Benefits Of Eating A Lot Of Vitamin C: चंकी पांडे हे बॉलीवूड चित्रपटसृष्टीतील सर्वात नावाजलेले नाव आहे. ९० च्या दशकात त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने सर्वांची मनं जिंकली, हा अभिनेता सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतो. नुकतंच चंकी पांडेने त्याच्या एका आहाराच्या सवयींविषयी एक खुलासा केला आहे, ज्यात त्याने मी रोज मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सीचे सेवन करत असल्याचे सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपल्या आहाराच्या सवयींविषयी बोलताना चंकी पांडे म्हणाले की, मी रोज अधिक प्रमाणात व्हिटॅमिन सीचे सेवन करतो. मी रोज लिंबूपाणी पितो. भिजवलेल्या खजुराचे पाणी पितो. माझ्याकडे व्हिटॅमिन सी सप्लिमेंटसुद्धा आहेत. त्या सप्लिमेंट मी रोज चघळत बसतो. इतकेच नाही तर रोज सकाळी मला दोन लसूण चावून घायला आवडते.

चंकी पांडे पुढे सांगतो की, मी दररोज स्विमिंग पूलमध्ये पोहतो. हे करायला मला आवडते, कारण हा एक ध्यानाचा प्रकार आहे, यावेळी ना कोणाचा फोन ना कोणाशी बोलणं. पाणी वर खाली होत असतं आणि मी माझ्यातच हरवलेला असतो. यावेळी मला वाटते की, मी एक शार्क आहे. पण, चंकी पांडेच्या या सवयींचा आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो. विशेषतः व्हिटॅमिन सीचे अधिक सेवन केल्याने शरीरावर नेमके कोणते परिणाम होतात जाणून घेऊ…

शरीरास किती प्रमाणात व्हिटॅमिन सीची आवश्यकता असते?

हैदराबादमधील एलबी नगर येथील ग्लेनेगल्स अवेअर हॉस्पिटलमधील आहारतज्ज्ञ डॉ. श्वेता बिराली यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, व्हिटॅमिन सी किंवा एस्कॉर्बिक ऍसिड हे शरीरासाठी महत्त्वाचा पोषक घटक आहे. व्हिटॅमिन सीच्या सेवनामुळे रोगप्रतिकारशक्ती, कोलेजनची पातळी वाढते, तसेच ते पॉवरफूल अँटिऑक्सिडंट म्हणून काम करते. यात पोषक तत्वांचे प्रमाण अधिक असले तरी त्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. त्यामुळे त्याचे सुरक्षित आणि मर्यादित सेवन करणे आवश्यक आहे. तसेच यात तुम्ही कोणते व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थ खाताय, हेही तितकेच महत्त्वाचे आहे.

एका प्रौढ व्यक्तीला रोज (RDA) जवळपास ६५-९० मिलिग्रॅम व्हिटॅमिन सीची गरज असते. पण, ती व्यक्ती दररोज (UL) व्हिटॅमिन सीचे जास्तीत जास्त २००० mg मिलीग्रॅमपर्यंत सेवन करू शकते. पण, यापेक्षा अधिक प्रमाणात सेवन केल्याने अतिसार, मळमळ, पोटदुखीची समस्या जाणवू शकते. गंभीर प्रकरणांमध्ये शरीरात ऑक्सलेट जमा होत किडनी स्टोनचा त्रास होऊ शकतो, असेही डॉ. श्वेता म्हणाल्या.

व्हिटॅमिन सीयुक्त फळं आणि त्याचे आरोग्याला मिळणारे फायदे

आहारतज्ज्ञ डॉ.श्वेता यांनी पुढे सांगितले की, संत्री, पेरू, किवी, शिमला मिरची आणि स्ट्रॉबेरी यांसारख्या नैसर्गिक पदार्थांमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण अधिक असते. या पदार्थांच्या सेवनाने शरीरास अधिक प्रमाणत फायबर आणि इतर पोषक तत्व मिळतात.

ज्या व्यक्तींच्या शरीरात व्हिटॅमिन सीची कमतरता असते, अशा व्यक्तींची व्हिटॅमिन सीची गरज भागवण्यासाठी पूरक आहार आवश्यक असतो. (उदा. आजारपण किंवा गर्भधारणेदरम्यान), पण अशा व्यक्तींनी व्हिटॅमिन सीचे सेवन करण्यापूर्वी किंवा व्हिटॅमिन सीयुक्त सप्लिमेंट घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे, असेही डॉ. श्वेता यांनी नमूद केले.

व्हिटॅमिन सी पाण्यात विरघळणारे आहे, त्यामुळे सातत्याने त्याचे अधिक प्रमाणात सेवन केल्यास ते शरीरातून उत्सर्जित होते, ज्यामुळे शरीरावर ताण येऊ शकतो. त्यामुळे व्हिटॅमिन सीच्या सेवनाने शरीराचे नुकसान न करता अधिक फायदे मिळण्यासाठी त्याचे प्रमाणात सेवन करणे गरजेचे आहे. इतकेच नाहीतर नेहमी संतुलित आहार सेवन करा, व्हिटॅमिन सी सप्लिमेंट्स घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या, असेही डॉ. श्वेता म्हणाल्या.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor chunky panday shares he consumes a lot of vitamin c have a very high intake read expert opinion sjr