’ विकसित केले आहे.
हेही वाचा >>> आरोग्य वार्ता : शहरांतील मुलांना श्वसनासंबंधी आजारांचा धोका अधिक
संशोधनासाठी ऑगस्ट २०१९ ते जून २०२१ दरम्यान पित्ताशयाच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांच्या ‘अल्ट्रासाऊंड’च्या माहितीचे ‘डीप लर्निग’च्या मदतीने विश्लेषण करण्यात आले. रेडिओलॉजीच्या दोन तज्ज्ञांद्वारेही स्वतंत्रपणे ‘अल्ट्रासाऊंड’ छायाचित्राची तपासणी करण्यात आली. त्यांची तुलना ‘डीप लर्निग मॉडेल’शी करण्यात आली. ‘डीप लर्निग’वर आधारित पद्धती ही पित्ताशयाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी अधिक सक्षम असल्याचे आढळून आले. यासाठी संशोधकांनी २७३ रुग्णांच्या आरोग्याविषयी माहितीचे विश्लेषण करण्यात आले. हे नवे संशोधन पित्ताशयाच्या कर्करुग्णांवर वेळेत आणि अचूक उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.